"स्वतःचेच विचार संग्रहित करून ठेवावेत म्हणून आपण ते कागदावर उतरवून काढतो, आपल्या आठवणींचा तो कागद जपून ठेवतो, नंतर जेव्हा काही दिवसांनंतर किंवा काही वर्षांनंतर ते उघडून आपण वाचतो तेव्हा आपल्याच चेहऱ्यावर स्मितहास्य उमटतं! तेव्हा जो स्वतःशी संवाद होतो तो म्हणजे एकांत! असाच संवाद कधीतरी व्हावा अशी इच्छा बाळगून हे लिहितो आहे, म्हणून हा एकांत!"

Thursday 15 December 2016

कॉलरलेस



कॉलरलेस

कपड्याला कडक इस्त्री, ताठ कॉलर आणि पॉलिश केलेले शूज घालून घड्याळाचा मान ठेवणाऱ्या व्हाइट कॉलर लोकांच्या दिनचर्येत कुठेतरी आपल्याच धुंदीत राहणाऱ्या एक कामवल्या बाई येतात.
त्यांना हवं त्या वेळी त्या येतात त्यांना हवं त्या वेळी जातात, वेळी समोरच्यांकडून किल्ली घेऊन सुद्धा काम करुन जातात.

आम्हाला मात्र ऑफिसात 15 मिनिट उशीर झाला तर आमचा लेट मार्क लावतात...
या रोज राणीच्या थाटात येतात. बरं येतात ते येतात, वर आल्यावर यांना बाथरूम व सगळ्या खोल्या रिकाम्या लागतात.
दोन मिनिट जरी अंघोळीला गेल्यामुळे बाहेर थांबावं लागलं तर अम्हालाच टोमणे मारून जातात.
आमच्या ऑफिसात मात्र, साधी बसण्याची जागा तर सोडाच, पीसी आणि प्रिंटर वरुन पण भांडणं होतात...

सुट्ट्या तर यांच्या कधी आदल्या दिवशी तर कधी ऐत्या वेळी पण कळतात.
कुणी आपल्या गावाला जाऊन येतात तर कुणी सिंगापूर, नेपाळ सुद्धा करतात.
बरं करतात तर करतात, पण यायच्याच दिवशी यांच्या बस किंवा कधी कधी तर फ्लाईट पण चुकतात.

आमच्याकड़े मात्र 2-3 महीने आधीपासून प्लॅन केलेल्या सुट्ट्या ऐत्यावेळी कॅन्सल होतात.
यांच्यापैकी काही तर अवलीच असतात.
कुणी कॅश देऊन सॅन्ट्रो घेतात तर कुणी गावाला जमिनीचे व्यवहार करतात.
इथे आमचे कॅशियर तर पेनाच्या रिफिल अणायला पण कटकट करतात.

बर याउपर यांचे साइड-इनकम असतात.
कुणी रेलवे चे एजंट असतात तर कुणी होमगार्ड म्हणून नोकरी करतात. शेवटी कामाचं लोड होत म्हणून तिकडे राजीनामे देतात तर त्यांचे राजीनामे नामंजूर होतात, उलट यांच्या वेळा कमी होतात आणि पगार वाढतात.
आमची मात्र कामं आणि वेळा वाढतात. पगार 'जैसे थे' च राहतात.

या सागळ्याची उत्तरं शोधयला विचार कधीतरी बाहेर पडतात पण ते कायम मोटीवेशन, डेडिकेशन या मुद्द्यांवर येऊन थांबतात.
पण काय करणार?
शेवटी अमची कॉलर आड येते ना!



-नितीश साने ©

No comments

Post a Comment