"स्वतःचेच विचार संग्रहित करून ठेवावेत म्हणून आपण ते कागदावर उतरवून काढतो, आपल्या आठवणींचा तो कागद जपून ठेवतो, नंतर जेव्हा काही दिवसांनंतर किंवा काही वर्षांनंतर ते उघडून आपण वाचतो तेव्हा आपल्याच चेहऱ्यावर स्मितहास्य उमटतं! तेव्हा जो स्वतःशी संवाद होतो तो म्हणजे एकांत! असाच संवाद कधीतरी व्हावा अशी इच्छा बाळगून हे लिहितो आहे, म्हणून हा एकांत!"

Saturday, 10 December 2016

सुविचार (Quotes)

असच कधीतरी विचार करत बसलेलं असताना....  Photo courtesy : Google Images thumbnail 1 summary
असच कधीतरी विचार करत बसलेलं असताना.... 
Photo courtesy : Google Images
*  झाडं जशी बागेत येतात, तशी जंगलातही येतात. दर वेळेस कोणी संगोपन-कर्ता असावाच लागतो असं            नाही. 
   पण बागेतलं टवटवित झाड जरी जंगलात नेऊन लावलं, तरी ते जगू शकेलच असं सांगता येत नाही...
   माणसाचही असच असतं कदाचित्...

*  बागेत जशी, उपद्रवी झाडं उगावतात, तशी जंगलातही उगवतातच की,
   फरक इतकाच, की जंगलात, त्यांना उपद्रवी ठरवणारा कोणी नसतो!
   माणसाचही असच असतं कदाचित्...

*  बागेत उगवणारी, छोटी झुडपं आपण उपटून टाकतो, झाडाभोवती गुंडाळलेल्या वेली छाटून टाकतो...
   जंगलात मात्र सर्व प्रकारच्या वनस्पति अढळतात,
   एखाद्या झाडाच्या सावलीखाली वाढलेली वेल कधीकधी वाढत वाढत त्या झाडालाच गुंडाळून टाकते...
   पण झाडाला याचा कसलाच त्रास होत नाही.
   आपल्या छत्राखाली वाढलेल्यांनी, कायम आपल्या उपकारांची जाण ठेवत आपल्याला मोठं मानून राहावं          अशी प्रवृत्ति फ़क्त आपणा माणसातच आढळते.
   यातील बहुतेक वेळा, हे परोपकार देखिल झाडानी वेलीवर केलेल्या उपकरांसारखेच असतात.
   फ़क्त आपल्या नजरेखाली वाढण्याची दिलेली संधी!

*  माणूस कायमच आपल्या बागेची तुलना, शेजरच्याच्या बागेशी करतो. त्याच्या बागेत विशेष काळजी न           घेता देखिल एवढी फुलं कशी येतात असा सवाल करतो, तर कधी त्याच्या बागेचा हेवा करतो. इतकेच काय,     तर कधी कधी परमेश्वर आपल्या बाबतीत भेदभाव करतो, अशी तक्रार देखिल करतो...
    पण आपल्याच बागेतल्या गुलाब आणि कोरफडीची निगा राखताना आपण केलेला भेदभाव त्याला कधीच       दिसत    नाही!

*  माणसं जशी बागेत रमतात, तशी जंगलातही रामतात.
   बागेत, कोणी वाढायचं, किती वाढायचं, कश्या पद्धतीने वाढायचं, हे सतत कोणीतरी ठरवत असतं... 
   त्या ठरवलेल्या चौकटी बाहेर कोणी वागलं, तर त्याची हकालपट्टी होते, कधी छाटणी होते.
   म्हणूनच बागेची वाढदेखिल मर्यादितच राहते. बागेचे कधीच जंगल होऊ शकत नाही!

*  बाहेरून आलेला माणूस हा बागेत थोडच काळ रमतो..
   जंगलात मात्र तो कितीही दिवस राहिला तरी त्याचं समाधान होत नाही,
   कारण बाग ही कोणा एकाची असते, जंगल मात्र सर्वांचे असते!
   म्हणूनच जंगलात सर्व प्रकारच्या वनस्पति आढळतात, अगदी शेवाळं जरी जंगलात आलं तरी उठून                दिसतं... 
   काही दुर्मिळ वनस्पति सपडतात, काही औषधि झाडं देखिल दिसतात.
   बागेत मात्र अशी झाडं क्वचितच् असतात.
   कारण ती उगावली, तरी केवळ त्याला फूल येत नाही म्हणून अधिक जाणून न घेता, उपद्रवी ठरवून ती            केव्हाच्  उपटून टाकलेली असतात!

*  जराशी ओल असली तरी शेवाळं येतं... 
   गुलाब मात्र असा कुठेही येत नाही. त्याच्या स्वतःच्या काही अटी असतात त्या मंजूर झाल्या        तरच तो        उगावतो!

*  तसं म्हणाल तर या शेवाळ्याचा आपल्याला कसलाही त्रास होत नाही, ओल असेल तितके दिवस    ते राहतं,    नंतर सुकुनही जातं तरी पण आपल्याला विनाकारण त्या शेवाळ्याचा राग येतो म्हणून आपण ते उपटून          टाकतो... यामधे कदाचित कोणीतरी आपल्या घरात घुसखोरी केल्याचा भाव असतो! गुलाबाचे मात्र आपण      सर्व लाड़ पुरावतो! त्याला ख़त-पाणी घालतो, उन येईल अश्या कोपऱ्यात ठेवतो, त्याच्या काट्यांकडे दुर्लक्ष      करतो! आणि जेव्हा त्याला फुल येतं, तेव्हा तेच तोडून देवघरतल्या त्या देवाला वाहतो... काय गंमत आहे        पहातिघांचाही निर्माता तोच असतो"त्या गुलाबाचातुमचाआणि त्या शेवाळ्याचा देखील!" केवढी हि          विसंगति!

*  मोगऱ्याचा कितीही अर्क काढून घेतला तरी,
   गजऱ्याची शोभा कमी होत नाही...
   कारण स्थाई भाव तो स्थाई भावच!


*  कितीही फुलं असली तरी कोणी फुलांचा ढ़ीग देवासमोर वाहत नाही,
  त्याचा हार करूनच तो वाहतात...
  शेवटी सगळ्यांना एका सूत्राने बांधलं, तर त्याची वेगळीच् किमया असते नाई!

*  काय गम्मत आहे पहा,
    एकदा का शब्द सुचले अर्थ लागले की समोरच्या रिकाम्या दौतेला झुगारुन, पाषाणाला देखील शीलालेख           बनवण्याची ताकद असते या विचारांमधे!
    पण एकदा विचार खुंटले की समोरची लेखणीदेखील शब्द उतरवू शकत नाही त्या कोऱ्या कागदावर;
    अगदी त्या दौतेला कोरड पडेपर्यन्त!





-   नितीश साने ©

No comments

Post a Comment