"स्वतःचेच विचार संग्रहित करून ठेवावेत म्हणून आपण ते कागदावर उतरवून काढतो, आपल्या आठवणींचा तो कागद जपून ठेवतो, नंतर जेव्हा काही दिवसांनंतर किंवा काही वर्षांनंतर ते उघडून आपण वाचतो तेव्हा आपल्याच चेहऱ्यावर स्मितहास्य उमटतं! तेव्हा जो स्वतःशी संवाद होतो तो म्हणजे एकांत! असाच संवाद कधीतरी व्हावा अशी इच्छा बाळगून हे लिहितो आहे, म्हणून हा एकांत!"

Thursday 15 December 2016

शोध

thumbnail 1 summary

शोध

कधी कधी काही घटना अशा घडतात कि ज्या काहीही कारण नसताना देखील उगाचच तुमच्या कायमच्या लक्षात राहतात! अश्याच काही गोष्टींमधली हि एक गोष्ट आहे!

साधारण दुपारची वेळ होती, ऑफिसच्या एका महत्वाच्या कामासाठी माझी निवड झाली होती! आत मध्ये काही चर्चा चालू होत्या, थोड्या वेळानी मला बोलवून कामाची पार्श्वभूमी सांगण्यात आली. मग काही प्रश्नोत्तरे झाली आणि मग सर्व गोष्टी समजावून घेऊन मी कामासाठी ऑफिस मधून बाहेर पडलो!

आता खरं सांगायचं तर साधं एका बँकेतून पासबुक भरून आणायचं काम माझ्यावर सोपवलं होतं, पण आमचं ऑफिस पुण्यात आणि त्यात सदाशिव पेठेत असल्यामुळे, "आमच्या ऑफिसचं प्रत्येक काम महत्वाचच असतं! असं म्हणून आपलीच पत वाढवायला काहि हरकत नव्हती!"
 आमच्या ऑफिस मधल्या एका छत्रपतींच मत म्हणजे,
"ते काम ना? ते काय कोणीही करेल हो, म्हणून ते तुझ्याकडे दिलाय!" असं होतं!

असो, अखेर मी ऑफिस मधून निघालो! टिळक रोड वर हिराबाग चौकात हि सेन्ट्रल बँक आहे असा पत्ता मला दिलेला होता! त्याप्रमाणे हिराबाग चौकात मी गाडी लावली आणि कुठे हि बँक दिसते का ते बघू लागलो.
चौकात तरी काही कुठे बँक दिसेना. मग चौकाच्या दोन्ही बाजूंची मी शतपावली करत टेहळणी चालू केली. बराच वेळ दोन्हीकडे बघून झालं, बाकी सर्व जिल्हा सहकारी बँकांपासून ते राज्य सहकारी बँका दिसल्या, पण हि सेन्ट्रल बँक काही दिसायला तयार नव्हती. मग अखेर मी आजूबाजूच्या लोकांकडे विचारपूस चालू केली.
बराच वेळ दोन्हीकडे बघून झालं, बाकी सर्व जिल्हा सहकारी बँकांपासून ते राज्य सहकारी बँका दिसल्या, पण हि सेन्ट्रल बँक काही दिसायला तयार नव्हती. मग अखेर मी आजूबाजूच्या लोकांकडे विचारपूस चालू केली.

मग "काही कल्पना नाही बुवा!"
"आम्ही पण या भागात नवीनच आहोत" अशी छोटी वाक्य फेकून बाकीची पत्र निघून गेली आणि मग नाटकात जसे मुरलेले कलाकार प्रवेश करतात त्याप्रमाणे हळू हळू मुरलेले पुणेकर मला भेटू लागले.

"काय हो काका इथे सेन्ट्रल बँक कुठे आली?" मी विचारलं.
"सेन्ट्रल बँक? काही ऐकण्यात नाही बुवा. पत्ता कोणता दिला होता?"
"हिराबाग चौक"
"हिराबाग चौक? अरे मी गेली २७ वर्ष राहतोय इथे पण सेन्ट्रल बँक कधी ऐकलं नाही बुवा!"
आणि निघून गेले.
मग मी येता येता एका टपरीवर पत्ता विचारू म्हणून एखादी टपरी शोधू लागलो.
मुश्कीलिनी एक टपरी सापडली तेव्हा त्याच्या बाहेर पाटी सापडली,
"येथे पत्ता विचारू नये! पत्ता विचारायचा असल्यास पुढच्या टपरीवर समजेल!"
काय बोलायचं?

मग एका पानवाल्याला विचारलं,
"काका इकडे सेन्ट्रल बँक कुणीकडे आली?"
"ती काय तिकडे समोर! ती स्टेट बँक आहे न त्याच्या अलीकडे! पण आज संप आहे त्यांचा!"
मी तिकडे जाऊन बघितलं पण सेन्ट्रल बँक काही दिसायला तयार नव्हती.
शेवटी पुन्हा ऑफिस मध्ये फोन करून विचारलं, पण पत्ता बरोबर असल्याची माहिती मिळाली.

हळू हळू आपली ऑफिस मधून गच्छंती झाली की काय अशी शंका माझ्या मनात घर करू लागली!

आणखीन माहिती साठी अखेर एका दुकानाबाहेर थांबलेल्या माणसाला विचारलं,
"सेन्ट्रल बँक? ती इकडे नाही रे दादा! हे स्वारगेट आहे! सेन्ट्रल बँक स्टेशनकडे आली! ते रेल्वे स्थानक आहे आणि हे बस स्थानक आहे! तुला कोणीतरी चुकीच्या पत्त्यावर पाठवलं!" असा सांगून माझा हिरमोड केला.
त्यांचे आभार मानून मी त्यांचा निरोप घेतला आणि सर्व भागाला पुन्हा प्रदक्षिणा मारली.

शेवटी रस्त्याच्या उजव्या बाजूचे लोक मला डावीकडे पाठवत होते आणि डावीकडचे उजवीकडे पाठवत होते!
पण ती सेन्ट्रल बँक काही दिसायला तयार नव्हती. हळू हळू आजूबाजूच्या लोकांना बहुतेक या करमणुकीबद्दल माहिती मिळाली असावी! कारण काही वेळानी लोकं माझ्याकडे बघून हसतायत कि काय असे भास मला होऊ लागले!

समोरून एक गृहस्थ येताना दिसले. पेहेरावावरून तरी बाहेरगाव चे वाटत होते, तरी पण विचारून बघायला काय हरकत आहे म्हणून विचारलं,
पण मला वाटतं, पुण्यातली लोक कसा बाहेर गोव्याला गेली कि दारू वगैरे पिउन घेतात,
कोकणात गेली की मासे वगरे खाऊन घेतात, तसं पुण्यात बाहेरगावची माणसा आली कि खवचटपणा करून घेत असावेत!
त्या माणसानी एक जोरदार पिंक टाकली आणि म्हणाला,
"मला काय ठाऊक? मी काय गल्लीतला पानवाला आहे पत्ते माहित असायला?"
निघून गेला.

मग मला पुन्हा इकडून तिकडे धाडण्याचे प्रकार चालू झाले!
"सेन्ट्रल बँक न, अहो ती काय समोर! रस्ता ओलांडा आणि दुसरीच बिल्डींग!"
"जरा दाखवता का मला प्लीस?" मी विचारलं!
"हं चला!"
असं म्हणून आम्ही निघालो! शेवटी दुसऱ्या बिल्डींग पाशी आलो तेव्हा त्यांनी जरा इकडे तिकडे पाहिलं,
"नाही आहे होय! मला वाटलं इकडेच आहे! बाकी बँकेचा पत्ता काय कोणीही सांगेल हो! बराय तर मग!"

हळू हळू इथे एखादी अदृश्य सेन्ट्रल बँक अस्तित्वात आहे अशी माझी खात्री पटू लागली!
आणखीन एकाला पत्ता विचारायचा, नाहीतर सरळ ऑफिस मध्ये जाऊन कोणालातरी बरोबर घेऊन यायचा असा  मी बेत आखला आणि निघालो!

"काका इथे सेन्ट्रल बँक कुठे आहे काही कल्पना?"
"सेन्ट्रल बँक न? ती काय रस्त्याच्या पलीकडे! ती बस थांबली आहे ना, तिथून डायगोनली बघा! तिथेच आहे सेन्ट्रल बँक!"
त्यांनी मला हे इतक्या हसत हसत का सांगितलं ते मला डायगोनली बघितल्यावर कळलं! काही नव्हतं! डायगोनली, हाॅरीझाॅनटली, शेवटी एकदा व्हर्टीकली पण पहिला की वरती कुठे काही आहे का? पण काही नव्हतं! अखेर शेवटचा पर्याय म्हणून तिथल्या एका पानवाल्याला विचारलं!
"सेन्ट्रल बँक? हां हां! अरे ती इकडे नाही काही, याच्या अलीकडच्या चौकात आहे! एक फुलाचं दुकान आहे त्याला लागुनच आहे!"
त्यांचे आभार मानून मी तिथून निघालो आणि शेवटी एकदाची ती सेन्ट्रल बँक सापडली!

बँकेत गेल्यावर त्या बँकेचा पत्ता फक्त एका पानवाल्यालाच कसा माहित होता याच कोड मला उलगडल!
त्या अख्ख्या भागात फक्त त्या पानवाल्याचाच खात त्या बँकेत असावा इतका शुकशुकाट तिथे होता.
पण अखेर माझी मोहीम फत्ते झाली!
मी बँकेच्या बाहेर आलो तेव्हा ते मगाचचे डायगोनली बघायला सांगणारे गृहस्थ मला पत्ता विचारताना दिसले.
मी मुद्दाम तिथे जरा घुटमळत थांबलो! त्यांनी मला ओळखलं नव्हतं!
"दादा इथे पेरूगेट कुठे आलं रे?"
आता हसायची पाळी माझ्यावर आली होती! मला असुरी आनंद होत होता!
"पेरूगेट ना? इथून सरळ जा, अगदी हा रस्ता संपेपर्यंत! तिथे गेलात की तुम्हाला मित्र मंडळ लागेल. तिथे कोणालाही विचारा! मिळेल!"
मी देखील त्यांना अच्छा केलं आणि ऑफिसकडे निघालो, अगदी हसत हसत!


-नितीश साने ©

No comments

Post a Comment