"स्वतःचेच विचार संग्रहित करून ठेवावेत म्हणून आपण ते कागदावर उतरवून काढतो, आपल्या आठवणींचा तो कागद जपून ठेवतो, नंतर जेव्हा काही दिवसांनंतर किंवा काही वर्षांनंतर ते उघडून आपण वाचतो तेव्हा आपल्याच चेहऱ्यावर स्मितहास्य उमटतं! तेव्हा जो स्वतःशी संवाद होतो तो म्हणजे एकांत! असाच संवाद कधीतरी व्हावा अशी इच्छा बाळगून हे लिहितो आहे, म्हणून हा एकांत!"

Friday 30 December 2016

कैलासगड (kailasgad)

कैलासगड ( kailasgad) thumbnail 1 summary
कैलासगड (kailasgad)


सुरुवात : वडुस्ते गाव (ताम्हिणी)                          Base village : vaduste 
ट्रेकची अवघडपणाची पातळी : मध्यम                       Difficulty level : medium
सार्वजनिक वाहतूक : जवळजवळ नाहीच,                                    Public transport : not available   
                 असलीच तरी भरवशाची नाही.


ताम्हिणी किंवा मुळशी परिसर म्हणलं कि खरं तर तिथे गड, किल्ला, गुहा वगैरे यातलं काही जरी नसलं तरी नुसतं भटकायला सुध्दा मी एका पायावर तयार असतो! याच कारण म्हणजे एकतर तिथला समृद्ध परिसर, घनदाट आणि सहज जाता येऊ शकणार जंगल आणि त्यात जर पावसाळा असेल तर मग तर हा परिसर म्हणजे भटकंतीसाठी पर्वणीच!

तेव्हा अश्याच एका पावसाळी भटकंतीसाठी कैलासगडाचा पर्याय निवडला. पण ताम्हिणीत जाऊन देखील फक्त १ किल्ला करून परत यायचं एवढ्यावर मन समाधान मानणं शक्यच नव्हतं.
म्हणून मग पळसे धबधबा, पिंपरी पाझर तलाव आणि independence point, कैलासगड आणि डोंगरवाडीचा धबधबा असा बेत आखला. जमल्यास येता येता भिरा धरण देखील करून यायचं असं मनात ठरवलं होतं! हे सगळं ठरवतानाच आपण फार जास्त गोष्टी ठरवतो आहोत असं क्षणभर वाटलं खरं, पण अशा वेळेस आणि भटकंतीच्या बाबतीत मी steve jobs यांच्या "stay hungry, stay foolish!" या वाक्याचे तंतोतंत पालन करतो! थोडी नीट आखणी केली तर सहज शक्य होईल असं ठरवून मी कैलासगडा चा बेत पक्का केला!

कैलासगड,   छायाचित्र: मंदार खारपुडीकर

कैलासगडला  जाण्यासाठी मात्र सार्वजनिक वाहतूक सुविधा अगदीच बेभरवशाची आहे! कैलासगड तसा दुर्लक्षित राहण्याचं हेच प्रार्थमिक कारण आहे. सुदैवाने आमचा ग्रुप मोठा असल्यामुळे आम्ही खासगीच गाडी केली!

ट्रेकच्या दिवशी मोठ्या गटाने जाऊन सुध्दा कोणीही गळालं नाही हि एक आणखीन चांगली बाब! आम्ही साधारण ७ च्या सुमारास पुण्याहून निघालो. आमचा पहिला स्टॉप पळसे निश्चित झाला! तिथे नाश्ता करून मग आम्ही धबधब्याकडे निघालो. (पळसे सोडल्यावर पुढे जेवणाची फारशी सोय नाही, तेव्हा डबे नसल्यास पळश्यातूनच बरोबर जेवण घेऊन जाणे केव्हाही उत्तम!)
पळसे धबधब्याचे वैशिष्ट्य म्हणजे हा धबधबा खालून अगदीच साधा दिसतो. परंतु धबधब्याच्या उजवीकडून डोंगरावर जायला एक वाट जाते. त्या वाटेवरून चढून गेलं कि साधारण एक २०-२५ फुटांवरून कोसळणारा आणखीन एक धबधबा आहे आणि मग पुढे अशी छोट्या छोट्या धबधब्यांची रांगच लागते. त्यातून डोंगरावरून दिसणारे आजूबाजूच्या परिसराचे सौंदर्य मनाला मोहून टाकणारे आहे.

पळसे धबधबा, छायाचित्र: अनिकेत तमन्नावार
पळसे धबधब्यात मनसोक्त खेळून झाल्यावर आम्ही मग कैलासगडाकडे निघालो. पाण्याचा प्रवाह बराच असल्यामुळे आणि वरून वरुणराजा आमच्यावर मेहेरबान असल्यामुळे फारसे फोटो मात्र काढता आले नाहीत.

पळसे धबधबा, छायाचित्र: अनिकेत तमन्नावार

पळसे धबधबा, छायाचित्र: अनिकेत तमन्नावार

कैलासगडाकडे जायला ताम्हिणी गाव ओलांडलं कि पिंपरी गावाकडे जाण्यासाठी जो फाटा लागतो तिथून (उजवीकडे) वळावे लागते. तिथून वडुस्ते गावाकडे जायचा रास्ता सरळ आहे. रस्ता कच्चा असल्यामुळे चालकाला आणि गाडीमालकाला थोडा त्रास होतो, पण हि दोन्ही पदं तुमच्याकडे नसतील तर तुम्ही आजूबाजूचं दाट जंगल, डोंगर - दर्या आणि धबधब्यांचा आनंद नक्कीच घेऊ शकता!     

पिंपरी पाझर तलाव - अंधारबनाची सुरुवात, छायाचित्र: मंदार खारपुडीकर

वडुस्त्याला पोहोचल्यावर फार वेळ ना दवडता आम्ही लगेच कैलासगडावर चढाई चालू केली. वांद्रे गावातून देखील एक वाट कैलासगडाकडे जाते. खरं तर माहितीसाठी जे ब्लॉग वाचले होते त्यात कैलासगडाची "difficulty level - easy दिली होती, परंतु चढायला चालू केल्यावर मात्र हा ट्रेक जितका वाटला होता तितका सोपा नाही हे लक्षात येऊ लागलं. वाट तशी अवघड नव्हती खरं तर, पण चढताना डावीकडे पूर्ण दरी असल्यामुळे  आणि एकदोघांचे निसरड्या वाटेवरून घसरून झाल्यामुळे थोडी अवघड वाटत होती!

छायाचित्र: मंदार खारपुडीकर

अर्ध्या वाटेपर्यंत गेल्यावर मात्र हळू हळू गटातल्या सदस्यांचं चढायचं अवसान गळू लागलं. चढण पण तशी खडी होती आणि वाट देखील अतिशय चिंचोळी. मग तिथल्याच पठारावर आम्ही काही वेळ थांबलो. तिथून मुळशी धरणाचे अतिशय सुंदर दृश्य दिसत होतं! 

कैलासगडावरून दिसणारे मुळशी धरण, छायाचित्र: मंदार खारपुडीकर

काही सदस्यांनी मग तिथेच थांबायचा निर्णय घेतला. मंडळी जशी सावरू लागली तशी त्यांना आपल्याला येथे कोण घेऊन आलं ह्याची जाणीव होऊ लागली, आणि मग साहजिकच मला उचकी लागली. अजून काही लागायच्या आत मग मी उत्साही सदस्यांना गोळा केलं आणि आम्ही पुढे निघालो. परंतु आणखीन एकाचा तोल गेला आणि मग पुढच्या वाटेवर कोणाचा तोल गेला तर काय होईल याची चर्चा चालू झाली. मग आम्ही गुपचूप माघारी फिरलो. कारण पुढची वाट अजूनच चिंचोळी आणि दरीला लागून होती. आजपर्यंतचा पूर्ण न करता परत आलेला हा एकमेव ट्रेक...


कैलासगड

गडावर न पोहोचल्याच वाईट वाटत होतं पण मला एखाद्या किल्ल्यावर तिथली पडझड झालेली तटबंदी किंवा तुटका बुरुज अथवा पाण्याचं एखादा टाकं वगैरे तत्सम गोष्टी पाहण्यात फारसा रस नसतो, त्यामुळे तितका हिरमोड झाला नाही. मुळशी परिसराच्या त्या मोहक दृश्यावर समाधान मानून आम्ही परत निघालो.

परतताना अर्थात पुढचा स्टॉप हा पिंपरी पाझर तलाव ठरला होता. धुकं खूप असल्यामुळे आम्हाला इंडिपेंडंस पॉईंट वरून दिसणारा नजारा पाहता आला नाही. मग आम्ही पाझर तलावात पुन्हा एकदा पाण्यात मनसोक्त खेळून घेतलं. बाहेर आलो. 

"भटकंती वेडे"

तोपर्यंत दुपारचे ३ वाजले होते. एव्हानं सगळ्यांच्या पोटात कावळे ओरडू लागले होते. मग बराच वेळ गाडी हाकून देखील हॉटेल मिळेना. तेव्हा आता डोंगरवाडी आणि भिरेच्या प्लॅन वर पाणी सोडावं लागणार अशी कल्पना मला अली. अखेर एकदाचं एक हॉटेल सापडलं. जेवण यायलाच तिथे तासभर गेला. तासाभरानंतर आम्ही अतिशय सुमार भोजन करून तिथून उठलो. यानंतर पुन्हा कुठे जायची मी सोडून कोणाचीच इच्छा नसल्यामुळे पुन्हा परतीच्या वाटेला लागलो.

परतताना माझ्या ठरवलेल्या प्लॅन मधली आणि आम्ही केलेल्या भटकंती मधली तफावत अधिकच स्पष्ट जाणवू लागली. परंतु तसं असलं तरी आम्ही भरपूर मजा केली आणि आपण अनेक कायम लक्षात राहतील अश्या आठवणी घेऊन परत निघालो आहोत हे देखील तितकंच जाणवत होतं!




-नितीश साने ©

1 comment

  1. To be a part of "भटकंती वेडे" whats-app group post your contact number in comments section!

    ReplyDelete