"स्वतःचेच विचार संग्रहित करून ठेवावेत म्हणून आपण ते कागदावर उतरवून काढतो, आपल्या आठवणींचा तो कागद जपून ठेवतो, नंतर जेव्हा काही दिवसांनंतर किंवा काही वर्षांनंतर ते उघडून आपण वाचतो तेव्हा आपल्याच चेहऱ्यावर स्मितहास्य उमटतं! तेव्हा जो स्वतःशी संवाद होतो तो म्हणजे एकांत! असाच संवाद कधीतरी व्हावा अशी इच्छा बाळगून हे लिहितो आहे, म्हणून हा एकांत!"

Saturday, 17 December 2016

देऊळ

देऊळ 



आमच्या बोळाच्या टोकापाशी एक छोटंसं राममंदिर आहे. रस्त्याचा जणू केंद्र बिंदू असावं इतकं ते रस्त्याच्या मध्यभागी ते अहे. आता खरं पहायचं झालं, तर या देवळाच्या मागच्या बाजूला आणखी एक रस्ता बांधता येईल इतकी जागा शिल्लक आहे पण महानगरपालिका, "आपण केलेल्या कामाचा लोकांना जास्तीत जास्त त्रास कसा होईल याची अतिशय मनापासून काळजी घेत असल्यामुळे तो रस्ता असा बरोबर मधोमध बांधण्यात आला असावा."
       परवाच त्या मंदिरावरून पुढे जाणारा एक सायकलस्वार पहाटे  अंधारात न दिसल्यामुळे तिथे धडपडला. मग आमच्या गोपाळकाकांनी, महानगर पालिकेला याबाबत एक नोटीस धाडली. नेहमी प्रमाणे महानगरपालिकेने त्याची अजिबात दाखल घेतली नाही. मग काही दिवस मधे गेले, आणि एके दिवशी चक्क पेपरात बातमी आली. "नारायण पेठेतील राममंदिर ठरतेय वाटसरुंसाठी अडथळा!"
     
आणि मग काय, एकदा पेपरात बातमी छापून आली म्हटल्यावर पालिका आणि सत्ताधारी पक्षाला एकदम खडबडून जाग आली आणि लगेच दुसऱ्याच  दिवशी पुन्हा बातमी आली,
"नारायण पेठेतील वाटसरूंना अडथळा ठरणारे राममंदिर पाडणार!"
  
         या बातमी नंतर विरोधी पक्ष एकदम चवताळून उठला आणि मिडिया मध्ये सर्वत्र उत्साह पसरला. त्यांना मुळी चघळायला नवीन विषयच मिळाला होता. मग वातावरण तापू लागलं, वेगवेगळ्या घोषणा पडायला सुरुवात झाली,
"वर्षानुवर्षे जतन केलेल्या संस्कृतीची अशी राख रांगोळी होऊ देणार नाही."
"लोकांच्या भक्ती आणि श्रद्धेला तडा जाऊ देणार नाही." इत्यादी
आता खरं सांगायचं झालं तर हे मंदिर जरी अनेक वर्ष जुनं असलं, तरी विरोधी पक्षाने देखील त्याची आजिबात दखल घेतली नव्हती. पण चढाओढ "पाडा-पाडी" च्या राजकारणावरून असल्यामुळे, विरोधी पक्षाचा हात कोण धरणार?

          मग विरोधी पक्षातील लोकांना पण चांगला रोजगार मिळाला. दिवसभर मंदिराच्या आवारात बसून येणाऱ्या जाणाऱ्या भक्तांच्या "संस्कृती जतन" फोर्म्स वर सह्या घेणे वगैरे असले उद्योग चालू झाले. अशावेळी विरोधी पक्षाने आणि मिडिया ने दाखवलेली तत्परता जर नैसर्गिक आपत्तीच्या वेळी दाखवली तर किती बरं होईल! मग शेवटी सरकारनेच पडतं घेतलं आणि दुसऱ्या दिवशी परत पेपरात बातमी आली,
"नारायण पेठेतील वाटसरूंना अडथळा ठरणारे राममंदिर हलवणार!"

          पण सरकारने धोरण काढावं आणि विरोधकांनी ते ऐकावं हे राजकारणात फ़ाऊल धरत असल्यामुळे विरोधकांनी तज्ञांच्या मदतीने एक युक्ती शोधून काढलीच!
त्यांच्या मते, "मंदिराच्या मागच्या बाजूला असलेल्या छिद्रातून सूर्याची सोनेरी किरणे पहाटे पहाटे त्या मूर्तीच्या मुकुट आणि मस्तकावर पडतात!"
वास्तविकतः हे छिद्र वगैरे नसून चांगलं मोठं भगदाड होतं. अनेक वर्षे कोणी दखल न घेतल्यामुळे मंदिराची पडझड होऊन मागची एक वीट तुटल्यामुळे तिथून ती किरणं आत यायची हे सर्वांना माहित होतं.
आता ही जागा जर हलवली तर ती किरणं मूर्तीच्या "मस्तकावर पडणार नाहीत असं त्या तज्ञाचं म्हणणं होतं. आता ती किरणं निव्वळ यागायोगाने त्या मूर्तीच्या डोक्यावर पडतात हे सत्य कोण त्यांना समजवायला जाणार?
आणि मग बातमी तापतेय म्हणल्यावर रोज तिथे मिडिया वाल्यांची गर्दी, आजूबाजूच्या लोकांच्या मुलाखती, त्या फोर्म्स वर सह्या अंगावर खेकसून सांगायच्या त्या ठळक बातम्या वगैरे नेहमीचे प्रकार सुरु झाले. खरा सांगायचं तर हे मंदिर तेथून हलवावे अशीच सगळ्यांची इच्छा होती. पण मग सरकार काहीच पावलं उचलत नाही म्हणल्यावर यांच्या ज्या घोषणा होत्या त्या गर्जना झाल्या आणि मग दंगे करू, बंद करू अशी भाषा चालू झाली.
आता हे एवढं कारण अगदी भारत नाही तरी पुणे बंद ला पुरेसं होतं. त्यातून मिडिया चा यात मोठा सहभाग होता. आणि परवा चक्क समोरच्या जोशी आजोबांना बोलावलं मुलाखतीला! मग ते आल्यावर लोकांचा मोठा घोळकाच त्यांच्या भोवती जमला.
"काय विचारलं हो?"
"काही नाही, तुम्हाला काय वाटतं? तुमचा अभिप्राय आणि सही!"
"मग?"
"मग काही नाही दोन्ही बाजूंनी बोललो मी. म्हणजे म्हणालो की लोकांना जरी या मंदिराचा अडथळा होत असला तरी पण या प्राचीन सूर्यमंदिराला जर इथून हलवल्यामुळे धक्का पोहोचत असेल तर मग आहे तिथेच असू द्या!"
"सूर्यमंदिर?"
"आता किरणं पडतात ना, मग मीच करून टाकलं सूर्यमंदिर!"
मग मधे थोडे दिवस जायचा अवकाश की परत पेपरात एके दिवशी बातमी आली,
"नारायण पेठेतील सूर्यमंदिर ठरतेय पर्यटकांसाठी आकर्षण!"

           मग हळू हळू हे प्रकरण मावळत गेलं, आज लोक ते विसरूनही गेली. आज या गोष्टीला ६ वर्षं झाली तरी ते मंदिर आहे तिथेच आहे. आजही कोणी तिथे धडपडलं तर जरा आरडा-ओरड होते, मग पुन्हा आपलं जैसे थे!
आता ते भगदाड मात्र सुदैवाने अजून मोठं झालेलं नाही. कारण त्या मंदिराची आता डागडुजी वगैरे केली आहे. आता ते राममंदिर मात्र सूर्यमंदिर झालय, आणि तो रामही होता त्याच जागी ऊन खात बसलेला आहे. 




नितीश साने ©

No comments

Post a Comment