"स्वतःचेच विचार संग्रहित करून ठेवावेत म्हणून आपण ते कागदावर उतरवून काढतो, आपल्या आठवणींचा तो कागद जपून ठेवतो, नंतर जेव्हा काही दिवसांनंतर किंवा काही वर्षांनंतर ते उघडून आपण वाचतो तेव्हा आपल्याच चेहऱ्यावर स्मितहास्य उमटतं! तेव्हा जो स्वतःशी संवाद होतो तो म्हणजे एकांत! असाच संवाद कधीतरी व्हावा अशी इच्छा बाळगून हे लिहितो आहे, म्हणून हा एकांत!"

Wednesday 18 January 2017

तो देव पाहायला गेला होता!

टाळ्यांच्या गजरात, रणरणत्या उन्हात, thumbnail 1 summary


टाळ्यांच्या गजरात,
रणरणत्या उन्हात,
घामाच्या त्या उग्र आणि कुबट दर्पात,
कुजलेल्या फुलांच्या ढिगाऱ्यात,
दूध आणि गोमूत्राच्या नद्यांत,
हलक्याश्या घंटानादात,
आणि लाखोंच्या गर्दीत,
तो शांतपणे आपल्या नंबरची वाट पाहत,
बराच वेळ उभा होता...
अहो खरंच,
तो देव पाहायला गेला होता!

बऱ्याच वेळाने अखेर त्याचा नंबर आला!
गर्दीमुळे प्रभूंचा फक्त मुकुटच दिसला...
आणलेला शेकडा नमस्कार करून दानपेटीत टाकला,
पुढल्या वर्षी पुन्हा येण्याचा संकल्प गाभाऱ्यातच झाला,
जाताना बाहेरच्या भटजीने,
पुढच्या वेळी सहस्त्र अर्पिण्याचा सल्ला दिला...
त्यांना धन्यवाद देऊन तो परत निघाला...

दर वर्षी भाविक वाढले, रांगा वाढल्या,
प्रभुदर्शनाचा वेळ वाढतच गेला...
शेकडे गेले, सहस्त्र गेले,
"वरचा एक" वाहता वाहता,
बरेच सुट्टे पण गेले...
अख्ख्या मूर्तीचे दर्शन कधी झालेच नाही...
पण मंदिर सोडून कोठे देव दिसतो
यावर तिथल्या कोणाचाच विश्वास नाही!
पूर्वी ऋषीमुनींना,
जंगलात तप करून परमेश्वर भेटला,
याकडेही कोणी फारसे लक्ष देत नाही!

बरीच वर्ष झाली तरी देवदर्शन झालं नाही...
कोणीतरी सांगितले दशसहस्त्राशिवाय काही होणार नाही!
शेवटी दशसहस्त्राचा संचय केला,
यावेळेस दर्शन झाल्याशिवाय,
परत ना येण्याचा निर्धार केला!
बराच वेळ रांगेत थांबून अखेर त्याचा नंबर लागला...
तेव्हा कुठे तो प्रसन्न झाला...

शेवटी परमेश्वराला त्या उसळलेल्या गर्दीतील,
काही जणांची दया अली!
अखेर तो भेटलाच!
आणि त्याच्याच चरणी सहवास लाभला...
कायमचा...

दुसऱ्या दिवशी पेपरात बातमी अली,
चेंगराचेंगरीत ११ भाविकांचा मृत्यू झाला...
लगेच सरकारतर्फे निधी आला...
अर्पिलेल्या संपत्तीचा जणू विमाच मिळाला...
त्या ११ जणांना तो त्यादिवशी पावला...
पण त्या ११ घरातला देव्हारा माळ्यावर गेला...
त्याच दिवशी, कायमचा...  

असाच दरवर्षी तो काही निस्सीम भक्तांना पावतो...
त्याच्यावरचा त्यांचा विश्वास त्या गाभाऱ्यातच सार्थ ठरवतो!
त्याला भेटायची गर्दी मात्र कमी होत नाही...
पण तेथे त्याच्या चरणी मस्तक टेकवताना,
येथेच मोक्ष मिळावा असे मात्र कोणीच म्हणत नाही...
अजूनतरी...



-नितीश साने ©

No comments

Post a Comment