अलीकडेच तब्येत वरचेवर बिघडू लागली, म्हणून सारखी ड़ॉक्टर वारी होऊ लागली.
औषधे बदलून गुण येईना
आणि चाचण्या बदलून निदान होईना,
म्हणून डॉक्टरांनी तापसाची दिशाच बदलून टाकली.
आणि मग साधारण सगळेच "प्रोफेशनल" कंटाळा आला की खातं बंद न करता जशी पळवाट शोधतात तशी त्यांनी शोधली,
आणि मला कशाची तरी "ऍलर्जी डिक्लेर" करुन टाकली!
बऱ्याच खेपा झाल्या तरी कारण काही सापडलं नाही,
पण डॉक्टरांना अजून बरेच "होप्स" असल्यामुळे त्यांनी देखिल आशा सोडली नाही!
शेवटी आपणच पुढाकार घ्यायचा असं ठरवलं आणि स्वतःवरच प्रयोग करणं चालू केलं!
आहार बदलला, पाणी बदललं, पंखा नको म्हणून जागा बदलली,
सगळ्यापासून लांब गेलो तेव्हा खरी ती ऍलर्जी सापडली!
शेवटी असं ध्यानात आलं की आपल्याला माणसांपासूनच ऍलर्जी आहे!
मग हळूहळू जसे त्यातले एकेक घटक लक्षात येऊ लागले तेव्हा खत्री पटली!
होय! आपल्याला माणसांचीच ऍलर्जी आहे!
स्वतःला मॉडर्न समजून, आपल्या वागण्याची खिल्ली उड़वणाऱ्या माणसांची आपल्याला ऍलर्जी आहे!
छोट्या छोट्या गोष्टींवर गॉसिप करुन, प्रोफेशनल कुरकुर करणाऱ्या जेंटलमन लोकांची मला ऍलर्जी आहे!
जेवण झालं की हात न धुता, एकाच टिश्यू पेपरला पुसून गबाळ राहण्याला मॅनर्स समजणाऱ्या लोकांचीही आहे
आणि खुळखुळून चूळ भरणाऱ्यांकडे तोंड वाकड़ं करून पाहणाऱ्यांचीदेखिल आहे!
मग हळू हळू उपाय काय करता येईल याचा विचार करताना जाणवलं की,
दुसऱ्यांची पातळी ठरवून त्याप्रमाणे वगणाऱ्या या कर्तृत्ववान लोकांपेक्षा, आपली "कंडीशन" फारच बरी आहे,
चार - चौघात वाइट दिसेल म्हणून डब्यात शेवटचा घास टाकून देण्यापेक्षा, तो निपटुन खाण्यातच खरी सच्चाई आहे
आणि
सरबताचा शेवटचा घोट स्ट्रॉ ने सुरकन पिण्यातच खरी स्टाइल आहे!
त्यामुळे लवकर बरं होण्याचा उत्तम उपाय हा अश्या लोकांपासून लांब राहणं हाच आहे! प्रतिकार शक्ति वाढत आहेच हळूहळू, पण रॅश देखिल आता कमी होत आहे!
वाइट
फ़क्त एवढ्याच वाटतं आहे, की आजपर्यन्त शाळा - कॉलेजात
कधीच न सतावलेल्या या ऍलर्जीने अचानक ऑफिस मधे "जॉइन" झाल्यावरच डोकं वर
काढलं आहे!
-नितीश साने ©
No comments
Post a Comment