"स्वतःचेच विचार संग्रहित करून ठेवावेत म्हणून आपण ते कागदावर उतरवून काढतो, आपल्या आठवणींचा तो कागद जपून ठेवतो, नंतर जेव्हा काही दिवसांनंतर किंवा काही वर्षांनंतर ते उघडून आपण वाचतो तेव्हा आपल्याच चेहऱ्यावर स्मितहास्य उमटतं! तेव्हा जो स्वतःशी संवाद होतो तो म्हणजे एकांत! असाच संवाद कधीतरी व्हावा अशी इच्छा बाळगून हे लिहितो आहे, म्हणून हा एकांत!"

Saturday 8 July 2017

कोकणवारी - अंजर्ले

कोकणवारी -  आंजर्ले (Anjarle & Velas) thumbnail 1 summary

कोकणवारी -  आंजर्ले (Anjarle & Velas)






पुणे ते आंजर्ले अंतर: साधारण २०० किलोमीटर
जायची लागणार वेळ : स्वतःची गाडी असल्यास साडे पाच तास.
                            बसने जायचे झाल्यास साडे ६ तास.
मार्ग :                     ताम्हिणी - माणगाव मार्ग सर्वात उत्तम!       
जवळपास पाहण्यासारखी ठिकाणे : १) आंजर्ले समुद्रकिनारा 
                                            २) दापोली कृषी विद्यालय 
                                            ३) आंजर्ले देवस्थान 
                                            ४) एप्रिल - मे मध्ये गेला असल्यास आंजर्ले कासव महोत्सव 
                                            ५) केशवराज मंदिर 
                                            ६) सुवर्णदुर्ग 
                                            ७) वेळास बीच आणि कासव महोत्सव (४० किलोमीटर)
                                            ८) पन्हाळेकाजी लेण्या 
                                            ९) कर्दे बीच ( २० किलोमीटर )
                                            १०) हर्णे बंदर
                                            ११) वॉटर स्पोर्ट्स आणि डॉल्फिन सफारी
                                            १२) केळशी बीच
                                            १३) दापोली डॉल्फिन सफारी व समुद्रकिनारा
राहायची सोय:     १) केतकी रिसॉर्ट
                      २) साठ्ये यांच्याकडील घरगुती निवास
                  सर्वात उत्तम म्हणजे थेट जाऊनच चौकशी करणे! (सहसा अशी आयत्या वेळी व्यवस्था व्हायला सहसा त्रास होत नाही)

सर्व नीट बघून यायचे असल्यास : कमीत कमी ३ दिवस!


गेले काही दिवस जी समुद्र किनारी जायची ओढ लागली होती, ती आता जरा शमल्यासारखी वाटत होती. नुकतीच दापोलीला एक छोटीशी भटकंती करून झाली होती. आणि आता इतक्यात तरी काही पुन्हा कोकणात जायचा योग्य येईल अशी चिन्हे दिसत नव्हती. पण काही गोष्टी व्हायच्या असल्या कि अगदी सर्व योगायोग जणू त्यासाठीच जुळून येतात. आणि अश्याच सर्व सुट्ट्या जुळून आल्या आणि पुन्हा एकदा कोकणवारीचा घाट घातला. यावेळेस मागील सर्व त्रुटींची कसर भरून काढायची असं देखील पक्क ठरवून टाकलं! हि ट्रिप इतकी आयत्या वेळी ठरली कि ठिकाण अगदी आदल्या दिवशी सकाळपर्यंत देखील निश्चित नव्हतं. त्यामुळे राहायची वगैरे व्यवस्था बघून ठेवायचा प्रश्नच नव्हता! गाडी तेव्हडी बुक करून ठेवली होती!

आंजर्ल्याची खाडी आणि समुद्र

मग अखेर आंजर्ल्याला जायचा बेत नक्की केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर निघालो! पुन्हा एकदा २ दिवसांचीच छोटेखानी भटकंती होणार होती. योगायोगाची एक गोष्ट म्हणजे निघायच्या दिवशीच होळी होती! त्यातच कोकणातल्या होळी बद्दल काही चांगले अनुभव ऐकण्यात आले होते! तेव्हा हि होळी देखील बघायला मिळणार याची एक उत्सुकता होती.
जायसाठी अर्थात ताम्हिणी मार्ग निवडला! मग यावेळेस गाडी घाटात थांबवून करवंद, लिंबोण्या अश्या रानमेव्यावर मनसोक्त ताव मारून घेतला. लोक सहसा जेवणावर ताव मारतात, पण आमची जातच भटक्यांची असल्यामुळे आम्हाला ताव मारायला रानमेवा देखील पुरतो! 



मग जसा ताम्हिणी ओलांडला तसं कोकणच्या चाहुलीच्या एकेक खुणा टिपत आम्ही आंजर्ल्याकडे कूच केली! दापोली पेक्षा आंजर्ल्याला जायसाठी वेगळा मार्ग निवडला होता, आणि मग काही गोष्टी जश्या तुमच्या आनंदाला धक्का पोहोचवण्यासाठीच राखून ठेवलेल्या असतात त्यातीलच एक गोष्ट झाली, ती म्हणजे ड्रायव्हर साहेबांनी पेट्रोलची कमतरता असल्याची घोषणा करून टाकली. आजपर्यंत विना स्टेफनीच्या गाडीतून जाऊन पंक्चर झाल्यामुळे खोळंबा झाल्याच्या घटना या कोकणातच माझ्याबाबतीत घडल्या आहेत. पण विना पेट्रोलच्या गाडीची हि पहिलीच वेळ! मग गाडी ढकलायला किती माणसं लागतात वगैरे याची विचारपूस आम्ही करून घेतली कारण दूरदूरपर्यंत पेट्रोल पंप नाही याची खात्री केव्हाच झाली होती. 
नशिबाने गाडी कशीतरी अंजर्ल्यात पोहोचली. उतरायची व्यवस्था अगदी मनासारख्या ठिकाणी होती! घरगुती खोली, मागे मोठी वाडी, 



जवळच असलेला समुद्र! मग थोड्याच वेळात जेवण तयार असल्याची वार्ता मिळाली आणि स्वारी तिकडे वळली! मग तिकडे अर्थात केळीच्या पानावर अगदी कोकणी पद्धतीचे जेवण, पोळी, उसळ, वरणभात, ओलं खोबरं घालून केलेली कोशिंबीर!


भरपेट जेऊन मग आमच्या भटकंतीची सुरुवात झाली! वेळास व केळशी हे दोन्ही बीचेस पाहून परत यायचं आणि मग गावात असलेली जंगी पारंपरिक पद्धतीची होळी अनुभवायची असा बेत होता! वेळासचा किनारा हा आंजर्ल्यापासून साधारण ४० ते ४५ किलोमीटर दूर आहे केळशीच्या किनारा हा वाटेवरच आहे. वेळासला आम्ही जायची जो रस्ता निवडला होता, तो ४० किलोमीटर चे अंतर कापायला दीड तास लागेल असा का दाखवत होता हे आम्हाला थोड्याच वेळात कळून चुकले. कोकणातल्या काही वाईट रस्त्यांपैकी हा एक रस्ता असावा. हा रास्ता तितकाच निर्जन देखील होता. त्यामुळे इथे जर का तुमची गाडी बंद पडली तर तुम्ही काय काय करू शकता याचा थोडा अभ्यास करून या रस्त्याची निवड करायला हवी!

वेळासचे वैशिष्ठ्य म्हणजे येथे अंडी घालणारी समुद्री कासवे (olive ridley turtles). भारतात काही मोजक्याच ठिकाणी हि कासवे आढळतात, त्यातलेच एक  म्हणजे वेळास! यामुळेच वेळासला UNESCO द्वारे जागतिक जैवविविधता वारसा केंद्र घोषित करण्यात  आहे! या कासवांचे वैशिष्ट्य म्हणजे यातले नर हे जन्मल्यावर एकदा समुद्रात गेले कि पुन्हा जमिनीवर येत नाहीत. मादी फक्त अंडी घालण्यासाठी किनाऱ्यावर येते. तेव्हा हि कासवं अंड्यातून बाहेर पडताना बघायला मिळणं म्हणजे नशीब चांगलं असण्याचं लक्षण आहे! ह्या कासवांना अंडी घालण्यासाठी काळ्या मातीच्या किनारपट्टीची आवश्यकता असते. तसाच समृदध किनारा वेळासला आहे! 



या कासवांची संख्या मात्र झपाट्याने कमी होत आहे. तेव्हा या कासवांच्या संरक्षणाचे काम येथील गावकरी काही तज्ज्ञ मंडळींच्या साहाय्याने करतात. हि कासवे; अंडी जमिनीच्या  खाली ३-४ फुटांवर घालतात. येथील अभ्यासकांना जर किनारपट्टीवर अश्या काही खुणा सापडल्या तर ते हि अंडी तीथून हलवून जाळीने वेढलेल्या एका संरक्षित ठिकाणी आणून ठेवतात! मग एकदा का ह्या अंड्यातून कासवाची पिल्ले बाहेर आली कि त्यांना किनाऱ्यावर पोहोचवायचे काम देखील करतात. यामध्ये धोका असा असतो कि हि कासवे समुद्रापर्यंत जाईपर्यंत काही भक्षक (गरुड किंवा गिधाडं) यांची वाटेत शिकार करतात. म्हणूनच यांना समुद्रात पोहोचवायचे काम देखील करावे लागते. साधारण एप्रिल - मे महिन्यामध्ये तुम्ही हा कासव महोत्सव अनुभवू शकता. दुर्दैवाने आम्ही गेलो त्या दिवशी या अंड्यातून कासवं बाहेर पडली नाहीत. (म्हणजेच hatching झाले नाही) येता येता तेथील एका प्रमुखांशी थोडा परिचय झाला (मोहन उपाध्ये - हे तेथील कासवांचे अभ्यासक आहेत). त्यांच्याकडून अशी माहिती मिळाली कि आंजर्ल्यात देखील काही अभ्यासक हे काम करतात व तेथे जर का हे hatching बघायला मिळणार असल्यास तेथील अभ्यासक याबाबतची माहिती देऊ शकतील! तसेच आंजर्ल्यात नुकतेच pangolin (उदमांजर) दर्शन देऊन गेल्याचे देखील समजले! मग तांतडीने मी आंजर्ल्यातील अभ्यासकांचा मोबाईल नंबर घेतला (अभिनय केळसकर हे आंजर्ल्यातील कासवांचे अभ्यासक आहेत) व उपाध्ये साहेबांचे आभार मानून निघालो. वेळासचा किनारा देखील खूप सुंदर व स्वच्छ आहे! पर्यटकांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत चालली आहे! फक्त मानवी हस्तक्षेपामुळे या कासवांचे अस्तित्व आणि किनाऱ्याचे सौंदर्य धोक्यात येऊ नये एव्हडीच एक प्रार्थना.

वेळास बीच वरील सूर्यास्त


येताना अंधार पडल्यामुळे आम्ही दुसरा रास्ता निवडला. या रस्त्याने देखील साधारण तेव्हडाच वेळ लागेल असा अंदाज होता, पण जस आम्ही केळशी ओलांडलं, तसं, होळी हा कोकणात किती मोठा सण आहे याची आम्हाला कल्पना येऊ लागली. कोकणात प्रत्येक छोट्या छोट्या गावाची एक मोठी होळी असते. मग ह्या होळीचा अग्नी प्रत्येक वाडीत घेऊन जायचा आणि मग प्रत्येक प्रत्येक वाडीत एक होळी पेटते! ह्या सोहोळ्यात संपूर्ण गावातून एक छोटी यात्राच निघते. आणि यात पारंपरिक नृत्य कोकणी पद्धतीची गाणी असे अतिशय पारंपरिक स्वरूप या उत्सवाचे असते!
पण ह्या सोहोळ्यामुळे गावातील सर्व अरुंद रस्ते पूर्णपणे व्यापले जातात आणि मग तुमच्या गाडीला इंजिन बंद ठेऊन शांतपणे हा सोहोळा अनुभवण्याखेरीज दुसरा पर्यायच उरत नाही. बरं हि होळी साजरी करायचा कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत चालू असल्याचे आंजर्ल्यात कळले होते. त्यामुळे खोलीवर जायला आज रात्र होणार कि उद्याची सकाळ उजाडणार याची आमची चर्चा रंगली. कोकणातली होळी हि फक्त उत्सव म्हणून मोठी नसून आकारानेही खूप मोठी असते. इथली होळी म्हणजे जणू बुंध्यासकट झाडाचं पेटवून दिल्यासारखे होते. गाडी जवळून जरी गेली तरी होळीच्या झळा लागत होत्या. काही होळ्या तर घराला इतक्या लागून होत्या कि आता घराची देखील होळी होणार का अशी शंका ड्राइवर साहेबांनी व्यक्त केली. तेव्हा गाडी देखील त्या होळीच्या तितक्याच जवळून चालल्याची आम्ही त्यांना आठवण करून दिली. 
" तुम्हाला खरं सांगतो, अख्ख्या भारतात मी आजपर्यंत भरपूर फिरलो, पण अशी होळी कुठे बघितली नाही!" ड्राइवर साहेब उद्गारले. तेदेखील आमच्यासारखेच भारावून गेले होते. मग जाता जाता अशा अनेक होळ्या बघत बघत अनेक रस्ते बदलत आम्ही शेवटी एकदाचे आंजर्ल्यात पोहोचलो. कोकणातली होळी आकारमानाने अगदीच राक्षसी असते. खरंच एखाद दुसरी होलिका यात जळू शकेल इतकी! तर, अतिशय पारंपारिक पद्धतीने साजरा होणारा हा सण मुद्दामून खास कोकणात जाऊन अनुभवून पहा. त्याची एक वेगळीच रंगत असते!

आंजर्ल्यात पोहोचल्यावर आमच्या समोरच्या रूम वर देखील कोणीतरी उतरल्याची आम्हाला चाहूल लागली. मग रात्रीचे जेवण देखील एकत्रच करायचा योग्य आल्यामुळे या शेजारी मुक्कामास आलेल्या फडके दाम्पत्याशी ओळख झाली. हे गृहस्थ देखील मूळचे पुण्याचेच. सध्या आंजर्ल्यापासून थोडं दूर एका जंगलात हे घर बांधत आहेत अशी माहिती त्यांनी दिली. एकंदर मग गप्पा रंगल्या आणि मग या मंडळींचा देखील कोकणवारीचा अनुभव किती समृद्ध आहे याची चाहूल लागली. कुठल्याही भटकंतीत भेटलेल्या लोकांशी सहसा माझं सूत लवकर जुळतं! मग अगदी ते  ट्रेन मध्ये खेळलेल्या पत्त्याच्या डावापासून ते कुठल्यातरी बोटीत काही क्षण रंगलेल्या गप्पांतून कशामुळेही!
जेवण झाल्यावर मग आंजर्ल्यातल्या कासवांच्या अभ्यासकांना फोन केला. 
संदर्भ वगैरे झाल्यावर मग मुद्द्यावर चर्चा चालू झाली. 
"कुठून आलात तुम्ही?"
"मी पुण्याहून! आजच संध्याकाळी वेळासला जाऊन आलो, पण hatching काही पाहता आलं नाही! आंजर्ल्यात इतक्यात काही योगायोग?" - मी 
"कधी? आज संध्याकाळी? म्हणजे तुम्ही आंजर्ल्यात होतात? अरे! तुम्ही एक मोठी संधी दवडलीत. आजच संध्याकाळी एक मादा येऊन अंडी घालून गेली. जवळपास २ तास किनाऱ्यावर होती. साधारण ५ - ७ दरम्यान."
"अरे अरे, मग पुन्हा काही योगायोग?" - मी 
"नाही आता इतक्यात तरी काही चिन्हे नाहीत."
मग मी हळहळ व्यक्त करून, त्यांचे आभार मानून फोन ठेवला. नशीब खराब म्हणजे काय आणि किती याचा भटकंतीतला आणखीन एक आठवणीत राहील असा प्रसंग!
मग इतक्या होळ्या बघितल्यामुळे रात्रीची होळी बघण्याचा उत्साह संपला होता. आम्ही सरळ शांतपणे झोपून टाकलं. दुसया दिवशी लवकर उठून समुद्रावर खेळून एक फेरफटका मारला! मग जरा छान भूक लागली. नाश्ता करून आवरून आम्ही निघालो. जाता जाता केशवराज मंदिर करून मग ताम्हिणी मार्गे परत जायचे असा बेत आखला आणि निघालो!

पुन्हा एकदा त्या हर्णे बंदरावरून जाणाऱ्या रस्त्यावरून जाण्याचा योग्य आला. मग यथेच्छ फोटो काढून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो.


उजवीकडे सुवर्णदुर्ग आणि डावीकडे हर्णे बंदर

बराच वेळ गप्प असणाऱ्या ड्रायव्हर साहेबांनी मग हर्णे बंदर जवळ आलं तसं मच्छिचा विषय काढला!
"मागे मी एकदा या रॊड वरून चाललो होतो, तेव्हा संपुर्ण दोन्ही साईडला अशी मच्छि इथे वाळत घातली होती! संबंध रास्ता भरून!" ड्राइव्हर साहेब उद्गारले!
"नेमका मी आलो कि लोक अश्या उघड उघड चाललेल्या गोष्टी का लपवतात हे मला आजपर्यंत कळलेलं नाही!"
पण खरंच तुम्ही जर का कोणत्या ड्राइव्हर बरोबर जाणार असाल, तर त्यांच्याशी जास्तीत जास्त मारलेल्या गप्पा देखील तुम्हाला खूप काही शिकवून जातात!





अखेर आम्ही केशवराज मंदिरापाशी पोहोचलो. केशवराज मंदिरातली वाडी हि खरंच खूप समृद्ध आहे! 

केशवराज मंदिराकडे रस्ता
केशवराज मंदिर



पावसाळ्यात तर हि जागा अधिकच मोहून टाकते! वाटेत एक छोटा ओढा आहे, आजूबाजूला थोडे जंगल, शांतता, सर्व एकदम निसर्गरम्य! मग मंदिर पाहून झाल्यावर वाटेत थांबून  चांगला ग्लास भरून सोलकढी प्यायली. आता मात्र परतीची वाट पकडायला हवी होती!



तिथून मग आम्ही फक्त जेवायला वाटेत थांबलो. स्पेशल फिश- थाळीनी पुन्हा एकदा स्पेशल निराशा केली. मग जेवून झाल्यावर पुढचा स्टॉप थेट ताम्हिणी हे निश्चित केलं! वाटेत पुन्हा एकदा रानमेव्याचा फडशा पाडला आणि मग थोडी करवंद तोडून घेऊन लोणच्याची पण सोय करून घेतली! तेथून मग आम्ही थेट पिंपरी गावी गेलो! मागे दोन तीन वेळा, इथे येऊन देखील या independance point वरून दिसणारा दिसणारा  देखणा नजारा मी धुक्यामुळे नीटसा पाहू शकलो नव्हतो. आज हवा चांगली होती त्यामुळे मुद्दाम या बाजूला गाडी वळवली होती! अखेर इथे येऊन मनाला शांतता मिळाली! इथून दिसणारे दृश्य खरंच अद्भुत आहे!



तरी देखील येथे सूर्यास्त बघायचं मात्र एक छोटंसं स्वप्न राहून गेलं. पण एखादी अर्धवट राहिलेलीच गोष्ट तुम्हाला पुन्हा एखाद्या ठिकाणी बोलवत असते!
आता पुढचा स्टॉप थेट पुणे होता.



-नितीश साने ©

No comments

Post a Comment