"स्वतःचेच विचार संग्रहित करून ठेवावेत म्हणून आपण ते कागदावर उतरवून काढतो, आपल्या आठवणींचा तो कागद जपून ठेवतो, नंतर जेव्हा काही दिवसांनंतर किंवा काही वर्षांनंतर ते उघडून आपण वाचतो तेव्हा आपल्याच चेहऱ्यावर स्मितहास्य उमटतं! तेव्हा जो स्वतःशी संवाद होतो तो म्हणजे एकांत! असाच संवाद कधीतरी व्हावा अशी इच्छा बाळगून हे लिहितो आहे, म्हणून हा एकांत!"

Friday 17 August 2018

खाद्यभटकांती - थाळी

खाद्यभटकांती - थाळी प्रत्येकासाठी अन्नाची परिभाषा वेगळी आहे. काही लोकं मुळात अगदी खवय्ये असतात. अन्न हे पूर्ण ब्रह्म वगरे असे शब्द ऐकले की य... thumbnail 1 summary

खाद्यभटकांती - थाळी


प्रत्येकासाठी अन्नाची परिभाषा वेगळी आहे. काही लोकं मुळात अगदी खवय्ये असतात. अन्न हे पूर्ण ब्रह्म वगरे असे शब्द ऐकले की यांचा चेहरा प्रसन्न होतो. आयुष्यात सर्वात सुख देणाऱ्या गोष्टींमध्ये खाद्य हे प्रथमस्थानी असतं! या अश्या लोकांच्या वही किंवा डायरीच्या सुरुवातीला सुविचार वगरे नसून, "चवीने खाणार त्याला देव देणार" वगरे इत्यादी वाक्य तुम्हाला सापडू शकतात. याउलट काही लोकं फक्त गरज म्हणून खाणारे देखील मी पाहिले आहेत. तर काही लोकांना दुसरा पर्यायच नसतो...

यात आणखीन एक प्रकार म्हणजे health concious लोकं, हे खवय्ये असतात पण हे जिभेपेक्षा सात्विकतेला महत्व देतात, यांचा स्वतः वर प्रचंड ताबा असतो. मीठ साखर इत्यादी पदार्थ खाताना यांचं मोजमाप ठरलेलं असतं!

पण मला वाटतं की हे असे गुणधर्म आपल्या प्रत्येकात जसे आढळतात तसे आपल्या थाळीत देखील त्याची प्रतिमा दिसून येते. आपल्या आजू बाजूच्या चार जणांचे डबे बरंच काही बोलून जातात! पण याव्यतिरिक्त थाळी हा प्रकार एखाद्याच्या जीवनशैली बद्दल बरंच काही बोलून जातो असं मला वाटतं!


वेगवेगळ्या प्रांतात आपण जर जाऊन तिथे थाळी order केलीत तर आपल्याला तिथल्या अनेक गोष्टींची माहिती कळते असं माझं तरी स्पष्ट मत आहे! अर्थात यासाठी प्रत्यक्ष त्या त्या प्रांतात जायलाच पाहिजे असं मुळीच नाहीए. आता तुम्हाला पुण्यात सुद्धा उत्तम पंजाबी किंवा राजस्थानी थाळी मिळूच शकते, पण त्या त्या ठिकाणची थाळी तिथे खाण्यात जी माजा आहे ना, ती औरच यात शंका नाही!

अर्थात तुम्ही ही थाळी कुठे खाता यावर देखील बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. यासाठी आपल्याला खास ठिकाण माहीत नसेल तर सरळ शहरातल्या किंवा गावातल्या रिक्षावाले, टॅक्सीवाले यांना गाठायचं. ते तुम्हाला नक्की चांगली जागा दाखवतील!


आता उदाहरणच घ्यायचं झालं तर गुजराती थाळी बघा!

भरपूर सारे पदार्थ, मांडणी एकदम आकर्षक, पण चवीत मात्र एक ठरलेला गोडवा. विशेष स्वाद असलेला किंवा एकदम वेगळी चव असलेला असा पदार्थ नाही. सगळ्यात तेल मात्र भरपूर! यांच्या जेवणाच्या थाळीत सुध्दा तुम्हाला समोसा मिळू शकेल. पण लोणचं वगरे पदार्थांना विशेष महत्व नाही. ते असलंच तर कैरीचं किंवा लिंबाचं किंवा अतिशय सहज उपलब्ध होणारं. भाताच्या वेळी मात्र पुलाव ठरलेला. शेव फरसाण इत्यादी हे भरपूर आणून ठेवलेले. 


माणसांचेही थोडेसे असेच. बोलायला वागायला गोड. राहणीमानात झगमगाट, प्रदर्शन भरपूर, नीटनेटकं, टापटीप, पण सत्व म्हणावीत अशी नाहीत. छोट्या छोट्या गोष्टींना महत्व फारसं नाही. राहणीमानात फारशा छटा नाहीत.


बाकी म्हणाल तर शहराचे देखील काहीसे असेच. मोठ्या मोठ्या इमारती, झकपक बंगले, पण यात कोणी छानसा बगीचा केलाय असं दृश्य क्वचित.. बंगले इमारती वगरे सगळं एकदम fashionable, झगमगीत, पण वेगळ्या पद्धतीने, कलात्मक मंडणीने उभं असलेलं घर मात्र शोधावं लागेल..


याउलट महाराष्ट्रीयन थाळीचं!

यात सात्विकतेला महत्व जास्त, मांडणी इतकी महत्वाची नाही. कितीही सुंदर अथवा कुरूप दिसलं तरी भाजी शेजारी कोशिंबीर, मग लोणचं, चटणी, मीठ, वाट्या या शेजारी शेजारी. आमटीच्या वाटीच्या शेजारीच गुलाबजाम श्रीखंड इत्यादीची वाटी. चवी असल्या तरी सर्व प्रकारच्या! उदाहरणार्थ, दुधीभोपळ्याची भाजी ही दुधीभोपळ्याच्या भाजीसारखीच. चव लपवायला याची कोफ्ता करी महाराष्ट्रीयन थाळीत तुम्हाला सापडणार नाही. लोणचं इथे पण शक्यतो साधंच, पण ते शास्त्र म्हणून प्रामुख्याने. शेवटी ताक मठ्ठा वगरे देतील पण हा त्याच्या मूळ चवीत. उगाच गोड करून दिला जाणार नाही.


माणसांचही काहीसं असंच! मूल्यांना जपून राहणारी. जीवनशैली समृद्ध बनवण्यासाठी उगाच कुठली ताडजोड नाही. काही गोष्टी जशा आहेत, तशा enjoy करणारी. कला, संस्कृती, इतिहास, अशी बहुरंगी आणि बहुढंगी, पण यामुळे एक थोडा बाणा आलेला. कधी कधी याचं गर्वात रूपांतर झालेलं. वागायला चांगली, पण उगाच गोड बोलतीलच असं नाही. जितकं महत्व पैशाला तितकचं कलागुण, संस्कृती, इतिहास या सर्वांना!


पंजाबी थाळी मात्र दूध तूप लोणी दही पनीर इत्यादी पदार्थांनी भरलेली. किंबहुना यालाच महत्व. पदार्थ पण सगळे पचायला एकदम जड! माणसंही काहीशी अशीच! भरपूर धष्टपुष्ट, भरपूर कष्ट करणारी, बोलणारी, पण पचनी पडायला मात्र जड..

भाज्या वेगवेगळ्या असल्या तरी साचा एकसारखा! माणसांचेही तसाच, ठराविक मानसिकतेला धरून राहणारी, एका साचातली, त्याच्या आड कोणी आलं तर चटकन चिडणारी, पण यांच्या शैलीला चिकटून राहिली की मात्र एकदम दिलखुलास, प्रसन्न आणि आनंदी राहणारी!


राजस्थानी थाळी तशी वेगळी! वेगवेगळे पदार्थ पण बनवण्याच्या पद्धती वेगळ्या. प्रत्येक पदार्थ नवीनच वाटेल असा. एका विशिष्ट सूत्रांनी बांधल्यासारखा, पण पाहिल्यासारखाच दुसरा अजिबात नाही. एकदम कलात्मक, वेगळा. फार उंची असा नाही, पण तुम्हाला तृप्त करेल असा!

माणसंही अशीच, कलात्मक एकदम वेगळ्या पद्धतीने राहणारी, फार उंची राहणीमान नाही, पण समृध्द वाटेल असे! एक विशिष्ट सूत्राने बांधलेली!


कोकणी थाळीची मात्र गोष्टच और! महाराष्ट्रीयन थाळीतून ही थाळी वेगळी काढायचे कारण म्हणजे,

ही थाळी तुम्हाला कोकणातच जाऊन खावी लागेल. बाहेर कुठे ती तुम्हाला मिळणार नाही. कारण बाजारीकरणाची या प्रदेशाला सवयच नाही!

कोकणातली थाळी ही ताटातचं मिळेल असं काही नाही! केळीच्या पानात देखील यांची थाळी मावते!

भरभरून पदार्थ वाढलेत असं दिसणार नाही, पण जे वाढले असतील ते एकदम जगावेगळे! काही आंबट, काही तुरट, गोड, तिखट, अगदी कडसर पण! पण लक्षात राहतील असे, चविष्ट!

माणसांचं देखील अगदी असंच...

भाज्या म्हणाल तर एकदम सध्या, हवी असल्यास फणसाची, केळफुलाची भाजी करून मिळेल, पण तसे आधी सांगितले तरच! अतिथी देवो भव वगरे असल्या भाकडकथांवर यांचा विश्वास नाही. इथे राहायचं तर ते यांच्या पध्दतीने, खायचं तर यांच्या पद्धतीचं, आणि वागायचं पण यांच्या पद्धतीप्रमाणेच. जगाचे शिष्टाचार यांना मान्य नाहीत!

उसळ असली तर ती सहसा बिरड्याची. इतर उसळींपेक्षा वेगळ्या चवीची, आवडली त्याला आवडली...

सोलकढी, ही शेवटी ठरलेली. 

यांना कितीही सुंदर पुलाव किंवा बिर्याणी करता येत असली तरी यांच्या थाळीत तुम्हाला वरण भात किंवा आमटीचं मिळेल! सर्व पदार्थात खोबरं भरपूर!


यांची जगण्याची रीत देखिल अशीच, स्वतःच्या मर्जीप्रमाणे! भरपूर आंबा फणसाच्या बागा आहेत म्हणून कोणी factory टाकलेली इथे तुम्हाला दिसणार नाही. खूप राबताना आणि कष्ट करताना देखील कोणी दिसणार नाही! जे आहे तसं, जसं आहे तसं. मूळस्वरूपातच, पण तेच खूप सुंदर, जगावेगळं!



मला वाटतं की अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणतात ते यासाठीच. तुम्ही जे खाता ते तुमच्या अंगात भिनतं, तुमच्या जिभेवर उतरतं, तुमच्या जीवनशैलीचचं जणू प्रतीक बनून राहतं!

मला वाटतं जो फक्त जिभेचे लाड पुरवण्यासाठी खातो, तो खरा खवय्या नाहीच! जो या सर्व गोष्टी पाहू शकतो, अनुभवू शकतो आणि त्यानुसार एखादी जागा, माणसं वाचू शकतो तो खरा खवय्या!



-नितीश साने


No comments

Post a Comment