"स्वतःचेच विचार संग्रहित करून ठेवावेत म्हणून आपण ते कागदावर उतरवून काढतो, आपल्या आठवणींचा तो कागद जपून ठेवतो, नंतर जेव्हा काही दिवसांनंतर किंवा काही वर्षांनंतर ते उघडून आपण वाचतो तेव्हा आपल्याच चेहऱ्यावर स्मितहास्य उमटतं! तेव्हा जो स्वतःशी संवाद होतो तो म्हणजे एकांत! असाच संवाद कधीतरी व्हावा अशी इच्छा बाळगून हे लिहितो आहे, म्हणून हा एकांत!"

Saturday 20 May 2017

रामराज्य

रामराज्य thumbnail 1 summary
रामराज्य





असं म्हणतात, की रामायणाच्या वेळी अयोध्या ही देवभूमि होती आणि लंका ही असुरांची नगरी! तरी देखिल  राम आणि रावणाच्या युद्धात, रावणाच्या बाजूने अख्खी लंका उभी राहिली; रामच्या मदतीला मात्र अयोध्येतून कोणीही आलं नाही...
परंतु वाटेत भेटलेल्या वनरसेनेच्या मदतीने राम हे युद्ध जिंकला. यात श्रेष्ठ नक्की कुठल्या प्रवृत्तिला म्हणायचे?
आपल्या राजाच्या पाठीमागे प्राण पणाला लावून उभे राहिलेल्या लंकेतील समस्त असुर सेनेला,
निरपेक्षपणे आणि भक्तिभावाने, रामाच्या पाठीमागे उभं राहिलेल्या समस्त वानरसेनेला, की कुठल्याही सेनेला प्रभावित करणाऱ्या रामाला?
असं म्हणतात की राम हा अयोध्येतील प्रजेचा अतिशय लाडका आणि पराक्रमी राजा होता...
रावण देखिल 14 विद्या आणि 64 कलांनी समृद्ध असा प्रभावी प्रजापालक होता...
तरी देखिल आपल्या भांडणामुळे होणारी प्रजेची फरपट दोन्ही राजांना का दिसू नये?
अहो लंका तरी नंतर जळाली असे म्हणतात, पण अयोध्येतील अगणित पंडित आणि सूज्ञ जनतेपैकी एकालाही रामायण का लिहावेसे वाटू नये?
विष्णूच्या अवतार असलेल्या ह्या रामबद्दल त्याच्याच नारद नावाच्या भक्ताला, वाल्या नावाच्या गुंडाकडून हे लिहून घ्यावे लागावे? तेही त्याची पापं माफ़ करायचे आमिष दाखवून?
या अख्ख्या रामायणात, खरच नक्की कोण चांगले होते आणि कोण वाईट, हा प्रश्न जरी बाजूला ठेवला, तरी एवढ्या सर्वगुण संपन्न अश्या पात्रांनी भरलेल्या कथेत, शेवटी नक्की भले कोणाचे झाले?
जिच्यावरुन रामायण घडले त्या सीतेचे?
नाही..
त्या निष्ठावान हनुमानचं?
माहीत नाही..
रावनाचं?
नाही..
आणि रामाचं?
नाहीच..
तरीदेखिल आजही लोकं म्हणतात, "पुन्हा एकदा रामराज्य यावे!"



-नितीश साने ©

No comments

Post a Comment