"स्वतःचेच विचार संग्रहित करून ठेवावेत म्हणून आपण ते कागदावर उतरवून काढतो, आपल्या आठवणींचा तो कागद जपून ठेवतो, नंतर जेव्हा काही दिवसांनंतर किंवा काही वर्षांनंतर ते उघडून आपण वाचतो तेव्हा आपल्याच चेहऱ्यावर स्मितहास्य उमटतं! तेव्हा जो स्वतःशी संवाद होतो तो म्हणजे एकांत! असाच संवाद कधीतरी व्हावा अशी इच्छा बाळगून हे लिहितो आहे, म्हणून हा एकांत!"

Sunday 20 May 2018

घनगड - कॅम्पिंग

घनगड - कॅम्पिंग thumbnail 1 summary
घनगड - कॅम्पिंग


ठिकाण: घनगड

सुरुवातीचे गाव : एकोले

ट्रेक : मध्यम अवघड

राहायची सोय : मंदिरात १५ जणांची राहायची सोय होते, शिवाय गावकरी देखील सोय करतात.

पुण्यापासून अंतर : ८५ किलोमीटर.

सार्वजनिक वाहतूक : सोयीची नाही. स्वतः चे वाहन घेऊन जाणेच योग्य!

पाण्याची सोय : गावात गरजेपुरती होऊ शकते

गेल्या काही वर्षात, ट्रेकिंग करताना काही गोष्टी करायच्या अगदी ठरवून ठेवल्या होत्या, पण काळाच्या ओघात कुठेतरी मागे राहून मनात सलत होत्या.

रात्री कुठेतरी स्वच्छ चांदण्यात तंबू ठोकून मुक्काम करायचा होता, मस्त चूल पेटवून स्वयंपाक करायचा होता, barbecue करून त्यावर ताव मारायचा होता, आकाशाकडे टॉर्च दाखवत चमचमत्या चांदण्याखाली एक फोटो काढून घ्यायचा होता, milky way galaxy पहायची होती, अंधाऱ्या रात्री जंगलात काजवे पहायचे होते! पहाटे उठून गडावरून सूर्योदय बघायचा होता,
काही राहून गेलेल्या, काही खूप पूर्वी कधीतरी केलेल्या अश्या कितीतरी गोष्टी नव्याने करायच्या होत्या!

छायाचित्र: परीक्षित काशीकर ©
आणि अचानक घनगड camping चा plan ठरला! २ वर्षांपूर्वी तापोळ्याला केलेल्या camping नंतर अखेर योग जुळून आला, आणि होय नाही करत करत शेवटी एकदाचे १० जणं ऎत्या वेळी उपस्थित राहिले! आणखीन एक 100% उपस्थिती लाभलेला plan! मग नेहमीप्रमाणे वेळेशी शत्रुत्व सिद्ध करत पोहोचण्याच्या अपेक्षित वेळेत आम्ही पुण्याहून निघालो. 

भटकंती वेडे
वाटेत स्वयंपाकाचं साहित्य घेतलं आणि रात्री 9:30 वाजता गावात पोहोचलो तसं मग सर्वांना भुकेची आठवण झाली. एकीकडे barbecue marinate करायला ठेऊन मग आम्ही veg बिर्याणीचा घाट घातला! अर्थात हे सर्व मंदिरापासून दूर चाललं होतं. मग सर्वांनी थोडा वेळ स्वयंपाक कौशल्याची प्रत्यक्षिके दाखवून शेवटी हार मानली आणि मग ज्यांना खरंच चांगलं cooking जमतं आशा दोघांनी या दोन्ही पदार्थांचा ताबा घेतला!

Barbecue
छायाचित्र: परीक्षित काशीकर ©
milky way
छायाचित्र - परीक्षित काशीकर ©
अखेर 12:30 वाजता आमची पंगत जेवायला बसली. जेवण करून मग काही झोपी गेले, काही photography साठी बसले! एकंदर सगळं कसं शास्त्रशुद्ध चाललं होतं! हौशी मंडळींनी स्वतःचे photo काढून घेतल्यावर camera वाल्या photographer मंडळींना राम राम ठोकला आणि मंदिरात जाऊन झोपी गेले!

मग आम्ही काही जणं उरलो. एक फोटो काढायची हुक्की उरलेल्या मंडळींना होती, त्यामुळे कॅमेरा वाल्या बड्या लोकांनी सर्व setting करून देऊन माझ्यासारख्या काही लोकांना बटण दाबू दिलं! हे सर्व कार्यक्रम आवरल्यानंतर या बिचाऱ्या photographer मंडळींना milky way चे मनसोक्त photo काढता आले! हे करेपर्यंत पहाटेचे 3:30 वाजले होते. ऐन उन्हाळ्यात चांगलं कुडकूडत होतं, इतकी थंडी होती. मग पहाटे ५ वाजता उठायचं असल्यामुळे आम्ही उरले सुरले लोकं, मंदिरात डुलकी काढण्याकरिता पहुडलो.

अर्थात सकाळी उठवण्याची जबाबदारी आपल्यावरच आहे हे कळायला मला फक्त एकदा नजर फिरवायला लागली. दोनदा गजर वाजून देखील अध्यक्ष साहेब उठायचं नाव घेईनात. मग मीच लोकांना हाका मारल्या, कारण सूर्योदय कोणत्याही परिस्थितीत गडावर जाऊनच बघायचा होता! जमवाजमव करून आम्ही अखेर चढायला लागलो आणि माथ्यापर्यंत जाईपर्यंत अखेर सूर्योदय दिसला!







वातावरण खूप स्वच्छ होतं! सुर्योदयाचे photos टिपून मग आम्ही घनगड खिंड पहिली. मग तिथून बुरुजपाशी गेलो. तिथून पुन्हा photos काढून मग एक फेरफटका मारला.

अखेर मागील बाजूस आलो तेव्हा ज्या दृश्यासाठी इतके दिवस वाट पाहत होतो, ते दिसलं! घनगडावरून तैल बैला आणि सुधागड एकदम स्वछ दिसत होते! मधल्या सुंदर valley मध्ये पक्षांचे थवे उडताना दिसत होते, असं एकंदरच मन मोहून टाकेल असं दृश्य बघत आम्ही काही वेळ थांबलो. 


डावीकडे दिसणारा सुधागड आणि उजवीकडे तैल बैला
ऊन व्हायच्या आत परत निघायचं असल्यामुळे मग आम्ही उरलेला गड पाहून घेतला.
खाली आलेली अवाढव्य शिळा पहिली, तिथलचं छोटंसं मंदिर पाहिलं, आणि उतरायला लागलो.
मग वाटेत मध्ये खूप अंतर पडलेलं पाहून, अध्यक्षसाहेबांनी लोककल्याणकारी मोहीम हाती घेत पुढे असलेल्या सदस्यांना एका सुंदर गुहेचं आणि कल्पनाशक्ती वापरून घनगड खिंडीपाशी बनवलेल्या स्वछतागृहाचं दर्शन घडवलं! 




घनगड खिंड
अध्यक्षसाहेब हे स्वतः शिवाजी trail या संस्थेबरोबर घनगडावर दुर्गसंवर्धनाचे अतिशय स्तुत्य असे कार्य करत असल्यामुळे त्यांना गडाचा कोपरा अन कोपरा माहिती होता! वाटेत उतरताना मंडळींना जशी करवंद आणि पाडाच्या आंब्याची झाडं दिसायला लागली, तसा उन व्हायच्या आत परतायचा plan मावळला आणि करवंदाच्या जाळ्यांमध्ये मंडळी अडकली! मनमुराद रानमेवा चाखून झाल्यावर मग अखेर गावात जाऊन नाश्ता केला.

ध्यानमग्न अध्यक्षसाहेब
करवंद!

अध्यक्षसाहेबांना लवकर निघायचे असल्यामुळे त्यांनी आमचा निरोप घेतला.
"अरे म्हणावे असे काजवे काही दिसले नाहीत बुवा काल.."
कोणीतरी अध्यक्षसाहेबांना टोचलं..


वाटेत दिसणारे नवरा - नवरी हे सुळके

"ठीक आहे, घनगड चे नाही दिसले, आता राजमचीचे पाहू", असं म्हणून अध्यक्षसाहेबांनी गाडीला किक दिली आणि घराकडे कूच केली.
बाकीची मंडळी पण मग हळू हळू घराकडे निघाली.
काजवे तेव्हडे दिसले नाहीत, पण अर्धवट राहिलेले बेतच पुढले बेत आखायला निमित्त ठरतात!

शेवटी सगळ्यांचा निरोप घेत उन्हाचा शेक घेत आम्ही एकमेकांचे निरोप घेतले आणि आणखीन एक ट्रेक सार्थकी लागला!


-नितीश साने ©

2 comments

  1. फारच उत्तम...

    ReplyDelete
  2. लेख खरंच सुंदर शब्दांनी रचलेला आहे....वाचून आपणही ह्याच लेखणी मधल्या धमाली मध्ये होतो याचा आनंद होतो..

    ReplyDelete