"स्वतःचेच विचार संग्रहित करून ठेवावेत म्हणून आपण ते कागदावर उतरवून काढतो, आपल्या आठवणींचा तो कागद जपून ठेवतो, नंतर जेव्हा काही दिवसांनंतर किंवा काही वर्षांनंतर ते उघडून आपण वाचतो तेव्हा आपल्याच चेहऱ्यावर स्मितहास्य उमटतं! तेव्हा जो स्वतःशी संवाद होतो तो म्हणजे एकांत! असाच संवाद कधीतरी व्हावा अशी इच्छा बाळगून हे लिहितो आहे, म्हणून हा एकांत!"

Saturday, 17 December 2016

मास्टर पीस

मास्टर पीस


आयुष्यात आपल्याला खूप चांगले मित्र मिळावेत असं म्हणतात! मला खूप नाही मिळाले पण जे मिळाले ते सुदैवाने चांगले मिळाले. अशाच काही मोजक्या चांगल्या मित्रांमधला एक म्हणजे दत्तात्रय जोशी! दत्ताची आणि माझी ओळख म्हणजे अगदी शाळेपासूनची. पण तशी आमची मैत्री खुलली ती मात्र साठी नंतर. मी रिटायर झालो तेव्हा साधारण कधीतरी दत्ता आमच्या समोरच्या सोसायटी मधे राहायला आला. तेव्हापासून आमची एकमेकांकडे ये-जा चालू झाली.

              हा दत्ता मात्र जेव्हापासून माझ्या समोर राहायला आला तेव्हापासून माझ्यासारख्या रिकामटेकड्या माणसाचा वेळ मात्र अगदी छान जाऊ लागला. आम्ही रोज सकाळ - संध्याकाळ फिरायला जाऊ लागलो, कट्ट्यावर बसून गप्पा मारायला लागलो. दत्ताला लिहायचा छंद होता तर मला वाचायचा. त्यामुळे आमचं एकदम छान जमलं होतं. दुर्दैवाने पुढे दोन वर्षातच दत्ताची बायको वारली. दत्ताने खरी लिहायला सुरुवात केली ती त्या नंतरच! दत्ताच्या शब्दात मात्र खरच जादू होती. मनातले भाव तो शब्दात चित्र रेखाटल्याप्रमाणे उतरवत असे. पण बायको वरल्या पासून त्याच्या लिखाणातली जादूच हरवली होती. त्याचे लेख वाचून उदास वाटे. जणू त्याच्यातले चैतन्य च हरवले होते.

              दत्ताच्या घरची परिस्थिती सांगायची झाली तर दत्ताला एकूण तीन मुलं. त्यातली दोन शिकून अमेरिकेत स्थाईक झालेली तर धाकट्याची बदली नाशिक ला झालेली. त्यांची आई देवाघरी गेली तेव्हा ती दत्ताला भेटली ती त्यांची आणि दत्ताची शेवटची भेट, म्हणजे साधारणतः आजपासून आठ वर्षांपूर्वी. दत्ता मात्र त्यांना पुढची २-३ वर्ष नियमित पत्र पाठवत होता, पण त्यांच्यापैकी कुणीच कधी दत्ताला उत्तर पाठवलं नाही. एकदाच मागे ५-६ वर्षापूर्वी त्याच्या धाकट्या मुलाचा फोन आला होता असं त्याच्याकडूनच मला कळलं होतं. 
"आज धाकट्याचा फोन आला होता. तिकडे नाशिकला माझ्या नातवंडांची हौस म्हणून कुत्र्याचं पिल्लू पाळलं, आणि आता जागा कमी पडते म्हणून इकडे पाठवणार आहे. मला आपलं म्हणाला, तुम्ही एकटेच असता तिकडे, तुम्हालाही जरा सोबत"
"त्याला कुठली आलीए माझी काळजी? म्हातारा एकटाच असतो, एखादवेळेस चोर-बिर आला आणि म्हाताऱ्याला मारून आपली ईस्टेट पळवून गेला तर निदान कुत्रा तरी असू देत म्हणून पाठवलाय बर का!"
          
              पण ते काहीही असलं तरी हे कुत्र्याचं पिल्लू आल्यापासून मात्र दत्ताचं आयुष्यच बदलून गेलं. या कुत्र्यानं महिन्या-दोन महिन्यातच मला आणि दत्ताला लळा लावला. मग आमचा रोजचा वेळ या कुत्र्याबरोबर खेळण्यात आणि त्याला फिरवून आणण्यात कसा मस्त जाऊ लागला. मीही रिकामटेकडाच, माझी बायको मागेच कार अपघातात गेली. सुदैवाने का दुर्दैवाने ते माहित नाही पण मी मात्र वाचलो. मला मूल-बाळ नाही. त्यात मी आणि दत्ता दोघेही पेन्शनर. त्यामुळे आता उरलेल्या आयुष्यात दोघांनाही कसलीच चिंता नव्हती.
"नाव काय ठेवायचं रे या पिल्लाचं?" त्याने मला विचारलं
मीही काही सुचवणार एव्हड्यात तोच म्हणाला,
"बाकी नावात काय आहे म्हणा, कुत्र्याचं वाटेल असं ठेवूयात!"
मग या पिल्लाचं नाव मोती ठेवलं.
या मोतीने मात्र दत्तामधलं हरवलेला चैतन्यच जणू परत आणलं. मोती दत्तावर अगदी जीवापाड प्रेम करायचा. त्याचा खेळ बघता बघता तर आम्ही तासनतास रमून जायचो. कधी टाकलेला चेंडू आणून द्यायचा तर कधी लपंडाव खेळत असल्यासारखा बिछान्याखाली लपून बसायचा. दत्ता कधी रागावलाच तर मुकाट्याने कोपऱ्यात जाऊन बसायचा. पण मग थोड्यावेळाने कारामेनासं  झालं की स्वतःच मान खाली घालून शेपटी हलवत दत्ताकडे येउन बसायचा. मग दत्ता सुद्धा मायेने त्याचे भरपूर लाड करीत असे. या मोतीने जणू दत्ताच्या नातवंडांचीच उणीव भरून काढली होती. सुरुवातीला जेव्हा हा आला तेव्हा दत्ताची काळजीच वाटली होती. हा एवढा कुत्र्याचा व्याप दत्ता कसा सांभाळणार आहे असे वाटे. पण दत्ताने या मोतीला अगदी मायेने वाढवले.
यामुळे कमी होत गेलेले दत्ताचे लिखाण पुन्हा नव्या जोमाने चालू झाले. आता तर लहर आली की दत्ता आपले लेख मासिकांना वगैरे पाठवू लागला. या मोतीमुळे दत्ताच्या आयुष्यातील उमेद आणि उत्साह परत आला होता. दत्ताला लिखाणाची आवड लहानपणापासून होतीच, पण साठी नंतर मात्र त्याची हि कला खऱ्या अर्थाने बहरली. आता दत्ताच्या श्रोत्यांमध्ये या मोतीची पण भर पडली होती. काही नवीन लिहिलं की लगेच त्याचा फोन येई. मग तो मला आणि मोतीला ते वाचून दाखवायचा. 
तेव्हा मी आणि मोती एवढाच काय तो दत्ताचा श्रोतावर्ग. एकंदर आमची दिनचर्या एकदम झकास चालली होती. पण अलिकडेच दत्ताची तब्येत जर खालावली. त्याला गुडघेदुखी चा त्रास चालू झाला. हळू हळू त्याचं घराबाहेर पडणंही बंद झालं. मग मोतीला फिरवून आणण्याची जबाबदारी माझ्यावर आली. त्यातच दत्ताला रात्रीची झोपेची गोळी चालू झाली.
पण हे असं झाल्यामुळे त्याच्या लिखाणाचा वेग होता त्याच्या दुप्पट झाला. दत्ताला उठता बसताना त्रास होत असल्यामुळे, त्याच्या घराची एक किल्ली त्याने माझ्याजवळ दिली होती. मग त्याचा फोन आला की तडक उठून त्याच्या घरी जायचं, की मग नेहमीप्रमाणे दत्ता त्याच्या साहित्याचं वाचन करीत असे आणि मी व मोती मनापासून ते ऐकत असू. या इतक्या चांगल्या लेखकाचा वाचकवर्ग मात्र कधी २ च्या वर गेला नाही याचं मात्र मनापासून वाईट वाटतं. मागे त्याचे २-३ लेख मासिकात छापून आले असले तरी त्यावर वाचकांच्या प्रतिक्रिया वगैरे काही आल्या नाहीत. 
हे असंच चालू असताना एक दिवस दत्ता चा रविवारी दत्ताचा फोन आला
"हॅलो! गुड मोर्निंग! एक नवीन गंमत लिहिली आहे! माझं आजपर्यंतच सर्वात मोठं काम! माझा मास्टर पीस!  कधी येतो आहेस?"
संध्याकाळी नक्की येतो असं म्हणून मी फोन ठेवला. रविवार असल्यामुळे मी एकदम निवांत होतो. बाकी कितीही सवयी मी बदलल्या असल्या तरी रविवारी निवांत आवरायचं हि परंपरा मात्र मी चालू ठेवली होती. अर्थातच रविवारी मोतीला फिरवून आणायच्या ड्युटीलाही आज सुट्टी होती! त्यामुळे मी मोती व दत्ताला आज संध्याकाळीच भेटणार होतो.
दत्ताचा मास्टर पीस! मला मनातल्या मनात हसूच आलं, पण उत्सुकताही होती. कारण दत्ता कधीच स्वतःच्या लिखाणाची स्तुती करत नसे.

                    संध्याकाळी मग मी जरा लवकरच दत्ताच्या घरी जायसाठी निघालो. घराची बेल वाजवली आणि माझ्याकडच्या किल्लीने दार उघडून आत गेलो. दत्ता समोरच्या आरामखुर्चीत पहुडला होता.
"काय रे कुठेय तुझा मास्टर पीस?" मी विचारलं.
त्याने काही उत्तर दिलं नाही. असा त्याचा शिष्टपणा मला काही नवीन नव्हता.
"काय रे, डोळा लागला का?" मी परत विचारलं. तरी काही उत्तर नाही. 
मग मीच जवळ जाऊन त्याला जरा हलवलं, तर त्याची मान एका बाजूला झुकली. 
दत्ता!
मी तोल सावरण्यासाठी त्याला धरलं. त्याचं अंग गार पडलं होतं. मला काही सुचेना. मी तसाच कडेला बसून राहिलो. मधे किती वेळ गेला काही कळलं नाही. मन एकदम सुन्न झालं. माझ्यासाठी हा खूप मोठा धक्का होता. थोड्यावेळाने भानावर जेव्हा आलो तेव्हा हात नकळत समोरच्या टेलिफोन रिसिव्हरकडे गेला. मी नंबर फिरवणार, इतक्यात समोरच्या टेबल वर एक एन्व्हलप दिसलं, त्याच्यावर लिहिलं होतं,
"मास्टर पीस!"
शेजारी एक कागद होता. थोड्या पुढेच झोपेच्या गोळ्याचं एक पाकीट होतं. पूर्णतः रिकामं! जड मानाने मी रिसिव्हर परत खाली ठेवला. मला आता अश्रू आवरणं कठीण जात होतं. समोर असलेला कागद मी उचलला. त्यावर सुवाच्य अक्षरात एक मजकूर लिहिला होता

                   " मोतीला शोधत असशील तर थांब! त्याचा काहीही उपयोग नाही. मोती आज सकाळीच दगावला. पाहटे पासून खूप भुंकत होता आज. का कोण जाणे पण आज त्याला फिरायला जायचेच होते; काहीही करुन. पण खूप भुंकूनही मी काहीच दाद देत नाही म्हणल्यावर तो भुंकायचा बंद झाला. मला वाटलं कंटाळून शांत बसला असेल. पण १५ मिनिटही झाली नसतील तोच रस्त्यावर कसला तरी आवाज झाला आणि मागून मोतीचा केविलवाणा आवाज आला. मी तसाच अंथरुणातून उठून बाहेर रस्त्यावर आलो. बघतो तर रस्त्यावर मोतीचा देह निपचित पडला होता. मी जवळ गेल्यावर त्याने भुंकण्याचा प्रयत्न केला. त्याची ती अवस्था बघवत नव्हती रे मला! मग रस्त्यावरच्याच एका मुलाने त्याला माझ्या घरी आणायला मदत केली. एका गाडीची धडक बसली असं तो मला म्हणाला. मोतीवर प्रथमोपचार म्हणून मी हळद आणि कापूस त्याच्या जाखमांवर लावलं. नंतर मागच्या खिडकी कडे पाहिलं तेव्हा लक्षात आलं की अंगणाच्या बाजूची एक खिडकी उघडीच राहिली होती. तिथूनच मोती बाहेर गेला असावा. पण आज तो इतका का धडपडत होता ते मात्र समजलं नाही. कदाचित त्याला आपल्या आयुष्याचा जोडीदार तर मिळाला नसेल? मी घाई घाईने सगळ्या गुरांच्या दवाखान्यात फोन केले पण छे! कोणीच उचलेनात. शेवटी एका ठिकाणी फोन लागला तेव्हा कळलं की गुरांचे सर्व दवाखाने दहा नंतर उघडतात. इथे माणसाच्या जीवाची कोणी परवा करत नाही. या मोतीच्या जीवाची कोण परवा करणार? मी मात्र मोतीच्या कानात कुजबुजत राहिलो, बाबा रे, दहा वाजले एकदा की मी तुला तडक घेऊन जाणार हा मी दवाखान्यात. भाषा जरी कळत नसली आम्हाला एकमेकांची, तरी भावना कळत होत्या रे! पुढचे दोन तास तग धरून होता तो. पण अखेर त्याने प्राण सोडला. मी मात्र तिथेच बसून ढसा-ढसा रडत राहिलो. या मोतीचा रीतसर अंत्यविधी करायचा असा ठरवलं. मात्र अशी चौकशी केली असता, प्राण्यांची दफनभूमी कोठेही नाही अशी माहिती एका दवाखान्यातूनच समजली. मला तर हे अजिबात खरं वाटलं नाही. आणि असेलही कुठेतरी लांब कदाचित पण मी तरी या वयात कुठे कुठे शोधणार होतो अशी दफनभूमी? अखेर त्यांच्यावर विश्वास ठेवण्याखेरीज मी करू तरी काय शकणार होतो दुसरं? शेवटी कचरा गोळा करणाऱ्या माणसांनाच घरी बोलवून त्याला…"

पुढचे शब्द मात्र पुसट झाले होतेअश्रूंच्या थेंबांनी.

"या मोतीने मात्र माझ्या आयुष्यातली सगळी दुखः दूर सारली. तुला आठवतं, मागे मी कविता लिहिली होती की निस्वार्थी प्रेम वगैरे सगळं खोटं आहे. आणि हि सुद्धा एक कविकल्पना आहे अशा आशयाची. हा मोती आल्यानंतर मीच ती कविता फाडून टाकली. मला वाटायचं सुरुवातीला की खायला मिळतं म्हणून प्रेम करतो हा आपल्यावर, पण मागे एकदा मी घराबाहेर पडलो असता, एक ओळखीचे गृहस्थ भेटले आणि गप्पांमध्ये वेळ कसा गेला ते कळलंच नाही. घरी यायला खूप उशीर झाला. मग लक्षात आलं कीमोतीला खायला आपण आज काहीच दिलं नाही. पण मी घरी आल्यावर मात्र तो तितक्याच उत्साहाने शेपटी हलवत जवळ आला. त्याच्या मनात कसलाच राग किंवा रुसवा नव्हता. डोळ्यात फक्त मी भेटल्याचा आनंद होता.
मी आपलं असं ऐकून होतो की माझ्यासारखे म्हातारे आपल्या नातवंडांकडे पाहून तग धरतात. मी मात्र या मोतीमुळेच तग धरून होतो. आता ह्याच्याशिवाय आयुष्याची कल्पनाच अशक्य होती. आणि म्हणूनच आपलं उरलं सुरलं आयुष्य संपवून टाकायचा निर्णय घेतला. पण जाता जाता एक शेवटची गोष्ट लिहून जायचं असं ठरवलं. आणि तो म्हणजे या खालच्या एन्वलप मध्ये असलेला माझा मास्टर पीस!

              मास्टर पीस म्हणजे एखाद्याची सर्वश्रेष्ठ कलाकृती. आता मी तर एक लेखक! त्यामुळे माझ्या या कलाकृती ला सर्वश्रेष्ठ म्हणण्याचे कारण असे की, ही गोष्ट आत्तापर्यंत लिहिलेल्यामध्ये सर्वाधिक वाचली जाईल. अगदी माझ्या  एकही पत्राला उत्तर न पाठवणारे माझे सख्खे नातेवाईक, ही गोष्ट वाचण्यासाठी मात्र अगदी परदेशातून इथे भारतात येतील. एखाद्या वकिलाला नेमून त्याचे जाहीर वाचन होईल. आणि पुढले १३ दिवस तरी हे माझे लिखाण चर्चेत राहील. इतकेच काय, यावरून अगदी वाद-विवाद पण निर्माण होतील. हे सर्व तुला सांगण्याचे कारण इतकेच, की माझ्या जुन्या मृत्युपत्राप्रमाणे, माझी सर्व संपत्ती तुला देण्यात यावी असा उल्लेख करून, शेवटची इच्छा म्हणजे मोतीची मनापासून देखभाल घेतली जावी हि होती. पण आता सर्व समीकरणं बदलली. आता अशाप्रकारे मरण पावल्यावर जर मी माझी संपत्ती तुझ्या नावे करत आहे असे लिहिले तर पोलिस सगळ्यात आधी तुझी चौकशी चालू करतील. शेवटी खूप विचाराअन्ती मी असा निर्णय घेत आहे की माझी सर्व संपत्ती माझ्या नातेवाईकांमध्ये वाटण्यात यावी. 

आणि शेवटची इच्छा मात्र पार पडायची जबाबदारी तुझ्याकडे आहे. ती अशी,
' माझं लिखाण असलेल्या सर्व डायरीज आणि वह्या, ह्या ते समजण्यास योग्य अशा वाचकास, म्हणजे श्री दिनकर कुलकर्णी यांच्याकडे सुपूर्त करण्यात याव्यात.'

माझ्या नातेवाईकांना काय कळणार रे याची किंमत? रद्दीत द्यायलाही कमी करणार नाहीत ते. आणि तुझ्या दृष्टीने पैशाचे मोल किती आहे हे मला चांगलंच माहित आहे. त्यामुळे अर्थातच माझी सगळ्यात किमती मालमत्ता मी तुझ्या स्वाधीन करत आहे. त्यामुळे मी प्रत्यक्ष जरी तुझ्याबरोबर नसलो तरी या संग्रहाच्या रूपाने कायमच तुझ्याबरोबर असीन. अगदी शेवटपर्यंतआणि आजपर्यंत एकदाही माझी आठवण न काढलेले माझे नातेवाईक म्हणतील, की म्हातारा तऱ्हेवाईक होता पण मरता मरता सगळी ईस्टेट आपल्या नावावर करून एकतरी चांगलं काम करून गेला!

आणि म्हणूनच आहे हा माझा मास्टर पीस!"




-नितीश साने ©

No comments

Post a Comment