"स्वतःचेच विचार संग्रहित करून ठेवावेत म्हणून आपण ते कागदावर उतरवून काढतो, आपल्या आठवणींचा तो कागद जपून ठेवतो, नंतर जेव्हा काही दिवसांनंतर किंवा काही वर्षांनंतर ते उघडून आपण वाचतो तेव्हा आपल्याच चेहऱ्यावर स्मितहास्य उमटतं! तेव्हा जो स्वतःशी संवाद होतो तो म्हणजे एकांत! असाच संवाद कधीतरी व्हावा अशी इच्छा बाळगून हे लिहितो आहे, म्हणून हा एकांत!"

Tuesday 27 December 2016

भेडाघाट

भेडाघाट (Bhedaghat) thumbnail 1 summary
भेडाघाट (Bhedaghat)


राज्य: मध्य प्रदेश
जवळचे शहर: जबलपूर
जवळचे रेल्वे स्थानक: जबलपूर


       मध्य प्रदेशात जबलपूर पासून जवळ नर्मदेच्या तीरावर असलेला भेडाघाट म्हणजे म्हणलं तर धबधबा, म्हणलं तर बाजारपेठ, कोणासाठी चौपाटी, कोणासाठी पर्यटनस्थळ!
अशी सुरुवात करायचं कारण म्हणजे एखादा पर्यटनस्थळाला शहरीकरणाचं स्वरूप आलं कि जे होतं तेच या भेडाघाटाचं झालं आहे.

       भेडाघाट बघितला कि याला धूआंधार असं नाव का पडलं असावं याची लगेच कल्पना येते! नर्मदेचं निळंशार पाणी, चहूबाजूंनी संगमरवरी खडकाच्या टोकदार शिळांनी वेढलेलं पात्र आणि तेथून कोसळणारा हा भेडाघाटचा धबधबा. खरं तर याला धबधबा म्हणणं भौगोलिकदृष्ट्या कितपत योग्य आहे माहित नाही, पण उंचावरून पाणी खाली पडताना जे दृश्य दिसत त्याला ढोबळपणे धबधबा म्हणायला काही हरकत नाही.



       भेडाघाटाचं किंवा नर्मदेचंच आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे येथील संगमरवराची बाजारपेठ! हा घाट बघूनच इथून अतिशय चांगल्या दर्जाचा संगमरवर उपलब्ध होत असावा असं नजर कुठेतरी मनाला सांगतेच. मग याच संगमरवराच्या भेडाघाटच्या प्रतिकृती, किंवा अन्य उपयोगांसाठी संगमरवराची केलेली विक्री, अश्या स्वरूपाची एक छोटोशी बाजारपेठ येथे आहे!
तसेच पर्यटनस्थळ म्हणलं कि मग होणारे चौपाटीचे स्वरूप आणि नेहमी दिसणारे खाद्यपदार्थ हे देखील आलेच!


       भेडाघाटातून म्हणजेच नर्मदेच्या पात्रातून बोटींग करायची देखील सोय येथे उपलब्ध आहे. तसेच पलीकडच्या तीरावर जायची रोपवे देखील आहे. बोटींग करायची तुमची तयारी असेल तर अर्थात रांगेत उभं राहायची तपश्चर्या देखील आलीच. दुर्दैवाने वेळ कमी असल्यामुळे मला हे अनुभवता आलं नाही. पण येथे बोटींग करण्याचा अनुभव किती निराळा असेल याची चित्रं जेव्हा मानाने रंगवण्यास सुरुवात केली, तेव्हा एक चांगली संधी दवडल्याची हळहळ लागून राहिली एव्हडं मात्र खरं! रोपवे वारी मात्र आम्ही करून आलो! रोपवे मधून तर या भेडाघाटाचं रूप आणखीनच लोभस दिसतं!

रोपवे मधून दिसणारे दृश्य


       तेव्हा मध्यप्रदेशात, विशेषतः जबलपुरात जर का तुम्ही गेलात तर भेडाघाटाचं दर्शन घेऊन येणं म्हणजे खरं नेत्रसुख! अर्थात तुम्ही खरेदी करायला जाणार असाल तर कदाचित तुम्ही सोबत भेडाघाटाचं शिल्प घेऊन याल, खवय्येगिरी करण्यासाठी जाणार असाल तर कदाचित कणीस, बोरं किंवा अजून अशी काही फळे किंवा एखादी कुल्फी वगैरे खाऊन याल! आणि जर तुम्ही भटकंती म्हणून जाणार असाल तर तुम्ही भेडाघाट पाहिल्यानंतर कदाचित म्हणाल,
"नर्मदे हर हर!"



-नितीश साने ©

1 comment

  1. To be a part of "भटकंती वेडे" whats-app group post your contact number in comments section!

    ReplyDelete