"स्वतःचेच विचार संग्रहित करून ठेवावेत म्हणून आपण ते कागदावर उतरवून काढतो, आपल्या आठवणींचा तो कागद जपून ठेवतो, नंतर जेव्हा काही दिवसांनंतर किंवा काही वर्षांनंतर ते उघडून आपण वाचतो तेव्हा आपल्याच चेहऱ्यावर स्मितहास्य उमटतं! तेव्हा जो स्वतःशी संवाद होतो तो म्हणजे एकांत! असाच संवाद कधीतरी व्हावा अशी इच्छा बाळगून हे लिहितो आहे, म्हणून हा एकांत!"

Sunday 18 December 2016

रणभूमी

रणभूमी

तलवारींचे आघात थांबले, तोफाही ठंडावल्या; आता फक्त आक्रोश आणि किंचाळ्यांचा साक्षी होत आहे...
शेवटपर्यन्त साथ देण्याचे व्रत घेणाऱ्या साथीदारांना रणभूमी वर कोसळताना पाहतो आहे...
साम्राज्याचे प्रतीक म्हणून युद्धात भूषवलेला तो ध्वज आता काही क्षणांचा सोबती भासतो आहे...
शत्रूच्या अजस्त्र तोफेच्या तोंडी जाण्याऐवजी स्वतःचीच तलवार मानेवर ठेवून बलिदानाची तयारी करतो आहे...


द्वंद्व संपले, नगारे गरजले, आता सैन्याच्या जल्लोषात सहभागी होत आहे...
विजयी मुद्रेचा आव आणून आपणच केलेली माणुसकीची कत्तल पाहत आहे...
जमिनीच्या एका तुकड्यावर अधिराज्य गाजवायसाठी केलेले डावपेच आणि राजनीती फार मोठ्या पापासारखी भासत आहे...
आणि म्हणूनच आपल्याच कृत्यांची उपरति होऊन; प्रायश्चित्त म्हणून येथेच समाधी घेत आहे...


आज माझ्यावर कुणाची सत्ता नाही कुणाची मालकी नाही, तर या युद्धच्याच् स्मृतिंवर बांधलेल्या स्मशानभूमि आणि स्मरकांनी मी धगधगते आहे...
विजयवीरांनी कोरलेल्या युद्धाच्या गाथा कुठल्यातरी कातळावर मिरवते आहे...
अनेक वर्षांपूर्वी झालेल्या या युद्धाच्या जखमा आजही उरात बाळगणाऱ्या नवीन पीढ़ीलादेखील मीच चिथवते आहे...
"हरला तो दुष्ट आणि जिंकला तो श्रेष्ठ" या एकाच तत्वावर रचलेल्या इतिहासचे आजही मानचिन्ह ठरत आहे...



-नितीश साने ©

No comments

Post a Comment