"स्वतःचेच विचार संग्रहित करून ठेवावेत म्हणून आपण ते कागदावर उतरवून काढतो, आपल्या आठवणींचा तो कागद जपून ठेवतो, नंतर जेव्हा काही दिवसांनंतर किंवा काही वर्षांनंतर ते उघडून आपण वाचतो तेव्हा आपल्याच चेहऱ्यावर स्मितहास्य उमटतं! तेव्हा जो स्वतःशी संवाद होतो तो म्हणजे एकांत! असाच संवाद कधीतरी व्हावा अशी इच्छा बाळगून हे लिहितो आहे, म्हणून हा एकांत!"

Wednesday 11 January 2017

प्लस व्हॅली (plus valley)

प्लस व्हॅली ( plus valley) सुरुवात: निवे गाव पुण्यापासूनचे अंतर: ७० किलोमीटर    ट्रेक: मध्यम अवघड वाहतूक: खासगी (स्वतःची बाईक अस... thumbnail 1 summary
प्लस व्हॅली (plus valley)

सुरुवात: निवे गाव
पुण्यापासूनचे अंतर: ७० किलोमीटर   
ट्रेक: मध्यम अवघड
वाहतूक: खासगी (स्वतःची बाईक असणे उत्तम, ऍक्टिवा देखील चालेल)


मानवी वस्ती पासून दूर कुठे तरी अतिशय शांत आणि निसर्गरम्य वातावरणात तुम्हाला जर का एखादा दिवस घालवावासा वाटत असेल तर प्लस व्हॅली सारखे दुसरे ठिकाण शोधून सापडणार नाही! आजपर्यंत मी जेव्हडे ट्रेक केले त्यातल्या कायम लक्षात राहतील अश्या ट्रेक पैकी एक म्हणजे प्लस व्हॅली!

प्लस व्हॅली, छायाचित्र: प्रितेश अगरवाल

अंधारबनाचा ट्रेक केल्यापासूनच खरं तर या व्हॅली वर आमचा डोळा होता! अंधारबनावरून दिसणारे प्लस व्हॅलीचे दृश्यच एवढे मोहून टाकणारे होते कि कधी एकदा आपण इथे जातो, असे झाले होते! अखेर एकदाचा या प्लस व्हॅलीला जायचा बेत ठरला!

आम्ही थंडीत प्लस व्हॅलीला जाण्याचा पर्याय निवडल्यामुळे हा ट्रेक तितका अवघड वाटला नाही. परंतु पावसाळ्यात जर का येथे जायचा बेत तुम्ही आखत असलात तर अतिशय काळजीपूर्वक सर्व प्लॅन करणे आवश्यक आहे. 
प्लस व्हॅलीला निवे गावातून जाणारी वाट हि सर्वात प्रचलित वाट आहे! डोंगरदवाडीतून देखील एक वाट जाते, पण त्याबद्दल फारशी माहिती नसल्यामुळे, आम्ही निवेचाच पर्याय निवडला. निवे गावापासून पुढे साधारण १ किलोमीटर अंतरावर एक पाटी लागते, तेव्हडीच प्लस व्हॅलीमध्ये उतरायची एकमेव खूण! येथे जाण्यासाठी सोयीस्कर अशी सार्वजनिक वाहतुकीची सुविधा नाही, तेव्हा आपापली गाडी घेऊन गेलेलेच उत्तम!

प्लस व्हॅलीमध्ये उतरायची खूण
छायाचित्र: पंकज वाडेकर

आम्ही देखील मग पळश्याला वाटेत नाश्ता करून मग पुढे निव्याला निघालो! पोहोचेपर्यंत नाही म्हणलं तरी दोन अडीच तास लागले. घाटाच्याच कडेला गाड्या पार्क केल्या आणि उतरायला सुरुवात केली. सुरुवातीचे दृश्य पाहून क्षणभर आपण येऊन चूक केली कि काय असेच वाटले. कारण तिथून खाली वाट जात असेल असे बघून वाटतच नव्हते. त्यातच आम्ही ज्याच्या भरवशावर येथे आलो होतो त्यानेच घसरत ५-6 फूट खाली जाऊन ट्रेकचा श्री गणेशा केला! पण जशी उतरायला सुरुवात केली तसं वरून दिसतं तितकी काही वाट अवघड नाही हे लक्षात आलं आणि मग मंडळींचा जोश वाढला!
या ट्रेकचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, पहिली थोडी मातीची वाट संपली कि मग अतिशय मोठमोठ्या शीळांमधून पुढे वाट जाते आणि याच वाटेवरून पाण्याचे छोटे ओहोळ तुम्हाला ट्रेक संपेपर्यंत साथ देतात! पावसाळ्यात हि व्हॅली किती रौद्र रूप धारण करत असेल याचा अंदाज व्हॅली मध्ये उपलब्ध असलेल्या पाण्याच्या पातळीवरून सहज येतो!

प्लस व्हॅलीची वाट
छायाचित्र: ऋतुराज जगताप

वाटेवरून वाहणारे पाण्याचे झरे
छायाचित्र: अथर्व परचुरे

ट्रेकची सुरुवात आणि एक दोन ठिकाणी थोडासा रॉक पॅच वगळता बाकी वाट तशी सोपीच आहे. पूर्ण खालपर्यंत, म्हणजे देवकुंड धबधब्याच्या सुरुवाती पर्यंत पोहोचण्यासाठी साधारणतः दोन - सव्वादोन तास लागतात. तेथून पुढे जर का तुम्हाला जायचं असेल तर रोप आणि रॅपलिंग शिवाय ते शक्य होत नाही. मग हा रस्ता पुढे देवकुंड आणि शेवटी भिरा गावातून बाहेर पडतो.

वाटेत भेटलेला रॅपलर्सचा गट
छायाचित्र: अविनाश गायकवाड

खाली उतरताना मग एका वाटेवर थोडीशी झाडी आणि आजू - बाजूला छोटंसं जंगल लागलं. तसेच आम्हाला वाटेत तंबू ठोकून मुक्काम केलेले आणि एका रॉक पॅच वर रॅपलिंग करणारे काही उत्साही लोकही भेटले. मग पहिल्या डोंगराचा भाग संपतो तिथून हि वाट पुढे उजवीकडे कुंडांकडे जाते आणि डावीकडे एका छोटा धबधबा लागतो! व्हॅली उतरून आम्ही खाली जेव्हा आलो तेव्हा आम्हाला पाहिलं कुंड लागलं!

पहिले कुंड
छायाचित्र: ऋतुराज जगताप
धबधब्याकडे जाणारी वाट

या कुंडातील पाणी इतकं स्वच्छ होतं कि त्याचा तळदेखील स्पष्ट दिसत होता! आजवर कुठल्याच तलाव अथवा कुंडात मी इतकं निळंशार पाणी बघितलं नाहीए! पण तेथील एका गटाने केलेली गर्दी पाहून आमच्यातल्याच एका आधी जाऊन आलेल्या मित्राने आम्हाला पुढील आणखी मोठ्या कुंडाचे आमिष दाखवले!

प्लस व्हॅलीतील कुंड

तेथून पुढे गेल्यावर दुसरे कुंड म्हणजेच देवकुंड धबधब्याचे पहिले कुंड लागले! हे कुंड पाहून खरं तर थोडी निराशा झाली, कारण ते पाहूनच येथे खाली उतरता येणार नाही याची खात्री पटली! पण समोरून जे दृश्य दिसत होते ते पाहून निसर्गाच्या छायेतली शांतता आणि डोळ्यांसाठी असलेला नजराणा म्हणजे काय याची जाणीव झाली! 

प्लस व्हॅली चा शेवट, समोर दिसणारा अंधारबनाचा भूभाग आणि देवकुंडची सुरुवात
छायाचित्र: प्रितेश अगरवाल

खाली कुंडामध्ये आणि आजूबाजूच्या व्हॅली मध्ये भरपूर वेगवेगळ्या प्रजातीची फुलपाखरे दिसली! एकूणच तुम्हाला फुलपाखरांमध्ये रस असेल तर ताम्हिणी घाट तुम्हाला नक्कीच प्रसन्न करेल!

छायाचित्र: प्रितेश अगरवाल
छायाचित्र: प्रितेश अगरवाल

मग तिथेच आमच्या गटातल्या दोघांच्या काही गाठी भेटी झाल्या! कोणी ओळखीचा चेहरा अश्या अनोळखी ठिकाणी भेटेल याची त्यांना देखील कल्पना नसावी. बराच वेळ त्या दोघांची चर्चा झाली आणि मग आमच्यातला जो मित्र बोलत होता तो अचानक कुंडाच्या दिशेने खाली उतरू लागला. आम्ही लगेच "नको नको"  म्हणत खाली न जाण्याचा सल्ला दिला, कारण खाली कमीत कमी १५-२० फूट तरी खोल कुंड होतं आणि कुंडाच्या पलीकडे साधारण ६०-७० फूट खोल दुसरं कुंड होतं जिथून वर येणं तर केवळ अशक्य होतं. इथून जर चुकून तुमचा तोल गेला तर फार फार तर दुसऱ्या कुंडाला तुमचं नाव देण्यात येऊ शकेल. पहिल्या कुंडातून देखील वर यायची नीटशी वाट अशी दिसत नव्हती. खाली जायला तर वाट नव्हतीच. पण मग एका पॉईंट पाशी जाऊन स्वारी थांबली. आम्ही परत यायची सूचना करू लागलो. पण त्यानी जणू आमच्या सूचना ऐकल्याचं नाहीत... क्षणाचाही विचार न करता त्यानी तिथून थेट कुंडात उडी मारली. आम्ही सर्व होतो त्या जागेवर उठून उभे राहिलो. शेवटी मग तो पोहत पोहत काठावर आला. आता हा इथून वर कसा येतो याकडे सर्वांच्या नजरा लागल्या. बराच वेळ विचार करून व बराच प्रयत्न करून देखील वर येता येत नाही हे अखेर त्याच्या लक्षात आलं. मग ज्या इसमाशी त्याच्या इतका वेळ गप्पा चालू होत्या तो एक प्रोफेशनल रॉक क्लाइम्बर निघाला! त्यानी अखेर जाऊन "मार्ग" "दर्शन" केलं आणि दोघंही सही सलामत वर आले. मग आम्ही सगळ्यांनी त्याला वेड्यात काढलं. पण एवढ्यावर भागलं नाही. त्याला सही सलामत आलेलं पाहून दुसऱ्या एका मित्राला देखील उडी मारायचा मोह झाला. मग आधीच्याच गोष्टीचा अॅक्शन रिप्ले पाहायला मिळाला. थोड्या वेळाने मग आम्हाला आधी जो ग्रुप दिसला होता त्यातले देखील लोकं ह्या वेडेपणाला बळी पडू लागले.

कुंडात उडी मारताना
छायाचित्र: सुरज गायकवाड
कुंडातून वर यायची वाट
छायाचित्र: अथर्व परचुरे

शेवटी मग ५-६ जणं सही सलामत बाहेर आलेले पाहून मला पण राहवेना. त्यातून आमच्यातल्याच एका मित्राने आग्रह धरला आणि अर्थात धीर देखील दिला. तेव्हा मी पण उडी मारायची असं ठरवलं! उडी मारताना थोडी धडधड वाढली खरी, पण वर कसं यायचं हा खरं यक्षप्रश्न होता. अखेर मी पण उडी मारली. उडी मारून पाण्यातून जेव्हा बाहेर आलो तेव्हा काय वाटलं ते शब्दात नाही सांगता येणार! मग थोडा वेळ पाण्यात खेळून आणि धबधब्यात डुंबून आल्यावर मला पुन्हा, वर कसं यायचं?” याची आठवण झाली...

कुंडात उडी मारताना

अखेर मी बाहेर पडलो. वर यायचा रास्ता हा वरून जेव्हडा सोपा दिसतो तेव्हडा तो प्रत्यक्षात अजिबात नाही हे कळून चुकलं! अखेर एका आधी उडी मारून वर गेलेल्या इसमाने मला वरून सूचना दिल्या. त्याप्रमाणे अखेर मी वर आलो. वर आल्यावर याआधी आपण अशा प्रकारच्या केलेल्या गोष्टी आठवल्या! परंतु त्यातला आणि यातला सगळ्यात मोठा फरक म्हणजे हा उपद्व्याप करताना कुठलंच सुरक्षेचं साधन नव्हतं! तेव्हा हि आठवण मी कधीच विसरू शकणार नाही. आत्तापर्यंत आम्ही फक्त भटके होतो, पण यानंतर आम्ही खऱ्या अर्थाने "भटकंती वेडे" झालो. परंतु हा असं वेडेपणा कोणीही तज्ञ व्यक्ती असल्याशिवाय कोणी करायला जाऊ नये! येथे उतरायचे असल्यास स्वतःच्या जबाबदारीवरच आणि आवश्यक सुरक्षेच्या साहित्यासहच येथे उतरावे. हि जागा दिसते तेव्हडी चढायला सोपी नाही.

भटकंती वेडे
परतीच्या वाटेवर
छायाचित्र: अविनाश गायकवाड

अखेर मग आमच्यातले सर्व जण चढून पुन्हा वर आले! मग आम्ही थोडा वेळ थांबून परतीच्या वाटेला लागलो! वाटेत भरपेट जेवण केले आणि पुन्हा चढू लागलो.

प्लस व्हॅली

वाटेवरील तळे
छायाचित्र: ऋतुराज जगताप

चढण्यास, उतरण्यापेक्षा कमी वेळ लागतो, पण खडी चढण असल्यामुळे दमछाक होते! अखेर सर्व परत वर आले तेव्हा फोटो शेयरिंगचा कार्यक्रम झाला. सगळ्यांनाच खूप कंटाळा आला असल्यामुळे मग आम्ही इंडीपेंडन्स पॉईंटला जाऊन सनसेट पाहायचा बेत रद्द केला आणि परतीच्या वाटेला लागलो! वाटेत पुन्हा पळश्याला उतरून चहापान केले आणि मग आपापल्या वाटेने आणि गतीने परत निघालो. पळश्याहून निघालो तसं आमच्या सूर्यास्त बघायच्या बुडलेल्या प्लॅनची आठवण झाली आणि अखेर मुळशी धरणापाशी सुंदर असा सूर्यास्त पाहायला मिळाला! मग सूर्यास्त आपापल्या कॅमेऱ्यात टिपण्यासाठी पुन्हा एक छोटा ब्रेक झाला आणि मग आम्ही सुसाट आपापल्या घराकडे निघालो!

सूर्यास्त
सूर्यास्त

असा हा ट्रेक आजपर्यंतच्या काही सर्वोत्तम ट्रेक पैकी एक म्हणून मनात घर करून बसला आहे!
त्या जादुई जागेमुळे...
अनोख्या मित्रांमुळे...
आणि केलेल्या वेडेपणाच्या जाणीवेमुळे...



-नितीश साने©

6 comments