"स्वतःचेच विचार संग्रहित करून ठेवावेत म्हणून आपण ते कागदावर उतरवून काढतो, आपल्या आठवणींचा तो कागद जपून ठेवतो, नंतर जेव्हा काही दिवसांनंतर किंवा काही वर्षांनंतर ते उघडून आपण वाचतो तेव्हा आपल्याच चेहऱ्यावर स्मितहास्य उमटतं! तेव्हा जो स्वतःशी संवाद होतो तो म्हणजे एकांत! असाच संवाद कधीतरी व्हावा अशी इच्छा बाळगून हे लिहितो आहे, म्हणून हा एकांत!"

Saturday 20 May 2017

कोकणवारी - दापोली - मुरुड

कोकणवारी - दापोली - मुरुड (Dapoli & Murud) thumbnail 1 summary
कोकणवारी - दापोली - मुरुड (Dapoli & Murud)



पुणे ते दापोली अंतर: साधारण २१० किलोमीटर
जायची लागणार वेळ : स्वतःची गाडी असल्यास साडे पाच तास.
                            बसने जायचे झाल्यास साडे ६ तास.
मार्ग :                     ताम्हिणी - माणगाव मार्ग सर्वात उत्तम!       
जवळपास पाहण्यासारखी ठिकाणे : १) दापोली - मुरुड किनारा 
                                            २) दापोली कृषी विद्यालय 
                                            ३) आंजर्ले देवस्थान 
                                            ४) एप्रिल - मे मध्ये गेला असल्यास आंजर्ले कासव महोत्सव 
                                            ५) केशवराज मंदिर 
                                            ६) सुवर्णदुर्ग 
                                            ७) वेळास बीच आणि कासव महोत्सव (४० किलोमीटर)
                                            ८) पन्हाळेकाजी लेण्या 
                                            ९) कर्दे बीच ( ३० किलोमीटर )
                                            १०) हर्णे बंदर
                                            ११) वॉटर स्पोर्ट्स आणि डॉल्फिन सफारी
लॉज:     कामत रेस्टॉरंट्स
घरगुती व्यवस्था : http://www.dapoli.net/dapoli-hotels.html
                       सर्वात उत्तम म्हणजे थेट जाऊनच चौकशी करणे! (सहसा अशी आयत्या वेळी                           व्यवस्था व्हायला त्रास होत नाही)

सर्व नीट बघून यायचे असल्यास : कमीत कमी ३ दिवस!

गेल्या जवळपास वर्षभरात एकदा देखील कोकणवारी झाली नव्हती! आणि परीक्षा आणि अभ्यासाच्या व्यापातून पहिल्यांदाच वेळ मिळाला होता. त्यातच आमच्या ऑफिस ट्रिपचे आयोजन झाले तेही कोकणात! तेव्हा अखेर कोकणात जायची संधी मिळणार याची उत्कंठा लागली होती! त्यातच जायचा यायचा खर्च ऑफिस करणार अशी घोषणा झाल्यामुळे आनंद द्विगुणित झाला होता. फक्त तब्येत तेव्हडी ठीक नसल्यामुळे माझेच जरा तळ्यात मळ्यात होते. पण याआधीदेखील तब्येतीकडे दुर्लक्ष करून मी असे भटकायचे बेत आखले असल्यामुळे पुन्हा एकदा त्याचेच स्मरण करून मी जायचे पक्के केले! मग सगळ्यात पहिले कॅमेरा दुरुस्तीला टाकला आणि दिवस मोजायला सुरुवात केली! शेवटी दापोली हे ठिकाण पक्क झालं. दोनच दिवस असल्यामुळे छोटेखानी भटकंती करायची असा विचार होता, तरी मी थोडी जास्तच स्वप्न पाहत होतो. मी यापूर्वी देखील दापोलीला जाऊन आलो होतो पण तेव्हाचं फारसं काही आठवत नसल्यामुळे मी जरा सविस्तर बेत आखला!
माझा बेत असा होता कि जाता जाता वेळासला जाऊन कासव महोत्सव सुरु असल्यास पाहून येणे, त्यानंतर वाटेवरच कर्दे किनारा पाहून जेवून नंतर दापोलीला परत येणे. आल्यावर आंजर्ल्याचे मंदिर करून मग संध्याकाळी (म्हणजे रात्रीच) बीच वर जाऊन फेरफटका मारून शेवटी झोप! मग सकाळी लवकर उठून केशवराज मंदिर पाहून येऊन बीच वर जाणे तिथे खेळून  मग तिथून डॉल्फिन सफारी करून सुवर्णदुर्ग पाहून परतीच्या वाटेला लागणे! 

सुवर्णदुर्ग


अर्थातच हा बेत रद्द झाला. आणि मग दुसरा म्हणजे "निवांत" हा जो बेत होता त्याला सर्वाधिक पसंती मिळाली. माझा अर्थात हिरमोड झाला.  
मग अखेर निघायच्या दिवशी आम्ही ठरलेल्या वेळेच्या अर्धा तास उशिरा निघालो. जसं जसं मुळशी जवळ आलं तसं कोकणात जाऊ लागल्याची खरी चाहूल लागायला सुरुवात झाली. कोकणात जायसाठी मला ताम्हिणी मार्ग हा सर्वात प्रिय आहे. ताम्हिणीत मला कुठल्याही ऋतूत जायला आवडतं! पावसाळ्यात तर या घाटाचं रूप इतकं देखणं होतं कि एकदा पावसाळ्यात देखील मी ताम्हिणीत जाऊन येतोच! तरी देखील यावेळेस बाकी मंडळींना कितपत रस असेल असा विचार करून मी करवंदांसाठी घाटात गाडी थांबवायची सूचना केली नाही. नाहीतर वाटेत हा रानमेवा खाऊन मन तृप्त झाल्याशिवाय आमची गाडी कोकणात वळत नाही. अर्थात खासगी गाडी असेल तरच हे करता येतं. 


शेवटी मग ताम्हिणीचं दुरून दर्शन घेऊन आम्ही मोठा ग्रुप असल्यामुळे गाणी गात, दंगा करत कोकणात पोहोचलो. जाताना माणगाव वरून गोरेगाव मार्गे गाडी घेता आली असती पण या मार्गे वेळ थोडा जास्त लागतो म्हणून हा बेत देखील रद्द केला. परंतु या मार्गावर लागणारं घनदाट जंगल हे कोकणातील समृध्द जंगलांपैकी एक असेल.
शेवटी एकदाचं आम्ही दापोलीत पोहोचलो. प्रवासात बराच वेळ गेल्यामुळे सगळेच जरा आळसटले होते. मग अखेर एका हॉटेलात थांबून आम्ही पेटपूजा करून घेतली. सुरमई थाळीमध्ये कोकणात खवय्येगिरी करताना हॉटेल या प्रकारामुळे चालू झालेली कंजूसी थोडीशी मनाला खंत लावून गेली खरी. पूर्वी अनलिमिटेड भाजी भात कोशिंबीर आणि माशाचे २ अथवा ३ पीस अशी हि थाळी फक्त एका छोट्या उसळ-वाटी वर आली होती. माशाचा देखील एकच पीस आला होता. असो, हे व्हायचेच होते. 
तिथून मग आम्ही जेवून खोलीवर गेलो. आम्ही १२ जणांमध्ये मिळून एक मोठा हॉल बुक केला असल्यामुळे, आवरावरीत खूप वेळ गेला. अर्थात याची आधी कल्पना होतीच. मी याआधी कोकणात अनेक घरगुती ठिकाणी राहिलो आहे, त्यामानाने इथली राहायची व्यवस्था मला जरा बेताचीच वाटली. कदाचित जोडून आलेल्या सुट्ट्यांचा परिणाम असावा. मागे एक सुंदर वाडी होती हा मात्र एक सुखावह घटक होता. 

आवरून मग आम्ही लगेच बीच वर गेलो. आता मन खऱ्या अर्थाने तृप्त झालं! मी कॅमेरा जवळ ठेवलाच होता. मी गेली पंधरा वर्ष कोकणात फिरतो आहे पण तरी देखील या ट्रिप पर्यंत माझ्याकडे समुद्रामध्ये होणाऱ्या सूर्यास्ताचा एकदेखील फोटो नव्हता. मुळात कॅमेराचा नव्हता. त्यामुळे या ट्रिप मध्ये मी कमीत कमी ५० तरी सूर्यास्ताचे फोटो काढले असतील.





 पाण्यात यथेच्च खेळून झाल्यावर मग आमची गाडी वॉटर स्पोर्ट्सकडे वळली. मला दिव्याघरला केलेल्या पॅरासेलिंगची आठवण झाली. तेव्हाच मी हा प्रकार परत करायचा नाही हे ठरवून ठेवलं होतं. याआधी मी बरेच साहसी क्रीडा प्रकार केले आहेत पण पॅरासेलिंगच्या वेळेची सेफ्टी पाहून मला खरंच धडकी भरली होती. पण बाकीच्या लोकांना बनाना राईड हा प्रकारच खूप थ्रिलिंग वाटत असल्यामुळे पॅरासेलिंगचा वगरे प्रश्नच नव्हता. हा प्रकार एकंदर अत्यंत बालिश होता. यात मला तरी कोणतेही थ्रिल वाटले नाही. तुम्ही देखील बाकी साहसी क्रीडा प्रकार केले असतील तर या बनाना राईडच्या वाटेल अजिबात जाऊ नका. यानंतर मग बाकीच्या लोकांनी पुन्हा पाण्यात खेळण्याचा आनंद लुटला. मी मात्र मनसोक्त सूर्यास्ताचे फोटोज काढण्यात वेळ घालवला. अखेर हवे तसे फोटोज मिळाले!  




येता येता बीच वर चौपाटी वर बर्फगोळा वगैरे इत्यादी पदार्थांची मजा लुटत मग खोलीवर आलो तसे परत आवरावरीचे मोठे सत्र चालू झाले. हे संपेपर्यंत रात्रीच्या जेवणाचीच वेळ झाली होती. मग पुन्हा कोळंबी थाळी घेऊन मी कोकणातील जेवणाची मजा लुटली. हि थाळी चवदार होती शेवटी आलेली सोलकढी देखील मी आजपर्यंत प्यायलेल्या सोलकढी मधील कदाचित सर्वोत्तम होती! 
रात्री चांदण्यात फिरायला जायचा प्लॅन पण रद्द झाला आणि मग लोकांचे इरादे भीती न वाटणाऱ्या "घोस्ट स्टोरीजकडे" वळले. असो मोठा ग्रुप म्हणल्यावर हे असे चालायचेच. फिरायला गेल्यावर मला झोप लागत नाही. म्हणजे एरवी देखील माझा आणि झोपेचा छत्तीसचा आकडेच आहे. तात्पर्य म्हणजे माझी रात्र बराच वेळ भुतासाखं एकट्याने जागून गेली. मग अखेर पहिला जो उठला त्याला घेऊन मी डॉल्फिन राईडसाठी नंबर लावायला गेलो. पण डॉल्फिन राईडला बराच अवकाश असल्यामुळे मग आम्ही पहाटे का होईना पण चांदण्यात फेरफटका मारून पुन्हा खोलीवर आलो. मग सगळ्यांचं आवरून झाल्यावर आम्ही डॉल्फिन राईडसाठी नंबर लावला. 
तिथे जी माणसं होती ती त्यांच्या वशिल्याने ठराविक लोकांना आत सोडत होती. लागलेल्या मोठ्या रांगेकडे जाणून बुजून दुर्लक्ष केला जात होतं. याउपर त्यांची वागणूक भाषा अतिशय उद्धटपणाची होती. काही लोकांनी मग यावर बहिष्कार घातला. आमचाही तोच विचार होता पण तेव्हड्यात तिकीट विकायला एक माणूस आला. कोकणात मला या अशा राजकारणाची अजिबात अपेक्षा नव्हती. इथे मी अनेक तिरसट आणि उध्दट माणसं याआधी बघितली आहेत पण अशी वशिलेबाजी मला अपेक्षित नव्हती. 
पण एवढा वेळ थांबून जी डॉल्फिन सफारी आम्ही केली ती मात्र खरंच बघण्यासारखी होती! जवळ जवळ अर्ध्या तासाच्या या सफारीत आम्हाला भरपूर डॉल्फिन्स दिसले. फक्त हे मच्छिमार लोक त्यांच्या बोटी ह्या डॉल्फिन्सच्या एवढ्या जवळ नेत होते कि ते बिचारे घाबरून बोटींपासून दूर जात होते तरी देखील त्यांचा पिच्छा चालूच होता. एकंदरच जैववैविध्याला धोका पोहोचेल अश्याच पद्धतीची हि एकंदर कार्यपद्धती मला तरी वाटली.  


डॉल्फिन सफारीनंतर मग नाश्ता करून आम्ही आवराआवरी केली आणि मग आंजर्ले आणि केशवराज मंदिर करून परतीच्या वाटेला लागायचे असा बेत आखला. पण पुन्हा एकदा आवराआवरीला खूप वेळ गेल्यामुळे केशवराजचा बेत रद्दच करावा लागला. मग आम्ही आंजर्ल्याकडे कूच केली. दापोली - मुरुड मार्गे आंजर्ले हा रास्ता खूपच सुंदर आहे. जाताना आधी लागणारी एक खाडी, मग डोंगरावरून दिसणारे समुद्राचे अतिशय मोहक रूप, समोर दिसणारा सवर्णदुर्ग, पलीकडे दिसणारे आंजर्ल्याचे मंदिर आणि आजूबाजूचा नारळ आणि सुपारीच्या बागांनी वेढलेला परिसर! कोकणातील काही सुंदर रस्त्यांपैकी हा एक रस्ता! (अर्थात ड्रायव्हर साठी नाही)


हर्णे बंदर आणि सुवर्णदुर्ग



आंजर्ल्याच्या मंदिरात मला तरी खास काही बघण्यासारखे वाटले नाही. तसेच या गणपतीला कड्यावरचा गणपती का म्हणतात हे देखील माझ्यासाठी एक कोडंच आहे. पण ह्या रस्त्यासाठी का होईना हे मंदिर पाहून आल्याचे मला समाधान आहे! येथे मग आम्ही थांबून मनसोक्त फोटो काढून घेतले आणि परतीच्या वाटेला निघालो. माझी जी कोकणवारीची व्याख्या आहे ती सोडून थोडी मौज मजेच्या परिभाषेनी केली भटकंती देखील नक्कीच स्मरणात राहील इतकी चांगली झाली यात शंका नाही! या भटकंती मध्ये बरंच काही बघायचं राहून गेल्यामुळे, लवकरच परत येण्याचा निर्धार केला आणि तृप्त होऊन परत निघालो. पुन्हा याच भागात यायची संधी एवढ्या लवकर येईल याची मात्र तेव्हा कल्पना नव्हती!
जाताना आमची वाट चुकल्यामुळे पोहोचायला बराच उशीर झाला, त्यामुळे ताम्हिणी घाटात सूर्यास्त पाहायची एक संधी मात्र गेली. अखेर अंधारातच ताम्हिणी घाट ओलांडला. माझ्यासाठी आमची कोकणवारी इथेच संपली!


-नितीश साने ©

1 comment

  1. mast lihil ahes..rahun gelelya goshti agdich sundar explain kelyayas

    ReplyDelete