आज कुठून कोण जाणे, मनात विचारांची फार गर्दी झाली होती,
आकाशात अचानक त्या काळ्या ढगांची झाली होती, अगदी तशीच...
आणि त्या प्रश्नांना उत्तरं देखील
अनेक मिळत होती,
अगदी त्या सोसाट्याच्या वाऱ्याच्या
दिशेसारखीच...
सैरभैर...
वाऱ्याची वाढती गती फक्त विचारांचा
वेग वाढवत होती,
अखेर येरझाऱ्या थांबल्या,
माझी डायरी उघडली आणि लेखणी बाहेर
काढली...
आता विजेचा गडगडाट चालू झाला होता,
मनातले विचार नाही, कागदावरचे शब्द गरजत होते
आणि लखलखत्या विजांप्रमाणे, लेखणीला देखील धार आली होती...
कागदावरची दाटी वाटी फक्त वाढत होती,
आकाशात त्या ढगांची झाली होती
तशीच...
असा किती वेळ गेला ते कळलंच नाही
पण अचानक खूप मोठा गडगडाट झाला,
आणि तेव्हाच समोरच्या टेलिफोनची बेल
वाजू लागली...
अखेर ज्याची वाट पाहत होतो ती वेळ
आली...
तावा - तावाने जाऊन मी फोन उचलला,
बोलायचं होतं खरं तर खूप काही,
पण मी फक्त ऐकतच राहिलो...
माझे प्रश्न किती क्षुल्लक आहेत ते
हळू हळू समजू लागलं,
शेवटी काळजी घे म्हणून ठेवला मी
फोन...
आता विजांचा लख - लखाट थांबला होता,
ढगांचा गडगडाट देखील थांबला होता,
दाटून आलेले ढग आता अचानक विरळ वाटू
लागले,
पावसाची तेव्हडी रिप - रिप चालु
झाली...
मी लेखणी मिटली आणि त्या उघड्या
डायरीकडे बघितलं,
त्यातल्या शब्दांना एक चंदेरी किनार
आली होती...
मी चष्मा काढला तसा तो चंदेरी रंग
देखील त्या ओलाव्यात कुठे तरी विरून गेला,
लिहिलेले शब्द मात्र आता पुसट भासू
लागले...
मी तसाच बाहेर पाऊस बघायला गच्चीत
आलो,
आयुष्य त्या पावसाच्या
थेंबासारखचं किती क्षणभंगुर आहे असा विचार
मनाला चाटून गेला,
पण ते थेंब मातीत विरल्यावर मात्र,
ओल्या मातीचा मात्र किती सुंदर गंध दरवळत होता,
चेहऱ्यावर का कोण जाणे पण एक
स्मितहास्य उमटलं...
-नितीश साने ©
No comments
Post a Comment