"स्वतःचेच विचार संग्रहित करून ठेवावेत म्हणून आपण ते कागदावर उतरवून काढतो, आपल्या आठवणींचा तो कागद जपून ठेवतो, नंतर जेव्हा काही दिवसांनंतर किंवा काही वर्षांनंतर ते उघडून आपण वाचतो तेव्हा आपल्याच चेहऱ्यावर स्मितहास्य उमटतं! तेव्हा जो स्वतःशी संवाद होतो तो म्हणजे एकांत! असाच संवाद कधीतरी व्हावा अशी इच्छा बाळगून हे लिहितो आहे, म्हणून हा एकांत!"

Sunday 18 December 2016

पुन्हा तेच!

पुन्हा तेच!

रोज सकाळी तीच वेळ,
तेच घड्याळ,
तोच गजर...
चुकत नाही त्याचा ठोका सहसा कधी,
चुकलंच कधी तर तो माझा चुकतो...
काळजाचा...

उठल्यावर देखील तोच ब्रश,
तीच पेस्ट,
तोच साबण,
तेच टेबल,
सगळं तेच तेच...
बदललं यातलं काही 
तरी वेगळं वाटतं हल्ली!

मग पुन्हा तीच वेळ,
तीच बाईक,
तेच ठिकाण,
तेच केबिन,
तीच लोकं,
तेच गुड मॉर्निंग...
गुड मॉर्निंगच्या  ऐवजी
हॅलो म्हणलं कोणी,
तरी वेगळं वाटतं हल्ली!

तोच बॉस,
तेच हावभाव,
तेच काम,
तोच डेस्कटॉप,
तेच वॉलपेपर,
बदललंच कधी तर छान वाटतं हल्ली!

मग पुन्हा तीच लोकं,
त्यांच्या बुद्धिबळा प्रमाणे
(आणि बुद्धीप्रमाणे)
ठरलेल्या चाली,
मागून कुजबुज आणि चेहऱ्यावर उसनं हसू...
कामापेक्षा राजकारण जास्त मूळ धरू लागलाय हल्ली...
सगळ्यांना रोज कुळकुळीत दाढी केलेलं पाहून,
डोक्यावरच्या केसांचंही,
वाढायचं अवसान गळत चाललंय हल्ली...

मग पुन्हा तीच वेळ,
तेच कॅन्टीन, तेच टेबल,
तोच डबा,
आतली भाजी तरी सुदैवाने बदलतीये अजूनतरी!
असं करत पुन्हा तीच संध्याकाळ,
तीच रात्र...
रविवार आला कि वेगळं वाटतं हल्ली!

घरी आलं कि तीच बायको,
(अर्थात यात तक्रार नाही काही)

घरी आलं कि तीच बायको,
तेच टेबल, तोच टीव्ही,
तेच चॅनल, तीच मालिका,
कालच्या पुढील भागात,
आणि आजच्या शेवटच्या प्रसंगात,
जेव्हडं घडतं,
तेव्हडच घडतंय माझ्या पण आयुष्यात हल्ली!


एव्हडं झाला कि तंद्री सुटते,
पुन्हा तोच प्रश्न,
"कसं जगायचंय आयुष्य आपल्याला?"
आणि पुन्हा तेच उत्तर,
"कसं ते माहित नाही,
पण असं नाही जगायचं अजिबात!"

"असं नाही जगायचं अजिबात!"




-नितीश साने ©

No comments

Post a Comment