"स्वतःचेच विचार संग्रहित करून ठेवावेत म्हणून आपण ते कागदावर उतरवून काढतो, आपल्या आठवणींचा तो कागद जपून ठेवतो, नंतर जेव्हा काही दिवसांनंतर किंवा काही वर्षांनंतर ते उघडून आपण वाचतो तेव्हा आपल्याच चेहऱ्यावर स्मितहास्य उमटतं! तेव्हा जो स्वतःशी संवाद होतो तो म्हणजे एकांत! असाच संवाद कधीतरी व्हावा अशी इच्छा बाळगून हे लिहितो आहे, म्हणून हा एकांत!"

Saturday, 10 December 2016

शर्यत


आपल्या दुबळ्या बाजू जगासमोर उघड झाल्या, याची फिकिर करणं जेव्हा एखादा माणूस सोडून देतो, तेव्हा तो एकतर कणखर बनतो किंवा हतबल!
कारण आपली दुबळी बाजू लपवायची खटपट संपलेली असते
आणि अपल्यावरच्या खोट्या अपेक्षा सांभाळायची जबाबदारी देखिल.

काही माणसं याने खचुन जातात तर काही यानेच उभारुन येतात.
अहो, "ससा - कासवाच्या शर्यतीत कासव भाग घेऊ शकतं, कारण त्याला हरण्याची फिकीर नसते किंवा स्वतःच्या दुबळेपणाची लाज नसते."

आपली महानता, सश्याला जगासमोर सिद्ध करायची असते; म्हणूनच शर्यत ससा जिंकला तर त्याची फारशी कोणी दखल घेत नाही... 
पण कासव शर्यत जिंकलं तरच त्याची कथा बनते, मग भलेही ती जीत सश्याच्या दुबळेपणामुळे का असेना!


म्हणूनच या सश्यासारखी माणसं ही सतत कुठल्यातरी दडपणाखाली धावत राहतात पुढे पुढे, आपली दुबळी बाजू संभाळत...
कसवाचं मात्र तसं नसतं, त्याला फक्त शर्यत पूर्ण करायची असते...
त्याला पाहिलं येण्यात स्वारस्य नसतं किंवा शेवट येण्याचं दुःख नसतं!
शर्यत स्वतःशी देखिल करायची नसते, फ़क्त स्वतःसाठी करायची असते, दुसऱ्या कोणाखातर नव्हे!


-नितीश साने ©


No comments

Post a Comment