"स्वतःचेच विचार संग्रहित करून ठेवावेत म्हणून आपण ते कागदावर उतरवून काढतो, आपल्या आठवणींचा तो कागद जपून ठेवतो, नंतर जेव्हा काही दिवसांनंतर किंवा काही वर्षांनंतर ते उघडून आपण वाचतो तेव्हा आपल्याच चेहऱ्यावर स्मितहास्य उमटतं! तेव्हा जो स्वतःशी संवाद होतो तो म्हणजे एकांत! असाच संवाद कधीतरी व्हावा अशी इच्छा बाळगून हे लिहितो आहे, म्हणून हा एकांत!"

Sunday 18 December 2016

विपश्यना

विपश्यना


वेळ रोजचीच होती, साधारण संध्याकाळी ७ - ७:३० ची! रस्त्यावर नेहमीसारखीच रहदारी होती. समोरचा सिग्नल तेव्हडा चुकायला नको म्हणून मी गाडी जोरात दामटत होतो; पण अखेर माझी गाडी जवळ आल्याची चाहूल त्याला लागली, तसा तो हिरवागार सिग्नल आपला रंग बदलू लागला व आधी पिवळा धमक होऊन तो एकदम लालबुंद झाला. नाईलाजाने मी गाडी थांबवली आणि याचा व्हायचा तोच परिणाम झाला! माझ्या मागच्या गाडीवाल्याने पुढली १० सेकंद तारस्वरात हॉर्न वाजवून माझ्या या कृत्याचा 'जाहीर ' निषेध केला.

        चहूबाजूंनी कचाकच हॉर्न दाबले जात होते. समोरच्या सुटलेल्या सिग्नलच्या मागच्या फळीने या हॉर्न चा वापर करून पुढल्या फळीची झोप उडवली आणि मग पुढच्या फळीतल्या लोकांनी याचा राग त्याच वेळी रस्ता ओलांडणाऱ्या लोकांवर काढत, त्यांना आपला आवाज दाखवून दिला. चौकाच्या कडेलगतच असलेल्या एका गणपती मंडळाच्या मांडवात प्रमुख पाहुणे भाषण व घोषणाबाजी करत होते. कदाचित भाषणाला तुरळकच गर्दी होणार याची मंडळाला पूर्वकल्पना असावी, आणि म्हणूनच चौकात सिग्नलला थांबलेले लोक म्हणजेच मुख्य श्रोते असा समज करून, त्यांना व्यवस्थित ऐकू जाईल असा दूरचा विचार करून ध्वनिव्यवस्था बसवलेली होती. शेजारच्या "ध्यानमंदिरातला" भटजी बहुतेक आपल्या रोजच्या कामाला कंटाळून की काय कोण जाणे, त्या मूर्तीवर भजन व आरतीच्या नावाखाली नुसता खेकसत होता आणि या सगळ्या गदारोळात सर्वात "कौतुकाची" गोष्ट म्हणजे, याउपर आवाज चढवून एक गजरेवाला त्या सिग्नल पाशी गजरे विकत होता. मी मात्र मनात शांतपणे समोरच्या सिग्नलचे उरलेले १० आकडे मोजत होतो. शेवटचे ३ आकडे आले तेव्हा अॅक्सलरेटर च्या आधी हॉर्न पिळून आपल्याला आता निघायचं याची आठवण मला मागच्या फळीने करून दिली. अखेर तो सिग्नल एकदाचा सुटला! काय सांगायचं? प्रत्येक सिग्नलची हीच गोष्ट!

          घरी आलो तेव्हा अंगणातूनच लक्षात आलं की नैसर्गिक रित्या मोठ्या आवाजाची देणगी लाभलेली एक मावशी घरी गप्पा मारायला आलेली आहे. अखेर जरा ताजेतवाने होऊन मावशीशी गप्पा मारल्या. मावशी निघाल्यावर जर हायसं वाटलं खरं, पण मावशी गेल्यावर दादाने जो वरच्या स्वरातला 'सां' लावला तो थेट जेवणाची पानं वाढल्यावरच थांबला.
काही शांतता म्हणून विचारू नका. नशिबाने आमच घर तेव्हडं वर्दळीच्या रस्त्याला नाहीये, पण रात्रीच्या वेळी वात्रट मुलांना 'आ-ऊ' करत ओरडत आपली फटफटी फिरवायला आमचीच गल्ली का मिळते हा प्रश्न निराळा. अहो! पूर्वी लोक रात्री झोपत असत. रात्री काय, मी तर असं ऐकलं आहे की म्हणे पूर्वी दुपारी पण लोकं झोपत असत व रस्त्याला अगदी दुपारीसुद्धा शुकशुकाट असायचा. तुम्हाला सांगितलं तर खोटं वाटेल, पण आमच्या इथे रात्री लोक इमारती बांधायला घेतात! गेली अनेक वर्ष आमच्या इथे कुठल्या न कुठल्या इमारतीच बांधकाम सुरूच आहे. बर हे मजूर लोक शांतपणे आपापलं काम उरकून जातील असं पण नाही. त्यांच्या घोषणा वगैरे प्रकार चालूच असतात, पण आपण जशा गाडीच्या किल्ल्या वगैरे वरून खाली टाकायला सांगतो ना, तसं हे मजूर लोक बहुदा, "दोन विटा टाक रे!" किंवा "दोन वाळूची पोटी टाक रे!" अशी देवाणघेवाण करत असावेत. तेथून येणाऱ्या आवाजाच्या पातळीवरून तरी असाच संशय येतो.
मध्ये मध्ये तर इतके मोठे आवाज येतात की ते तरी पडले किंवा त्यांची इमारत तरी पडली अशी शंका येते आणि मग झोपमोड होते. यात भर म्हणजे आमच्या खाली राहणाऱ्या गृहस्थांच 'दार' हि तर अशी गोष्ट आहे कि जी फक्त रात्रीच वाजते. हे दार तर इतक्या मोठ्यांदा वाजतं की रात्री दचकून जाग येते. "तीळा दार उघड" हि गोष्ट ऐकल्यावर ते दार कसं उघडत असेल वगैरे अशी कल्पना केली ना, की मला या खालच्या दाराची आठवण होते. इथली कुत्री काय रात्रीच भुंकतात काही काही विचारू नका!
अशा या गोंगाटाचा पूर्वी फक्त म्हाताऱ्या माणसांना त्रास व्हायचा, पण आता सर्वच लोकं या त्रासाला कंटाळून आपापल्या परीने यावर उपाय शोधू लागले आहेत.

         असाच एकदा आम्ही या अशांततेच्या विषयावर गप्पा मारत बसलो होतो तेव्हा अचानक एका सुपीक डोक्यातून सल्ला व विचारणा झाली, यावर उपाय म्हणजे आपण विपश्यनेला जाऊयात का?
मग बराच वेळ खिल्ली उडवून झाल्यावर शेवटी जर गांभिर्याचं वातावरण आलं! आणि मग "विचार करायला काय हरकत आहे?" इथपर्यंत प्रगती झाली. एकेक करत या विपश्यनेचे किस्से जसे सगळे जणं ऐकवू लागले, तसं हे प्रकरण वाटलं त्याच्यापेक्षा बरंच गंभीर आहे असं लक्षात आलं. एकाच्या मते तर हे आठवड्याभराच मौनव्रत, खायच्या प्यायच्या फक्त सकाळ-संध्याकाळच्या वेळा वगैरे एकंदर सगळा प्रकार म्हणजे फार जाचक शिक्षा आहेत.
मग आमच्यातल्याच एका कालिदासाने, "हे म्हणजे कोणीही नं सांगता अख्ख्या वर्गासमोर स्वतःहून जाऊन अंगठे धरून उभं राहण्यासारखं आहे." असं त्याच विस्तृत शब्दांकन केलं. आणि अशा या लांबलेल्या चर्चेचा व्हायचा तोच परिणाम झाला! दहा मधले ६ लोक सुरुवातीलाच गळाले. खरतर ६ हा आकडा अपेक्षेपेक्षा खूप कमी होता, पण उरलेल्या चार लोकांपैकी दोघांना यात फारच "थ्रिल" आहे असं वाटत होतं म्हणून ते अजूनही टिकून होते.

         मग हळूहळू जशी चर्चा पुढे गेली तशी बाकीच्यांनी विपश्यनेला जाणाऱ्या उमेदवारांना घाबरवायला आणि निराश करायला सुरुवात केली. मग हि विपश्यानेची तारीख थोडी पुढे ढकलली गेली आणि १५ दिवस विपश्यनेला जायच्या ऐवजी ४ दिवस पुण्याच्या जवळच असलेल्या एका मनःशांती विपश्यना केंद्रात हि छोटी विपश्यना करायची ठरवली.
मग हिमालयात वगैरे जायच्या आधी जसं ट्रेकर्स लोकं छोटे-छोटे गड किल्ले चढतात, सिंहगडावर जाऊन सराव करतात, तसा पावित्रा घेऊन, आम्ही पण विपश्यानेची तयारी म्हणून आमची "व्हॉटसअॅप अकौंटस, डीअॅक्टीवेट" केली. यामुळे आमच्या दोस्तमंडळींनी आमच्या मागे भरपूर टिंगल केली हे मला नंतर कधीतरी कळलं! पण यामुळे हे विपश्यना प्रकरण वाटलं होतं तेव्हडं अवघड नसावं अशी हळूहळू खात्री वाटायला लागली.
जशी जशी या विपश्यनेची तारीख जवळ येऊ लागली, तशी तशी आमची सरावसत्र वाढत गेली. मानसिक तयारी देखील झाली.सुदैवाने आमच्या चार जाणतील तरी अजून कोणी गळालं नाही. अखेर सर्व तयारी करून आम्ही मनःशांती केंद्रात आमचे ४ दिवसाचे सत्र 'बुक' करायसाठी गेलो. तिथे कोणीतरी साधू आमचे संस्कृतमध्ये स्वागत करेल अशी आमची अपेक्षा होती; पण तसं काहीच नव्हतं. एक साधं ऑफिस होतं, तिथे एक मॅनेजर बसले होते. त्यांनी इंग्रजी मध्ये आमचं स्वागत केलं. अखेर बाकी फालतूच्या गप्पा झाल्या आणि आम्ही मुद्द्यावर आलो, तेव्हा लक्षात आलं, की ४ दिवसाच्या या सत्राचा बांबू ५,००० रुपयांपर्यंत आमच्या खिशाला बसणार आहे.
मग अशा प्रसंगी सामान्यतः करण्यात येणाऱ्या वायफळ चौकश्या आम्ही चालू केल्या,
"साधारण किती दिवस आधी बुकिंग करायला लागेल?"
"अॅडव्हान्स म्हणून किती पैसे भरायला लागतील?"
आणि मग सगळ्यात शेवटचा इशारा म्हणजे,
"फोन वरून बुकिंग होतं का?"
होकारार्थी उत्तर आल्यावर, "मग आमचं ठरलं की फोन करतो" असं म्हणून आम्ही तिथून काढता पाय घेतला.
          त्यानंतर विपश्यनेचं खूळ आमच्या डोक्यातून गेलं. हा विषयदेखील थोडे दिवसांनी आमच्या डोक्यातून नाहीसा झाला. परत असा कधी वैताग आलाच तर आम्ही सगळे आसपासच्या कुठल्यातरी निर्जन डोंगरावर जातो, सगळा दिवस धमाल करतो, सूर्यास्त बघतो आणि मग असंच मावळत्या सूर्याबरोबर या आमच्या आठवणी मावळू नयेत म्हणून एकमेकांचे 'फोटो, शेयर' करतो आणि परतीच्या प्रवासाला निघतो! हीच खरी विपश्यना!



-नितीश साने ©

1 comment