"स्वतःचेच विचार संग्रहित करून ठेवावेत म्हणून आपण ते कागदावर उतरवून काढतो, आपल्या आठवणींचा तो कागद जपून ठेवतो, नंतर जेव्हा काही दिवसांनंतर किंवा काही वर्षांनंतर ते उघडून आपण वाचतो तेव्हा आपल्याच चेहऱ्यावर स्मितहास्य उमटतं! तेव्हा जो स्वतःशी संवाद होतो तो म्हणजे एकांत! असाच संवाद कधीतरी व्हावा अशी इच्छा बाळगून हे लिहितो आहे, म्हणून हा एकांत!"

Tuesday 25 July 2017

मृगगड (mrugagad fort)

मृगगड  (mrugagad fort) thumbnail 1 summary
मृगगड (mrugagad fort)



तुम्हाला जर का लोणावळा परिसरात जाऊन जर छोटेखानी भटकंती किंवा ट्रेक करायचा असेल, तर मृगगड हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. मृगगड हा तसा अपरिचित असायचं कारण म्हणजे इथे थेट सार्वजनिक वाहतूक उपलब्ध नाही. तुम्हाला आधी खोपोली पर्यंत जाऊन मग नंतर एकतर बस बदलत बदलत येथे पोहोचावे लागेल अथवा मग एखादी सिक्स सीटर अथवा टॅक्सी करायला लागेल. 
पण जर का तुम्ही टेम्पो, ट्रॅक्टर चालकांबद्दल आदर बाळगत असाल तर तुम्ही फार वेळ न घेता इथवर पोहोचू शकता.

कसे पोहोचाल?
पुणे ते खोपोली बस, लोणावळा अथवा स्वारगेट बस स्थानकावरून वरून दर थोड्या थोड्या वेळानी आहेत. तिथून मग पुढचा रस्ता परळी - जांभुळपाडा - भेलीव या गावातून जातो. या मार्गावरील बसेससाठी खोपोली स्थानकावर चौकशी करणे हेच उत्तम!
वाटेत तुम्हाला इमॅजिका, उंबरखिंड अश्या परिचयाच्या खुणा दिसू शकतील!
पुण्यापासून अंतर हे साधारण ११५ किलोमीटर आहे.
तसेच राहायची सोया गडावरील गुहेत होऊ शकते.

काय पाहाल?
किल्ल्यावर बांधकामाचे फार अवशेष शिल्लक नाहीत. पाण्याची टाकी, शंकराची पिंड, एक गुहा, (येथे साधारण १० लोकांची राहायची सोया होऊ शकते) समोर दिसणारा मोराडीचा सुळका इत्यादी. परंतु पावसाळ्यात गेलात तर या परिसराचे रूप मात्र तुम्हाला मोहून टाकेल यात शंका नाही.






मृगगडाच्या माथ्यापाशी पोहोचायच्या आधी उजवीकडून गुहेकडे रास्ता जातो. ट्रेकर मंडळीत मृगगडावरील हि गुहा हा चर्चेचा विषय आहे. इथून आजूबाजूच्या परिसराची विलोभनीय दृश्य दिसतात. पोहोचण्यासाठी मात्र हि गुहा अवघड आहे. तेव्हा तुम्हाला एक छोटेसे साहस करायची इच्छा झाल्यास ह्या गुहेत जाऊन या! मात्र नीट अशी वाट नसल्यामुळे व पोहोचायला अवघड असल्यामुळे फारशी सुरक्षेची माहिती नसल्यास गुहेत जायचा मोह टाळावा! 



बाकी किल्ला हा चढाईस अवघड नाही, अर्थात आवश्यक ती काळजी घेऊनच. परत येताना मात्र तुम्हाला वाहन मिळेपर्यंत थोडीशी पायपीट करायला लागू शकते. वेळेत परतीच्या मार्गी लागलात तर येता येता तुम्ही उंबरखिंडीतील स्मारक देखील पाहून येऊ शकता!


-नितीश साने ©

No comments

Post a Comment