"स्वतःचेच विचार संग्रहित करून ठेवावेत म्हणून आपण ते कागदावर उतरवून काढतो, आपल्या आठवणींचा तो कागद जपून ठेवतो, नंतर जेव्हा काही दिवसांनंतर किंवा काही वर्षांनंतर ते उघडून आपण वाचतो तेव्हा आपल्याच चेहऱ्यावर स्मितहास्य उमटतं! तेव्हा जो स्वतःशी संवाद होतो तो म्हणजे एकांत! असाच संवाद कधीतरी व्हावा अशी इच्छा बाळगून हे लिहितो आहे, म्हणून हा एकांत!"

Sunday 20 May 2018

देवकुंड

देवकुंड  धबधबा ठिकाण : देवकुंड धबधबा पुण्यापासून अंतर : १०० किलोमीटर ट्रेक : सोपा ट्रेकची सुरुवात : भिरा गाव. राहायची सोय : गावात आधी कळवले ... thumbnail 1 summary
देवकुंड धबधबा




ठिकाण : देवकुंड धबधबा

पुण्यापासून अंतर : १०० किलोमीटर

ट्रेक : सोपा

ट्रेकची सुरुवात : भिरा गाव.

राहायची सोय : गावात आधी कळवले तर होऊ शकते.

जाण्यासाठी योग्य काळ : थंडी व उन्हाळा. (पावसाळ्यात अपघात घडले असल्यानेे शक्यतो जाऊ नये)

देवकुंड! ताम्हिणी घाट परिसरात असलेला एक सुंदर धबधबा. काही वर्षांपूर्वी फक्त ट्रेकर मंडळीत प्रसिद्ध असलेला, पण अलीकडचं रूप बघता,अतिप्रसिद्धीमुळे जत्रेचं स्वरूप आलेलं आणखीन एक सुंदर ठिकाण. गावकऱ्यांच्या जागृकतेमुळे तसं अजूनही स्वच्छ असलं तरी भरपूर माणसं येत असल्याच्या खुणा मात्र मिटत नाहीत...

बरेच दिवसांपासून देवकुंड येथे जायची इच्छा होती. पावसाळ्यात इथे झालेल्या अपघातांमुळे थंडीतच जायचं पक्कं केलं! उन्हाळ्यात देखील पुन्हा येऊ असं कुठेतरी आधीच मनाशी खरं तर ठरवून टाकलं होतं पण प्रत्यक्ष या धबधब्याला भेट दिल्यानंतर मात्र इथे परत कधी यावं या गोष्टीबद्दल मन राजी होईना..


गावात या धबधब्यामुळे अलीकडच्या काळात बराच रोजगार निर्माण झाला. ग्रामपंचायतीने पावत्या फाडायला सुरुवात केली, छोटी छोटी हॉटेल झाली. सुरक्षेच्या कारणामुळे गाईड घेणं देखील compulsory झालं. तेव्हा आम्हालाही guide घेणं भागच पडलं.

मग ट्रेकच्या सुरुवातीला ओळख पाळख झाल्यावर गाईड साहेबांनी हळू हळू गप्पा मारायला सुरुवात केली.
"मागच्या रविवारी 160 गाड्या होत्या फक्त पुण्यातून. Camping, music सगळं!
आमचे गाईड कौतुकाने सांगत होते.

आम्हाला सुरक्षेसंबंधी सगळं training वगरे देतात बरं आधी"
पुढे जरा जंगल लागलं तसं मी विचारलं,
"काय हो, इथे प्राणी पक्षी वगरे बरेच दिसत असतील ना?"
"हो दिसतात की!"
"मग wildlife विषयी वगरे पण तुम्हाला training देतात का?"
"Training? अहो मारून खातो आम्ही!"
माझ्या सुस्काऱ्याबरोबर मागून हशा पिकला.
"तरी कोणकोणते प्राणी आहेत इकडे?" मी विचारलं.
"हे काय ससे, लांडगे, डुक्कर, बिबट्या भेकर"
"बिबट्या दिसलाय एव्हढ्यात कधी?"
"हो हे काय आत्ता एक महिन्याभरापूर्वी...
गुरं मारून नेतात कधी कधी.
तरी पूर्वी खूप प्राणी दिसायचे बरं का. पण आता वर्दळ वाढली आवाज वाढला, आता प्राणी पक्षी दिसत नाहीत. कधी कधी रात्रभर फिरलं तरी आता शिकार मिळत नाही."

शिकार मिळत नाही याचं त्यांना बरंच दुःख होतं.
मी पुन्हा एक सुस्कारा टाकला आणि माझ्या मनात विचार आला,
"आमच्या दोघांची सल एकचं असली तरी दुःख मात्र निराळीच होती!"


कधी कधी हे असं पर्यटन गावासाठी चांगलं असलं, तरी नैसर्गिक दृष्ट्या त्याचे side effects खूप असतात..
मोठ्या मोठ्या प्रकल्पांसाठी आवश्यक ती जागरूकता पसरवली जाते, पण या छोट्या गावांचं काय? अर्थात आपल्याला शहरात राहून या गोष्टींचा विचार करणं सोप आहे, पण इथे त्या छोट्या गावात रोजगाराची ही खूप चांगली संधी दवडायला सांगणं, ते पण शहरातून शहाणपण घेऊन आलेल्या माणसांनी? हे योग्य आहे का नाही, ह्याच्यावर माझ्याकडे उत्तर नाही..

-नितीश साने ©

No comments

Post a Comment