"स्वतःचेच विचार संग्रहित करून ठेवावेत म्हणून आपण ते कागदावर उतरवून काढतो, आपल्या आठवणींचा तो कागद जपून ठेवतो, नंतर जेव्हा काही दिवसांनंतर किंवा काही वर्षांनंतर ते उघडून आपण वाचतो तेव्हा आपल्याच चेहऱ्यावर स्मितहास्य उमटतं! तेव्हा जो स्वतःशी संवाद होतो तो म्हणजे एकांत! असाच संवाद कधीतरी व्हावा अशी इच्छा बाळगून हे लिहितो आहे, म्हणून हा एकांत!"

Thursday 22 December 2016

तापोळे : एक अविस्मरणीय भटकंती!!!

तापोळे  :  एक अविस्मरणीय भटकंती!!! (Tapole) पुणे ते तापोळे अंतर: १३३ किलोमीटर जवळचे गाव/ शहर : महाबळेश्वर / सातारा तापोळे तलाव... thumbnail 1 summary
तापोळे : एक अविस्मरणीय भटकंती!!! (Tapole)

पुणे ते तापोळे अंतर: १३३ किलोमीटर

जवळचे गाव/ शहर : महाबळेश्वर / सातारा

तापोळे तलाव

ज्या मोसमाची सर्व भटके लोक, आतुरतेने वाट पाहत असतात, तो पावसाळा चालू झाला होता, पण जून महिना संपत आला तरी म्हणावं असा कोणताच बेत अजून आखला नव्हता. मग पावसाळी भटकंती साठी इंटरनेट वर नेहमी सारखी शोधमोहीम चालू केली. या वेळेस गड किल्ले सोडून कुठेतरी शांत आणि नयनरम्य जागी पावसाळी भटकंती चा शुभारंभ करू असा विचार मनात घोळत होता, पण तरीही खूप शोधून हवी तशी जागा मात्र सापडत नव्हती.

कोयना नदी

महाबळेश्वर माथेरान आणि लोणावळा हि गर्दिनी वेढलेली, आणि या आधीच पिंजून काढलेली ठिकाणं या वेळेस टाळायची असं मनाशी पक्कं ठरवलं होतं. अखेर तारीख - वार ठरला तरी सुद्धा ठिकाण मात्र ठरत नव्हतं. शेवटी निघायच्या आदल्या दिवशी एक ठिकाण सापडलंच! ठिकाण तसं माहितीच होतं, पण त्या सुंदर तलावाकाठी राहावं असा विचार मात्र या आधी मनात आला नव्ह्ता. शेवटी तापोळे हे ठिकाण निश्चित झालं, तलावाच्या जवळ राहायची सोय आहे  ना, एवढं बघितलं, इंटरनेट वरून एक फोन नंबर घेतला आणि तयारीला लागलो.

अखेर शनिवारच्या सकाळच्या गाडीनी पुण्यावरून महाबळेश्वर कडे निघालो. नेहमी प्रमाणे गाडीने १-१:३० तास उशीर केला. आणि वाटेतल्या ट्राफिक ने त्यात अजून १-१:३० तासाची भर घातली. अखेर सकाळी ७ ला बाहेर पडलेलो आम्ही, दुपारी १ वाजता महाबळेश्वर ला पोहोचलो. चहूबाजूंनी गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या, प्रचंड गर्दीने बस सेवा विस्कळीत झाली होती. चौकशी केल्या वर समजले की तापोळ्याची १२ वाजताची बस अजून आलेली नाही. अखेर आम्ही जेवणं उरकून बस स्थानकावर वर येउन बसलो. तास दीड तास होऊन गेला तरी बस चा पत्ता नव्ह्ता. अखेर एकदाची बस आली आणि आम्ही चढून बसलो. परंतु विस्कळीत झालेल्या सेवेमुळे हि बस दुसऱ्या मार्गे फिरवण्याचा निर्णय घेण्यात आला आणि आम्हाला खाली उतरवले. आता तापोळे विसरून महाबळेश्वर मधेच फिरायला लागणार अशी एक शंका मनात यायला सुरुवात झाली. अखेर आणखी २० मिनिटांनी दुसरी बस आली. या वेळेस मात्र प्रवाशांनी कंडक्टर चा मार्ग बदलण्याचा कट शिजू दिला नाही आणि आम्ही गाडी तापोळ्याकडे घ्यायला सांगितली.
असो, तर एवढे सगळे रामायण सांगण्याचा उद्देश एव्हडाच की महाबळेश्वर ते तापोळे बस सुविधा हि रामभरोसेच आहे. तेव्हा आपापले वाहन घेऊन जाणे हे केव्हाही उत्तम!

तापोळे

अखेर महाबळेश्वर चा डोंगर उतरलो, तसं धुकं ओसरलं तेव्हा तापोळ्याच्या त्या सुंदर तलावाचं दर्शन झालं आणि आपण बरोबर जागा निवडल्याच समाधान झालं! तापोळ्याच्या तलावात kayaking व boating ची सोय आहे हे माहीतच होतं.




 अखेर तापोळ्याला पोहोचलो आणि असलेल्या नंबर वर फोन लावला. जवळच असलेल्या तापोळा ईको टूरीझम ची गाडी आम्हाला न्यायला आली. १०-१५ मिनिटांनी गाडी थांबली, आम्ही गाडीतून उतरलो तर आजू बाजूला काहीच दिसत नव्हतं. पण इथेच आपली राहायची सोय आहे असं आम्हाला त्या माणसाने सांगितलं. तिथे फक्त नर्सरी चा असतो तसा एक फाटका तंबू दिसत होता. त्या माणसाच्या मागे आम्ही काही पावलं पुढे गेलो असू तोच डोंगर उतारावर असलेल्या तंबूंची एक रांग आम्हाला दिसली.

तंबूंची रांग


 आम्हाला तिथे तंबूत राहायला लागेल याची कल्पना नव्हती. तंबूत पाऊल जेव्हा टाकला तेव्हा मात्र आम्हाला आचार्यचकित झालो. आत गेलो तसं लक्षात आलं की हा तंबू म्हणजे फक्त तंबूचे रूप दिलेली एक खोलीच आहे!

आमचा तंबू

 आमच्या या तंबू मध्ये दोन बिछाने होते, एक छोटंसं कपाट होतं, एक charging point होता आणि toilet - bathroom ची सुद्धा सोय होती! आम्ही ताजे तवाने होऊन बाहेर पड्लो, समोर बघितलं तेव्हा अतिशय मनमोहक दृश्य तंबूतून दिसत होतं! चहूबाजूंनी धुक्याने आच्छादलेल्या हिरव्यागार डोंगरांनी वेढलेला तापोळ्याचा तलाव, मागच्या बाजूला दिसणारी खळखळती कोयना नदी आणि तलावाच्या समोर दिसणारं कोयना अभयारण्य! जणू डोळ्यांना मेजवानीच!



 तेथील गावकऱ्यांना आजूबाजूला काय बघण्यासारखे आहे या संदर्भात विचारपूस केली, तेव्हा गावात छोट्या टेकड्या आहेत व तेथे  मोर आणि थोडे फार पक्षी दिसत असल्याचे समजले. जाता जाता आम्हाला गावकऱ्यांनी मनसोक्त आंबे खाण्याची मुभा दिली.गावात फेरफटका मारून आणि मोर बघून झाल्यावर आम्ही तंबूत परतलो व समोरच्या जांभूळाच्या झाडावर ताव मारला! जवळच असलेल्या archery मध्ये थोडी नेमबाजी केली आणि मग रात्री शेकोटी पेटवून गप्पा मारत बसलो!

archery

महाबळेश्वर पासून खरं तर  अगदी थोड्याच अंतरावर असलेलं हे छोटंसं गाव, पण गावात कसली गर्दी किंवा लगबग नव्हती, चहुबाजूला निरव शांतता! 
एकाच डोंगराच्या माथ्यावर आजूबाजूच्या सर्व शहरातून गर्दी एकवटली होती, तर त्याच डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या एका नयनरम्य ठिकाणाची मात्र कोणाला फारशी माहितीही नव्हती! केवढा हा विरोधाभास!!!

red whiskered bulbul

त्या रात्री आम्ही लवकरच झोपी गेलो! दुसऱ्या दिवशी लवकर उठलो आवरून घेतले आणि तलावाकडे निघालो. तलावाजवळ कयाक तयारच होती! आम्ही life jacket अंगावर चढवले, कयाक कशी वल्हवायची याचे थोडे धडे घेतले आणि पाण्यात उतरलो! कयाक चालवणे हे मात्र अतिशय सोपे असते हे थोड्याच वेळात आमच्या लक्षात आलं! आमच्या बोटीने वेग पकडला होता तेव्हड्यात बाजुच्या एका माणसाची कयाक उलटली! सुरुवातीला जरा हा प्रकार पाहून भीती वाटली, पण नंतर हा प्रकार म्हणजे खेळच वाटू लागला! कयाक निमुळती असल्यामुळे थोडी चूक झाली तर ती सहज उलटू शकते हे देखील समजले! मनसोक्त कयाक चालवून झाल्यावर आम्ही मोर्चा पॅडल बोटीकडे वळवला! शेवटी पाण्यात खेळून समाधान झाल्यावर बाहेर पड्लो आणि आजूबाजूला  भटकून आलो. आजूबाजूला अनेक प्रकारची फुलं दिसली! तंबूच्या समोर घिरट्या घालताना एका गरुडाच दर्शन झालं! तसेच बाकी अनेक पक्षी दिसले!

kayaking and boating


खरं तर तेथून जवळच असलेला वासोटा किल्ला व कोयना अभयारण्य बघायची खूप इच्छा होती पण वेळेअभावी आम्ही हा विचार सोडून दिला. तसेच या दोन्ही ठिकाणी प्रवेशासाठी वनखात्याची परवानगी लागत असल्याची माहिती समजली. कोयना अभयारण्यात वाघ, बिबट्या, अस्वल, रानकुत्रा, गवा, हरणं, साप व अजगराच्या विविध जाती असे अनेक प्राणी व विविध पक्षी दिसतात! तसेच हा भाग सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या हद्दीत येतो. तेव्हा पुढच्या वेळी माहितगार व्ह्याक्तींबरोबर येउन, येथे प्रवेश मिळवण्यासाठी खटाटोप करायचाच असा पक्का बेत मनाशी आखला!

तापोळ्यावरून कोयना अभयारण्य!


 अखेर दुपारचं जेवण करून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो! जाता जाता गावातल्या झोपङ्यांकडे लक्ष गेलं, तेव्हा क्षणभर वाटलं की महाबळेश्वर सारखी प्रसिद्धी इथे नाही मिळाली, यामूळे या गावातल्या लोकांच नुकसान झालं खरं, पण एक सुंदर ठिकाण प्रदूषण मुक्त आणि निसर्गसम्रुद्ध राहिलं हेही तितकाच खरं!




-नितीश साने ©

1 comment

  1. To be a part of "भटकंती वेडे" whats-app group, post your contact number in comments section!

    ReplyDelete