"स्वतःचेच विचार संग्रहित करून ठेवावेत म्हणून आपण ते कागदावर उतरवून काढतो, आपल्या आठवणींचा तो कागद जपून ठेवतो, नंतर जेव्हा काही दिवसांनंतर किंवा काही वर्षांनंतर ते उघडून आपण वाचतो तेव्हा आपल्याच चेहऱ्यावर स्मितहास्य उमटतं! तेव्हा जो स्वतःशी संवाद होतो तो म्हणजे एकांत! असाच संवाद कधीतरी व्हावा अशी इच्छा बाळगून हे लिहितो आहे, म्हणून हा एकांत!"

Sunday 18 December 2016

उमेद

thumbnail 1 summary
उमेद


लहान होतो खूप मी तेव्हा साधारण सगळे पालक करतात तसं माझ्या पण पालकांनी केलं,
आणि मला एका छंदवर्गात घातलं,
तेव्हा काय वाटलं असेल आता नक्की काही आठवत नाही,
पण फार काही आनंदाने मी त्यातलं काही केलं असेल असं आज तरी वाटत नाही!

छंदाची तरी काही कुठल्या आवड निर्माण झाली नव्हती,
मग साधारण सगळ्यांच्या बाबतीत होतं तसच पुन्हा एकदा झालं,
आणि मला एकदाचं शाळेत घातलं!
शाळेत देखील मी काही फार खुशीनी गेलो नाही,
मित्रांच्या संगती मूळे थोडी फार खेळाची आवड निर्माण झाली, संगीत वगैरे शिकावं अशी इच्छा निर्माण झाली,
त्यामुळे मीदेखील तात्पुरती वेळ निभावून नेली!

थोडा मोठा झालो तसं हळू हळू जाणीव होऊ लागली की असं आयुष्य पुढे रेटत राहण्यात काही अर्थ नाही,
मग साधारण सगळे युवक जे करतात त्याप्रमाणे मीदेखील काही भाषणं ऐकली, पुस्तकं वाचली,
कोणाच्या तरी भाषणाचा परिणाम म्हणून काही वाक्य मनावर ठसली गेली, की
"जगात करण्यासारखं भरपूर काही आहे, तुम्हाला ज्यात कशात आकर्षण वाटत असेल त्याच्याशी एकरूप होऊन जगा तुम्ही आयुष्यात नक्की यशस्वी व्हाल!"

या सगळ्याचा अर्थ लावण्यात काही वर्ष गेली तेव्हा लक्षात आलं की,
"या जगात आकर्षण वाटण्यासारख बरंच काही आहे, तेव्हा कुठल्या एका गोष्टीशी अनुरूप होऊन वगैरे आपल्याला काही जगता येणार नाही."
तरीदेखील काही गोष्टींमध्ये रस निर्माण झाला. कोठेतरी कल झुकतोय असं वाटू लागलं,
पण जाणीव झाली की छंद लागायचं वय आता संपलं, आणि मग कट्ट्यावर बसून लागायला नकोत, ते छंद लागले!
ते मौज - मजेचे दिवस बघता बघता सरले, खुंटलेली शैक्षणिक प्रगती दाखल्यासकट जाहीर झाली!

मग साधारण माझ्यासारखी अरसिक, विशेष कुठला पर्याय नसलेली लोक जिथे जातात तिथे माझी रवानगी झाली,
कोणाच्या तरी ओळखीने एक बँकेची नोकरी येउन चिकटली!
बँकेत अनेक लोकांशी गाठी भेटी झाल्या,
लोक आयुष्यात काय काय करामती करतात याच्या गमती जमती पहिल्या, ऐकल्या,
आणि मग काही अर्धवट सोडलेल्या गोष्टी पूर्ण कराव्याश्या वाटू लागल्या!

सोडलेला पेटी चा सराव चालू केला, महाविद्यालयात विशिष्ट प्रसंगानंतर सोडलेल्या कविता परत चालू केल्या,
ग्रह तार्यांच असलेलं आकर्षण म्हणून एक दुर्बीण विकत आणली,
सगळ्यात महत्वाच म्हणजे गेली काही वर्ष बंद असलेला व्यायाम चालू झाला,
नेमका या सगळ्याला आळा बसायला एक निमित्त मिळालं आणि माझं लग्न झालं.

यानंतर साठी पर्यंत विशेष काही सांगण्यासारखं घडलं नाही.
त्यानंतर मात्र वेळच वेळ मिळू लागला, रोज "जुने - जुने" मित्र भेटू लागले,
मग "हास्य क्लब", "भजनी मंडळ" याच्या निमित्त अनेक कार्यक्रमाला जाऊ लागलो,
नवीन गाठी भेटी, नवीन लोकं अशा ओळखी होत गेल्या आणि आपल्या आवडीच्या करायसारख्या बऱ्याच गोष्टी करायच्या राहून गेल्या आहेत याची पावलो पावली जाणीव होऊ लागली.

मग मी एक नवीन शिकण्याच्या गोष्टींची यादी बनवली, त्याप्रमाणे दिनचर्या आखली,
ते मी बर्यापैकी पळू लागलो! ही यादी देखील हळू हळू वाढत चालली होती,
पण दुर्दैवाने काही गोष्टी यादीतून छाटायला लागल्या,
 रोजच्या दैनंदिन कामांना लागणारा वेळ दिवसेंदिवस वाढू लागला.
अनेक कामांसाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहावं लागू लागलं.
कधी कधी खूप हताश - निराश वाटू लागलं, त्या दुखाताच अजून भर पडली आणि माझी सहचारिणी दगावली."

हळू हळू खूप भकास वाटू लागलं, सगळं घर गिळायला उठलय असं भासू लागलं,
खूपच उदास वाटू लागलं एकदा तेव्हा,
असाच सगळा पसारा काढून बसलो होतो जुन्या आठवणींचा!
तेव्हड्यात नातू आला माझा, माझी भिंतीवरची यादी पहिली आणि मला म्हणाला,
"आजोबा यादी छान आहे तुमची, मला पण शिकायचं यातलं काय काय!"
मला कौतुक वाटलं त्याच खूप. मी लहान असताना मला का नव्हती एव्हडी समज?

नंतर त्यांनी मला खूप प्रश्न विचारले,
" तुम्ही पेटी खूप छान वाजवता, तुम्ही पेटी चे क्लासेस का नाही घेत?"
" तुमचा कविता संग्रह किती छान आहे! कुठे छापून वगैरे आल्या होत्या कविता?"
असे खूप सारे! मी मात्र एकाच उत्तर देत राहिलो, "राहून गेलं बघ तेव्हा!"

फार प्रकर्षाने आज लक्षात येतंय की शिकण्यासारखं आणि करण्यासारखं खूप काही आहे!
अनेक छंद जोपासायचे आहेत, अनेक कला आत्मसाद करायच्या आहेत,
"वाईट फक्त एवढ्याच वाटतंय की हे समजायला मात्र खूप उशीर झालाय!
आणि हे देखील आजच जाणवतंय की आयुष्य मात्र आपल्याकडे एकचं आहे;
आयुष्य मात्र आपल्याकडे एकचं आहे!








थांबणार होतो इथेच खरंतर!

 पण हे लिहिलेलं देखील माझ्या नातवाने पाहिलं आणि मला म्हणाला,
"आजोबा असा नाउमेद नाही करायचं कोणाला असं काहीतरी लिहून!"
त्यानी त्याचा मोबाईल बाहेर काढला आणि मला एक छानसा व्हीडीओ दाखवला,

त्यामध्ये अनेक घटना होत्या, "लंडन मधल्या एका आजीबाईने वयाच्या ६८ व्या वर्षी आपले कुटुंब एका कार  अपघातात गमावले, त्यानंतर करायचं काय? म्हणून नाच शिकायला चालू केला आणि ती आता वयाच्या ८२ व्या वर्षी जागतिक दर्जाच्या एका स्पर्धेत सहभागी होतेय म्हणे!"
"अशाच एका आजीने बेघर आणि एकटीने जगत असताना एक धाडसी निर्णय घेतला, आणि वयाच्या ८४ व्या वर्षी स्वतःचा पिशव्या शिवायचा व्यवसाय चालू केला! आज वयाच्या ९२ व्या वर्षी ती शहरातली सर्वात श्रीमंत म्हातारी आहे म्हणे!"

खूप बरं वाटलं ते पाहून! कोणीतरी असं झटकन दुख्खाच्या गर्तेतून बाहेर काढल्यासारख वाटलं!
यावर नंतर खूप विचार केला, की मी काय करू शकतो?
तेव्हा उत्तर सापडलं, की मी अजूनही "शेवट" बदलू शकतो!
म्हणून मी ठरवलाय आता "शेवट"! आणि मग शीर्षक पण बदललं! या छोट्याश्या पुरणाच शीर्षक "उशीर" असं ठेवलं होतं आधी! आता ते बदलून उमेद असं ठेवतोय!





-नितीश साने ©

No comments

Post a Comment