गेले काही दिवस चालली होती तशीच आजही, "का झालं? कशामुळे झालं?" याचाच शोध घ्यायची
धडपड चालू होती. मनात विचारांचं माजलेलं, काहूर काही शांत व्हायचं नाव काढत
नव्हतं. त्याला कारणही तसंच होतं म्हणा! अगदी काही महिन्यांपूर्वी संकेत गोखले या
उदयोन्मुख प्राध्यापकाची नोकरी,
५ वर्ष जीवापाड मेहनत करून देखील, फक्त मुख्याध्यापकांशी असलेल्या
वैराखातर गेली होती आणि योगायोगाने अगदी त्याच वेळी, त्याच्या या ५ वर्षातील मेहनतीच फळ
असलेली बँकेतील ठेव देखील कोणा अज्ञात इसमांनी केलेल्या फसवणुकीमुळे बुडली होती.
"संकटं चालून येतात तेव्हा एकटी दुकटी नाही तर चांगली झुंडीने येतात."
असं कुठेतरी वाचलेलं आज पुसटसं आठवत होतं. अगदी जणू या वाक्याची प्रचिती यायसाठीच
उदाहरण म्हणजेच त्याचं जगणं झालं होतं! त्यात 'तीदेखील' सोडून गेली होती. नोकरी नंतर आता धंदा
करायचा असा विश्वास टाकलेल्या त्या धंद्याने देखील दिवाळखोरीची वाट दाखवली होती.
काय व्हायचं राहिलं होतं आता या आयुष्यात? "असं जगणं
जगण्यापेक्षा ते संपवलेलं काय वाईट?"
पण असे विचार कसे पळपुटेपणाचे आहेत हे त्यानेच तर त्याच्या
विद्यार्थ्यांना ओरडून ओरडून पटवून दिलं होतं.
कितीतरी मोठ्या लोकांच्या पेचप्रसंगांच्या गोष्टी सांगितल्या
होत्या. अनेक प्रेराणादाई पुस्तके वाचली होती, वाचून दाखवली होती पण सारं कसं आज
अगदी व्यर्थ वाटत होतं.
"मोठ्या लोकांसाठी भाषणं देणं सोपं असतं कारण ते मोठे झाल्यानंतर
त्यांनी भाषणे दिलेली असतात."
आज अचानक कुठल्यातरी चक्रव्युहात फसल्यासारखं वाटत होतं.
धंद्यासाठी कर्ज काढताना गहाण टाकलेल्या घरातलं समान आवरताना अजून
काय विचार मनामध्ये येणार होते.
या खोट्या सप्नांची अशा दाखवून त्यात रमवून टाकणाऱ्या या सगळ्या
पुस्तकांच्या ढिगाला आज रद्दीत टाकायचं होतं!
असंच सामान आवरताना समोरच्या कपाटात त्याला आपली शाळेतली डायरी
सापडली.
"पूर्वी किती तरी दिवस हि डायरी हरवली असं समजून आपण हि शोधण्यात
घालवले होते." त्याला आठवण झाली.
या डायरीत त्याने वाचलेल्या सर्व पुस्तकांमधून चांगले चांगले विचार
निवडून लिहून ठेवले होते!
केवळ कुतूहल म्हणून त्याने मोरपीस घातलेलं पान उघडलं,
त्यावर लिहिलं होतं,
"कितीही काळे ढग दाटून आले, तरी दरवेळेस पाऊस पडतोच असं नाही, कारण आलेल्या ढगांना किती दूर नेउन
फेकायचं हे फक्त वाऱ्याच्या दिशेवर आणि इच्छेवर अवलंबून असतं! पण वाराच पडला तर
पावसाच येणं अर्थातच अटळ असतं!"
२-३ वेळा वाचून समाधान झाल्यावर डायरी मिटली! मन पुन्हा आधीसारख
खंबीर झालं होतं! समोरच्या पुस्तकाचं बांधलेलं गाठोडं सोडवलं आणि भंगारात
द्यायच्या सामानात पडलेला तो बुकशेल्फ बाजूला केला!
"खरच किती ताकद होती त्या विचारांमधे! वाऱ्याला देखील आता दिशा
मिळाली होती!"
-नितीश साने ©
No comments
Post a Comment