"स्वतःचेच विचार संग्रहित करून ठेवावेत म्हणून आपण ते कागदावर उतरवून काढतो, आपल्या आठवणींचा तो कागद जपून ठेवतो, नंतर जेव्हा काही दिवसांनंतर किंवा काही वर्षांनंतर ते उघडून आपण वाचतो तेव्हा आपल्याच चेहऱ्यावर स्मितहास्य उमटतं! तेव्हा जो स्वतःशी संवाद होतो तो म्हणजे एकांत! असाच संवाद कधीतरी व्हावा अशी इच्छा बाळगून हे लिहितो आहे, म्हणून हा एकांत!"

Saturday 20 May 2017

पत्ता

पत्ता मी गेली 12 वर्षे रतन विहार नावाच्या एका अपार्टमेंट मधे राहतो. गेल्या 12 वर्षात मी या रतन-विहार मधे इतकी चित्र विचित्र लोकं पहिली आहेत ... thumbnail 1 summary
पत्ता


मी गेली 12 वर्षे रतन विहार नावाच्या एका अपार्टमेंट मधे राहतो. गेल्या 12 वर्षात मी या रतन-विहार मधे इतकी चित्र विचित्र लोकं पहिली आहेत की खरं तर प्रत्येकावर एक व्यक्तिचित्र लिहिलं तरी एक छान संग्रह तयार होईल!
अश्याच या संग्राह्य लोकांमधला एक म्हणजे आमच्या समोर राहणारा हा धवल! गंमत म्हणजे याच्या नावात आणि वर्णात तसुभर देखिल साम्य नाही!
हा माणूस नक्की काय करतो हे खरं तर एक गूढ़ च आहे! गूढ़ या अर्थानी, कारण विचारावं तेव्हा हा माणूस कोणत्यातरी नवीन कंपनीत काहीतरी नवीन काम करत असतो! आधी तो पुण्यात वर्षातले निम्मे दिवस नसतोच. असलाच तर दर वेळा नवीन पत्ता!
आणि बाहेर म्हणजे कामानिमित्त वगैरे नाही... नुसताच फिरायला!
म्हणून हा कंपनी सुद्धा शनिवार - रविवार सुट्टी असलेली निवडतो! बाकी वरती सुट्ट्या भरपुर! सुट्टी साठी कटकट झाली की नवीन जॉब, नवीन कंपनी!
तसं म्हणलं, तर या धवलची शैक्षणिक बाजू काही भक्कम नाही. याला कामात पण विशेष रस नाही. तरीदेखिल याला दर वेळा भरपूर सुट्ट्या देणाऱ्या एवढ्या कंपन्या कुठून मिळतात हे त्याचं तोच जाणे! याउलट मला मात्र आजपर्यन्त कधी एक सुट्टी कटकट न होता मिळाली आहे असं आठवत नाही; बिनपगरी सुद्धा! असो, एकेकाच्या नशीबचा भाग!
ह्या माणसानी बहुदा एव्हान अख्खा भारत पालथा घातला असेल! तरी देखिल याचं मन भरत नाही! एवढं फिरायसाठी एवढा पैसा कुठून येतो हेही एक गूढ़च!
मागे एकदा याच्या कंपनी मधे कामानिमित्त  जायचा योग आला.
अतिशय कळकट जागा, दिवसा सुद्धा लावावा लागणारा दिवा, तो सुद्धा अगदी मिणमिणता. दोन तीन ठराविक रंगाच्या पोशाखात वावरणारे लोक! एकंदर अगदी भकास वातावरण.
"म्हणूनच माझं मन येथे रमत नाही..." मागे एकदा हा धवल म्हणाला होता! "एवढ्या मोठ्या दुनियेत रोज एकाच जागी जाऊन, काही ठराविक लोकांचे चेहरे पहात, तेच ठरलेले पोशाख घालून वावरायचं, यात काही अर्थ नाही!"
या धवलशी माझे एवढे चांगले संबंध असायच कारण म्हणजे, "याची आमच्या घरी येणारी पत्र!"
हा इसम कधी घरी नसल्यामुळे, याची पत्रपेटी म्हणजे आमचं घर!
याच्या नावानी भारतातल्या विविध पत्त्यांवरून असंख्य पत्र येतात!
मग स्वारी पुण्यात आली की त्याच्या पत्रांचा गठ्ठा सुपूर्त करणे हा एक कार्यक्रम!
मलाही खरं तर फिरायची खूप आवड आहे, पण वेळ होत नाही! ह्या धवलला मात्र फिरायचं अक्षरशः व्यसन आहे!
हा माणूस खरं तर भूगोलाचा वगैरे उत्तम प्राध्यापक होऊ शकेल. पण नोकरी बद्दल मत म्हणजे, 'गुलामी रक्तात नाही' असं!
त्याच्या मते, "तो जगायसाठी कमावतो आणि आम्ही कमवायसाठी जगतो!"
हा हिंडायला निघाला तरी बरोबर फ़क्त एक मोठी सैक, क्वचित एखादी सूटकेस!
त्यामुळे तो बाहेर निघाला की आम्ही त्याच्या समानाकडे पाहून हसतो, आम्ही कधी निघलोच तर तो आमच्या समानाकडे पाहुन हसतो!
काय गंमत असते पहा, आमच्याकडे गाड़ी आहे, पण घर आणि ऑफिस सोडून कुठे बाहेर काढायला वेळ नाही. त्याच्याकडे गाड़ी नसली तरी त्याचं कुठे अडत नाही, कुठलीही गाड़ी त्याला हवं तेव्हा हवं तिथपर्यन्त लिफ्ट देते... त्याचं घर छोट आहे, पण घरात राहायची वेळच् येत नाही!
आमचा कायमचा पत्ता सोडून आणखीन 2 पत्ते आहेत;
त्याचा कायमचा पत्ता एक असला तरी सध्ध्याचा पत्ता तो सोडून कोणालाच माहित नाही!
आमचं घर मोठं असेल कदाचित् पण त्याची दुनिया अमच्याहून खूप मोठी आहे!
बरं याची काळजी वाटते म्हणून कधी याच्याशी बोलायला गेलो, तर हा उलट आम्हालाच, "तुम्ही काय कमावलं आणि काय गमावलं" वगैरे सुनावतो
या धवलची खरी पंचाईत झाली ती आम्ही रतन-विहार सोडून दुसरीकडे राहायला गेलो तेव्हा!
त्याच्या पत्रव्यवहार संभळणाऱ्या माणसाचीच बदली झाली होती!
पण मग बरेच वर्ष चालू असलेली प्रथा आम्ही देखील पुढे चालु ठेवली आणि आमच्या नवीन पत्त्यावर त्याची पत्र येऊ लागली!
आमच्याकडे अमच्यापेक्षा देखिल जास्त पत्र त्याचीच यायची. त्या पत्रातला मजकूर काय होता हे मात्र कधी समजलं नाही!
साधारण दर दोन महिन्यांनी याची आमच्याकडे एक चक्कर होत असे. पण मधे बरेच दिवस झाले तरी हा धवल काही पत्र घ्यायला आला नाही...
पत्रांचा ढ़ीग तेव्हडा वाढत गेला!
मग मागे एकदा त्यानी दिलेल्या एका डायरीची आठवण झाली!
मागे एकदा तो म्हणाला होता, "एवढी डायरी प्लीज़ तुमच्याकडे ठेवा, माझी विचारपुस करायला कोणी आलं नाही तर एवढी डायरी त्यांना द्या."
आज न राहवून शेवटी ती डायरी मी उघडली,
त्यावरच्या पहिल्या पानावरील फ़क्त काही ओळी भरल्या होत्या...
"बरेच दिवस माझा काही पत्ता नाही, म्हणून तुम्ही बहुदा काळजी वाटून आज माझी विचारपुस करत असाल. काळजी करण्याचे काही कारण नाही...
समजा मला काही झाले, अथवा मी कुठे धड़पड़लो आणि तातपुरती ही दुनिया सोडून जरी गेलो, तरी वरती काही माझे मन रमणार नाही...
अजून बरेच जग पहायचे राहून गेले आहे, तेव्हा डायरी न्यायला लवकरच परत येत आहे,
डायरी तुमच्याकडे ठेवा, कारण तुम्हाला जरी माझा पत्ता माहित नसला, तरी मला तुमचा ठाऊक आहे!"


-नितीश साने ©

No comments

Post a Comment