"स्वतःचेच विचार संग्रहित करून ठेवावेत म्हणून आपण ते कागदावर उतरवून काढतो, आपल्या आठवणींचा तो कागद जपून ठेवतो, नंतर जेव्हा काही दिवसांनंतर किंवा काही वर्षांनंतर ते उघडून आपण वाचतो तेव्हा आपल्याच चेहऱ्यावर स्मितहास्य उमटतं! तेव्हा जो स्वतःशी संवाद होतो तो म्हणजे एकांत! असाच संवाद कधीतरी व्हावा अशी इच्छा बाळगून हे लिहितो आहे, म्हणून हा एकांत!"

Saturday, 10 December 2016

त्रयस्थ

Photo courtesy : Google Images thumbnail 1 summary
Photo courtesy : Google Images

परवाच तो कट्टयावर भेटला! "आज सगळे गेल्यावर थांब, थोडं बोलायचय!" म्हणला.
बराच वेळ रेंगाळून झाल्यावर दोघच ऊरलोय बघून मग मझ्यापाशी आला...
मग थोडा चाचपड़त बोलायला लागला...

"बरेच दिवस कोणाशी तरी शेयर कारावं असं वाटत होतं, पण मन धजावत नव्हतं! आज तुझ्यावर विश्वास टाकून आज सगळ स्पष्ट सांगणार आहे!
मला ती खूप आवडते रे! अगदी पहिल्या भेटीपासून! पण कसं बोलावं ते समजत नाहीए...
तू चांगलं ओळखतोस ना तिला? थोड़ी मदत करशील?"
बरं वाटलं खरंतर ऐकून!
सगळ्यांच्या आधी त्यानी मला सांगितलं!
नक्की मदत करीन, असं वचन देऊन निघालो!

तो आधी होता त्यापेक्षा चांगला दोस्त वाटू लागला!
त्यानंतर आठवडयाभरातच ती भेटली! तीची आणि माझी कॉलेजपासून मैत्री होती. "आज तिच्याशी बोलायचं!" मी ठरवून टाकलं.
पण मी बोलायच्या आधी तीच बोलू लागली,
"
बरेच दिवस तुझ्याशी बोलायच होतं, पण कसं बोलावं तेच कळत नव्हतं! आज मात्र सगळ बोलणार आहे!
मला वाटतं, आपल्यात मैत्री पालिकडे काहीतरी आहे. निदान मला तरी असं वाटतं.
म्हणजे स्पष्टच सांगते, मला तू आवडतोस! अगदी पहिल्यापासून!"
मला थोडा धक्काच् बसला! काय बोलावं, कळलच नाही, म्हणून मी गप्प बसलो. तेव्हा तीच म्हणाली,
"वेळ घे तू तुझा, पण होकर असल्याशिवाय बोलू नकोस हां कोणाजवळ... 
बाय!"

काय करावं काहीच सुचेना. कोणाशी बोलावं तेहि कळेना...
त्याच्याशी बोललो तर तिचा विश्वासघात; तिच्याशी बोललो तर त्याचा विश्वासघात!
आधी कोणाला दुखवावं, ते काही कळत नव्हतं आणि दोघांना एकत्र सांगायला मन देखील राजी होत नव्हतं!
शेवटी थोड़े दिवसात, तिचं काहीतरी गुपित मला कळलं आहे, अशी त्याला चाहूल लागली.
त्याच्याबद्दलच काहीतरी असणार, अशी खात्री आणि ते जाणून घ्यायची आतुरता त्याच्या डोळ्यात दिसत होती...
काय बोलावं तेव्हाहि कळलं नाही, म्हणून
"
वेळ आली कि सांगेन"
असं म्हणून वेळ मारून नेली!
संध्याकाळी घरी आलो तेव्हा तिचा मेसेज होता,
"
तू आणि तो आज भेटलात का? त्याला काही बोलला नाहीस ना?"
दूसरा मेसेज त्याचा होता,
"
ती माझ्याबद्दल काही बोलली का?"
खूप विचित्र वाटलं! कोणाची समजूत घालवी काहीच समजत नव्हतं;
तिची, त्याची, का स्वतःची?
शेवटी ठरवलं की या सगळ्यापासून थोड़े दिवस दूर रहायचं!
मग कोणालाच उत्तर पाठवलं नाही! पुढले काही दिवस कुणाचाच फोन घेतला नाही आणि मेसेजदेखिल केला नाही!

बघता बघता तीन महीने झाले, तेव्हा म्हणलं आज दोघांना भेटून सांगून टाकावं! तेव्हडी आता तयारी झाली होती...
पण दोघांपैकी कोणीच माझा फोन उचलला नाही...
पुढले कितीतरी दिवस...
आज याला तीन वर्ष होऊन गेली...
पण एव्हडच समजलय, ती सद्ध्या मुंबईला असते, मी पुण्याला असतो, आणि त्याचा मात्र काहीच पत्ता नाही...

मी नक्की कसं वागायला हवं होतं? याचं उत्तर मी आजदेखिल शोधतोय,
पण एवढंच समजतय की,
" तिच्यासाठी तो त्रयस्थ होता आणि त्याच्यासाठी मी त्रयस्थ होतो...
माझ्यासाठी कोणीच त्रयस्थ नव्हतं खरंतर,
पण आज मात्र कुणीच कुणाचं राहिलेलं नाही...
कुणीच कुणाचं राहिलेलं नाही!"


-नितीश साने ©


No comments

Post a Comment