![]() |
Photo courtesy : Google Images |
बाप्पा
आज रविवार ची सुट्टी असल्यामुळे दिनू आपल्या बाबाबरोबर टेकडी वर
आला होता. आदल्याच दिवशी मुसळधार पाउस झाल्यामुळे आज टेकडी वर मात्र भरपूर चिखल
होता. दिनूचे पाय चिखलाने भरून गेले होते. तो आता दमलाही होता पण त्याच्या आई ने
सांगितलेले शब्द त्याला आठवत होते,
"दिनू, तू आता मोठा झाला आहेस, तेव्हा सारखं सारखं बाबाला कडेवर
घ्यायला सांगायचं नाही."
दिनू मगचपासून आपले बूट साफ करायला
एखादा दगड शोधत होता, पण आजूबाजूचे सगळेच दगड चिखलाने भरलेले होते. शेवटी थोडा वेळ
चालल्यावर त्याला एक दगड दिसलाच. देवळासमोरच्या एका केशरी दगडा वर मात्र कोणीच पाय
घासले नव्हते. तेव्हड्यात कोणीतरी जाऊन तो उरला सुरला खराब करू नये म्हणून दिनू
पळतच दगडाकडे जाऊ लागला.
"पळू नको रे, पडशील." मागून त्याला बाबाचा आवाज ऐकू आला.
दिनू मात्र पळत दगडापाशी जाऊन पाय घासू लागला. तेव्हड्यात मागून
परत आवाज ऐकू आला,
"दिनू बाजूला हो!"
आता त्याचा बाबाही पळत पळत दगडाकडे आला. आजू-बाजूचे लोक रागाने
दिनू आणि त्याच्या बाबाकडे बघू लागले. त्याच्या बाबाने त्याला उचलून कडेला घेतलं,
"दिनू, वा! असं नाही करायचं, दगड नाही, बाप्पाय तो. सॉरी म्हण पाहू
बाप्पाला!"
आपला कधीच न रागावणारा बाबा आज आपल्याला रागावतो आहे हे पाहून
छोट्या दिनूलाही समजलं की आपलं काहीतरी चुकलं.
"सॉरी बाप्पा असं म्हणून तो निमूटपणे टेकडी उतरू लागला."
सगळ्या दगडांमध्ये एक दगड केशरी रंगाने रंगवला होता म्हणून तो
बाप्पा कसा झाला? हे मात्र त्याला समजत नव्हतं! तो काही न बोलताच टेकडी उतरू लागला.
खाली उतरता उतरता त्याच्या लक्षात आलं,
"पण बाबा तर बाप्पाची पूजा कधीच करत नाही, मग तरी तो का रागावला?"
आजूबाजूला कोणी नाही असं बघून त्याने बाबाला विचारलं,
"बाबा, पण तुझा विश्वास नाहीये ना बाप्पा वरती?"
त्याचा बाबा क्षणभर काहीच बोलला नाही. दिनूला समजेल असं तो तरी काय
बोलणार चटकन?
"नाही ना, पण मला किनई भीती वाटते रे या बाप्पाची!"
दिनू खी-खी करत हसू लागला. त्याच्या बाबाने पण स्मितहास्य केलं. तो
खरं तेच बोलला होता.
"कारण या बाप्पाच्या देवळात चपला घालून गेलेल्या माणसाला लोकांनी
चोपलेलं त्याने पाहिलं होतं,
या बाप्पाच्या वादावरून लोकांचे जीव घेतलेले त्यानं पहिलं होतं आणि
याच बाप्पा वरून अगदी युद्ध पेटलेलं सुद्धा त्याने पाहिलं होतं."
तो मनात म्हणाला,
"खरच घाबरतो रे तुझा बाबा या बाप्पाला!"
-नितीश साने ©
No comments
Post a Comment