"स्वतःचेच विचार संग्रहित करून ठेवावेत म्हणून आपण ते कागदावर उतरवून काढतो, आपल्या आठवणींचा तो कागद जपून ठेवतो, नंतर जेव्हा काही दिवसांनंतर किंवा काही वर्षांनंतर ते उघडून आपण वाचतो तेव्हा आपल्याच चेहऱ्यावर स्मितहास्य उमटतं! तेव्हा जो स्वतःशी संवाद होतो तो म्हणजे एकांत! असाच संवाद कधीतरी व्हावा अशी इच्छा बाळगून हे लिहितो आहे, म्हणून हा एकांत!"

Saturday 20 May 2017

कोकणवारी

कोकणवारी   गर्दीच्या गोंगाटापासून दूर शांतपणे निसर्गाच्या सानिध्यात, माडाच्या किंवा केवड्याच्या बनात, रुपेरी वाळूत, अथांग समुद... thumbnail 1 summary
कोकणवारी 



गर्दीच्या गोंगाटापासून दूर शांतपणे निसर्गाच्या सानिध्यात, माडाच्या किंवा केवड्याच्या बनात, रुपेरी वाळूत, अथांग समुद्राच्या किनाऱ्यावर मावळत्या सूर्याच्या त्या सुंदर दृश्याबरोबर दिवसाचा शेवट करायची इच्छा झाली कि सर्वात पहिले डोळ्यासमोर येत ते कोकण! 


शहरी संस्कृती पासून दूर कुठेतरी पारंपरिक आणि प्राकृतिक जीवनशैली अनुभवायची ओढ लागली कि डोळ्यासमोर येत ते कोकण! 
गजबजलेले आणि गाड्यांच्या व्यापांनी झाकलेले रस्ते सोडून दूर लाल मातीच्या रस्त्यांवरून बैलगाडीतून नारळ आणि पोफळीच्या बागांतून फेरफटका मारायची इच्छा झाली कि डोळ्यासमोर येतं ते कोकण!



आजपर्यंत इतक्या कोकण वाऱ्या झाल्या तरी अजून मन मात्र तृप्त झाल नाही; कधी होईल असं वाटत देखील नाही.
गेली अनेक वर्षे मी कोकणात जातो आहे. हि "वारी" कुठल्या वर्षी चुकलेली माझ्या स्मरणात नाही.
कोकणाची इतकी ओढ लागायचं कारण हे फक्त तिथलं प्राकृतिक सौंदर्य हे नाहीए! कारण माझ्यासाठी भटकंतीची व्याख्या म्हणजे निव्वळ नेत्रसुख नसून त्या ठिकाणच्या सर्व जीवनशैलीतील  छटा आणि जीवनाच्या पलीकडील विश्व. भटकंती म्हणजे निसर्ग, भटकंती म्हणजे एखाद्या जागेची अनुभवलेली जीवनशैली, तिथली संस्कृती, परंपरा, भेटलेली माणसं आणि बरंच काही! 
तेव्हा तुम्हाला जर का खऱ्या अर्थाने परिपूर्ण भटकंती करायला आवडत असेल तर कोकणासारखं दुसरं ठिकाण नाही.
अर्थात कोकणात फिरायची मजा तुम्ही तेव्हाच घेऊ शकता जेव्हा तुम्ही तुमच्या शहरी जीवशैलीला दूर लोटून अस्सल कोकणी पद्धतीने राहू लागता! किंबहुना तेव्हाच तुम्ही कोकण पाहू शकता! कोकणात जर का तुम्ही फक्त समुद्र पाहायला किंवा समुद्रात खेळायला, मासे खायला आणि वॉटर स्पोर्ट्स च थ्रिल अनुभवायला जाणार असाल जाणार असाल तर तुम्हाला कदाचित कोकणात (महाराष्ट्र किनारपट्टी; आता आमच्या कोकणावरून देखील भौगोलिक वाद होऊ नयेत म्हणून घेतलेली खबरदारी) आणि गोव्यात काही फरक जाणवणार नाही.


तेव्हा कोकणात जाऊन जर का तुम्ही एखाद्या घरगुती ठिकाणी आणि खोलीच्या मागे भलीमोठी वाडी असलेल्या जागी न राहता एखाद्या लॉज वर राहिला असाल तर याचा अर्थ तुम्ही कोकण पाहिलच नाहीत. कोकणात जाऊन तुम्ही केळीच्या पानावर न जेवता स्वच्छ चकाचक ताटात जेवला असाल तर याचा अर्थ तुम्ही कोकण पहिलचं नाहीत! कोकणात कोणत्या कोळ्यांच्या गटाबरोबर मासेमारी पाहायला जाणार नसाल तर याचा अर्थ तुम्ही कोकण पाहिलच नाहीत. रात्री शांतपणे लाटांच्या आवाजात दूरवर दिसणाऱ्या लाईटहाऊस आणि बोटींचे दिवे मोजत चांदण्यांच्या प्रकाशाने न्हाहून निघालेल्या चमचमत्या किनाऱ्यावरून फेरफटका मारून आलेले नसाल तर तुम्ही कोकण अनुभवलंच नाहीत. दुपारी एखाद्या शांत वाडीत मातीवर चटई टाकून किंवा एखाद्या झाडावर चढून आंबे, शहाळी अथवा फणस इत्यादी फळे आणि त्यापासून बनवलेले पदार्थ न खाता खोलीवर टीव्ही बघत बसला असाल तर तुम्ही कोकणात राहिलाच नाहीत! दुपारी एखाद्या घरगुती खानावळीवर माश्यांचं कालवण आणि रस्सा असा बेत आखून नंतर पैजेवर मोदक हाणायची आणि सोलकढी ढोसायची शर्यत न लावता एखाद्या स्टार हॉटेल मध्ये मालवणी स्पेशल अशी अशी "पंजाबी भाजी" (हि भाजी याच तक्त्यात सहसा आढळते) जर का तंदुरी रोटी बरोबर खाऊन येणार असाल तर याचा अर्थ तुम्ही कोकण पाहिलंच नाहीत!
अर्थात प्रत्येकाचे विचार वेगळे! पण माझ्यासाठी तरी कोकणातील भटकंती मध्ये वरील पैकी काही राहिले तर माझी हि वारी अपुरी राहिल्यासारखे वाटते. अर्थात कोकणात एवढेच करण्यासाठी मी नक्कीच जात नाही! एखाद्या सकाळी बीच वर जाऊन सर्व वॉटर स्पोर्ट्स करून येण्याची मजा देखील वेगळी आहेच! पण हे कोकणाचे खास वैशिष्ट्य नाही!



अश्याच या कोकणात प्रत्येक सुट्टीला जाऊन आल्यामुळे कोकणात जी ठिकाणे पहिली, जी जीवनशैली अनुभवली, जे सण साजरे केले आणि जी माणसं भेटली अश्या सर्वांबद्दल लिहावेसे वाटले म्हणून हि कोकणवारी चालू करत आहे!
दुर्दैवाने मी खूप लहान असल्यापासून कोकणात फिरत असल्याने माझ्याकडे पूर्वीच्या गोष्टींच्या नोंदी नाहीत. तसेच काही मोजक्या ट्रिप सोडल्या तर फारसे फोटोज देखील नाहीत! आठवणी तेवढ्या आहेत! तेव्हा या "e - लेखनाच्याच" माध्यमातून जास्तीत जास्त अनुभव जे मला आपल्याशी शेयर करावेसे वाटतात ते मी पोहचवायचा प्रयत्न करतो!


-नितीश साने ©

2 comments

  1. नितीश,
    खूप छान ब्लॉग...
    वीणा मावशी ( अर्णवची आई)

    ReplyDelete