"स्वतःचेच विचार संग्रहित करून ठेवावेत म्हणून आपण ते कागदावर उतरवून काढतो, आपल्या आठवणींचा तो कागद जपून ठेवतो, नंतर जेव्हा काही दिवसांनंतर किंवा काही वर्षांनंतर ते उघडून आपण वाचतो तेव्हा आपल्याच चेहऱ्यावर स्मितहास्य उमटतं! तेव्हा जो स्वतःशी संवाद होतो तो म्हणजे एकांत! असाच संवाद कधीतरी व्हावा अशी इच्छा बाळगून हे लिहितो आहे, म्हणून हा एकांत!"

Thursday, 15 December 2016

हिटलिस्ट


हिटलिस्ट


खरं सांगतो तुम्हाला, अहो शाळेत असताना माझी पण एक हिटलिस्ट होती,
हिटलिस्ट म्हणजे ज्या - ज्या लोकांना एकदातरी "हिट" कारायचं अश्या लोकांची लिस्ट!
रोजनिशी वगैरे नाही लिहिली मी कधीच, पण हि हिटलिस्ट मात्र रोज लिहायचो मी.
कोणाचा कसा काटा काढायचा याची सविस्तर आखणी केलीली हि वही सांभाळून ठेवायचो मी!

फार कोणा बड्या लोकांची नावं नव्हती , पण कोण - कोण म्हणून नव्हतं या यादीत.
पहिल्या बाकावर बसणाऱ्या चोमड्या मॉनिटर पासून ते आमच्या गणिताच्या मास्तरांपर्यंत!
त्या चोमड्या रघुला ४-५ वेळा बुकलून काढून पण समाधान झालं नाही म्हणून त्याला यादीत टाकलं,
गणिताच्या मास्तरांशी पहिल्या दिवसापासूनचं वाकडं, शेवटपर्यंत वाकडच राहिलं.

लायब्ररीच्या मास्तरीणबाईंनी दुसर्याच्या हातून हरवलेलं पुस्तक मला शोधून द्यायला लावलं,
म्हणून त्यांचाही नाव टाकून दिलं आणि एकदिवस ह्यांच्याकडून पण श्रमदान करून घ्यायचं असं पुढे लिहून ठेवलं,
भूगोलाचा पृथ्वीचा गोल हरवला तेव्हा दंड घेतल्या नंतर,
याच गोळ्यानी आपण एक दिवस फुटबॉल खेळायचा असही लिहून ठेवलं.

हेड-मास्तरांनी त्यांच टिकली लावलेलं चित्र पाहून केलेल्या कानउघडणी नंतर,
यांच टिकली वालं चित्र एक दिवस नोटीस बोर्ड वर लावायचं असं ठरवून टाकलं.
आणि माझी सायकल पंक्चर करणाऱ्या समोरच्या वडापाववाल्या पोराची
हातगाडी पंक्चर करायची असंही पक्कं करून टाकलं!

मला माठ म्हणलेल्या एका इसमाच्या चकाकणाऱ्या गोटा खोबऱ्यावर टप्पल मारायची आणि
प्रात्यक्षिक परीक्षेच्या परीक्षेत कमी मार्क देणाऱ्या बाईंसमोर शाळा सोडताना काय डायलॉग बाजी करायची
अशी नवीन भर मी मागच्या बाकावरून रोज त्या यादीत घालायचो.
आणि रोज संध्याकाळी घरी आल्यावर एकदा उजळणी देखील करायचो!

पण निकाल लागला आणि पेढे द्यायला जेव्हा शाळेत गेलो,
तेव्हा या सर्व शत्रू पक्षाने माझं अगदी भरभरून कौतुक केलं
अचानक माझ्या मनातला त्यांच्या विषयीचं चित्रच पालटलं
घरी आलो तेव्हा त्या यादीतली काही नावं कमी केली.

आज हे सगळं आठवलं कि राग नाही गम्मत वाटते!
सुडाची हि यादी आता पोरखेळ वाटते!

तर तात्पर्य म्हणजे माझी हि हिटलिस्ट ची हरवलेली वही कोणाला सापडली असेल,
आणि त्यात कदाचित तुमच्या पैकी कोणाची नावं असतील तर कृपया राग मानून घेऊन नये,
माझ्या मनात असे काहीही नाही!!!




-नितीश साने ©

No comments

Post a Comment