"स्वतःचेच विचार संग्रहित करून ठेवावेत म्हणून आपण ते कागदावर उतरवून काढतो, आपल्या आठवणींचा तो कागद जपून ठेवतो, नंतर जेव्हा काही दिवसांनंतर किंवा काही वर्षांनंतर ते उघडून आपण वाचतो तेव्हा आपल्याच चेहऱ्यावर स्मितहास्य उमटतं! तेव्हा जो स्वतःशी संवाद होतो तो म्हणजे एकांत! असाच संवाद कधीतरी व्हावा अशी इच्छा बाळगून हे लिहितो आहे, म्हणून हा एकांत!"

Friday, 9 December 2016

घड्याळ

कधीतरी पहाटे पहाटे लवकर जाग येते , thumbnail 1 summary

कधीतरी पहाटे पहाटे लवकर जाग येते,
सवयी प्रमाणेच समोरच्या घड्याळाकडे लक्ष जाते आणि मग
मनामध्ये रोजच्या दिनाचर्येची उजळणी सुरु होते.


घड्याळाच्या २ काट्यांच्या पटीत सर्व गणितं बसवण्याचा खटाटोप सुरु होतो.
तिसरा काटा मात्र टिक - टिक करत राहतो. अगदी धोक्याच्या घंटेसारखा...


आपण रीतसर त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि आपली आकडेमोड चालू ठेवतो...
मिनिटा मिनिटाचे हिशोब होतात, रात्री पर्यंत करायच्या सर्व गोष्टी अगदी व्यवस्थित ठरतात. रात्री आल्यावर भज्याचा बेत आखू असं आपण मनात म्हणतो...


आणि नेमकी तेव्हाच, परवा घरी यायला उशीर झाल्यामुळे फसलेल्या सिनेमाच्या बेताची आठवण होते, मग क्षणभर स्वतःलाच स्वतःचा राग येतो...


झालं गेलं होऊन गेलं असं म्हणत आपण पुढचा विचार करायला लागतो. उसंत मिळालीच थोडी तर काय करायचं, याचीही आखणी करतो...


अचानक आज लवकर जाग आल्यामुळे मिळालेल्या जादा वेळाची आठवण होते, गोंधळलेलं मन शांत होतं, चेहऱ्या वर स्मितहास्य उमटतं...


तेवढ्यात डोक्यापाशी असलेलं गजराचं घड्याळ वाजू लागतं, चटकन भिंतीकडे लक्ष जातं तेव्हा जाणीव होते,
समोरच्या घड्याळातले काटे,  तुम्हाला केव्हाच मागे टाकून पुढे निघून गेले; तुमच्या या फुटकळ विचारांची कदर न करता!!!




-नितीश साने  ©

No comments

Post a Comment